कारगिल युद्ध : भारतीय सैन्याची शौर्यगाथा !

२६ जुलै २०२२ या दिवशी कारगिल युद्ध दिन आहे. त्या निमित्ताने…

२६ जुलै १९९९ या दिवशी कारगिलचे युद्ध लढले गेले. या युद्धाला आज (२६ जुलै २०२२ या दिवशी) २३ वर्षे पूर्ण झाली. ते युद्ध अशा वेळी झाले की, ज्या वेळी ‘पाकिस्तान युद्ध करील’, अशी शक्यता अतिशय अल्प वाटत होती. त्यामुळे ते युद्ध का झाले ? त्या युद्धाच्या वेळी परिस्थिती काय होती ? ते युद्ध किती वेळ आणि कसे लढले गेले ? युद्धाच्या नंतर काय झाले ? त्या युद्धामध्ये कुणी पराक्रम गाजवला, त्यांचे काय झाले ? या सर्वांविषयीची माहिती या लेखात पहाणार आहोत.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

१. कारगिलची भौगोलिक परिस्थिती

कारगिल हा एक उंचावरील प्रदेश आहे, म्हणजे समुद्रसपाटीपासून त्याची उंची ९ सहस्र फुटांपासून ते १६ सहस्र फुटांपर्यंत आहे. हे युद्धही लडाखमध्येच झाले, जिथे सध्या भारत-चीन संघर्ष चालू आहे. लडाखमध्ये लेह (जिथे सध्याचा संघर्ष चालू आहे) आणि कारगिल, असे २ जिल्हे आहेत. लेह आणि लडाख येथील लोकसंख्या एकूण ३ लाख आहे. कारगिलमध्ये जे लोक रहातात, ते शिया मुसलमान आहेत, जे अतिशय देशभक्त लोक आहेत, तर लेहमध्ये सर्व बुद्ध पंथीय आहेत. हा प्रदेश अतिशय थंड आहे. तिथे ६ मास बर्फ पडतो. त्यामुळे येथील हवाही अतिशय थंड असते. युद्धाच्या वेळेला या भागात जाण्यासाठी एकच रस्ता होता, जो जम्मू ते श्रीनगर आणि झोझीला खिंडीमधून द्रास अन् कारगिल मार्गे लेहमध्ये पोचत असे. प्रवासाचे अंतर म्हणजे श्रीनगर ते द्रास १ दिवस, द्रास ते कारगिल १ दिवस आणि कारगिल ते लेह आपण १ ते २ दिवसांत पोचायचो. येथील रस्ते ६ मास खुले आणि ६ मास बर्फाखाली असल्याने अतिशय वाईट असतात.

२. ‘बर्फाळ भाग असल्याने पाक सैन्य घुसखोरी करणार नाही’, असे वाटून कारगिल येथे सैन्याची कुमक अल्प असणे 

कारगिल हा अतिशय डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी आणि लडाख सीमेवरही सैन्य संख्येने अतिशय अल्प होते. कारगिल येथे पाकिस्तानची सीमा अनुमाने १ सहस्र किलोमीटर आहे; परंतु या सीमेवर ३ ते ४ सहस्र सैन्य होते. याउलट जम्मू-काश्मीरमध्ये जी नियंत्रण रेषा (एल्.ओ.सी.) आहे, ती ७५० किलोमीटर आहे. तिथे आपण दीड लाख सैन्य ठेवलेले होते. आपल्याला असे वाटायचे की, कारगिलचा भाग हा अतिशय डोंगराळ आणि तेथे पुष्कळ बर्फ पडत असल्यामुळे पाकिस्तान काही करू शकणार नाही. एका अर्थी ते बरोबर होते. जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या भागामध्ये घुसखोरी केली, त्या वेळी जर आपण काही कारवाई केली नसती, तरी पाकिस्तानी सैन्य बर्फाखाली दबून गेले असते; पण त्यांनी भारताच्या जागेत आक्रमण केले होते; म्हणून आपल्याला आक्रमक कारवाई करून त्यांना तिथून बाहेर काढावे लागले.

३. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भारत-पाकिस्तान मैत्रीच्या स्वप्नांना पाकिस्तानने सुरूंग लावणे

त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते. त्यांना असे वाटत होते की, पाकिस्तान आपला मित्र झाला, तर किती चांगले होईल. प्रत्येक भारतीय पंतप्रधानाची इच्छा नेहमीच होती की, पाकिस्तानशी मैत्री करावी. त्यात वाईट असे काहीच नाही; परंतु पाकिस्तान कधीही आपला मित्र झाला नाही. वाजपेयी हे लाहोर बस यात्रेला गेले आणि त्यांच्या समवेत असे अनेक भारतीय गेले, जे फाळणीनंतर भारतात आले होते. सर्वांना वाटत होते की, ‘पाकिस्तान आता आपला चांगला मित्र होईल. त्यामुळे पाकिस्तान असे काही करील’, असे कुणाला वाटले नाही. ज्या वेळी वाजपेयी पाकिस्तानमध्ये जाऊन कविता म्हणत होते, त्याच वेळी पाकिस्तानी सैन्य कारगिलमध्ये घुसखोरी करत होते.

४. कारगिल घुसखोरीमागील कारणे

४ अ. पाकिस्तानी सैन्याने युद्ध केल्याचे दाखवायचे नसणे : भारतीय सैन्याला काश्मीरमध्ये आतंकवादविरोधी उपक्रमाला पुष्कळ चांगले यश मिळत होते आणि काश्मीर प्रश्न मागे पडत चालला होता. पाकिस्तानची अशी इच्छा होती की, काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय करावा, जेणेकरून सर्व जग काश्मीरविषयी बोलायला लागेल. पाकिस्तानला या युद्धात पाकिस्तानी सैन्याने युद्ध केल्याचे दाखवायचे नव्हते. त्याला असे दाखवायचे होते की, स्वतंत्र काश्मीरसाठी काश्मिरी लोकांनी भारताविरुद्ध केलेला हा उठाव आहे. याकरता त्यांचा आतंकवाद्यांना आत पाठवायचा विचार होता; परंतु त्यांना आतंकवाद्यांवर विश्वास नव्हता की, ते भारतीय सैन्याशी लढू शकतील. म्हणून पाकिस्तानने त्याचे सैन्य आतंकवाद्यांच्या वेशात पाठवले. ज्याला ते ‘मुजाहिद्दीन’ (धर्मयोद्धे) म्हणतात.

४ आ. पाकिस्तानने कारगिलमध्ये सैन्य आणून भारताचे सैन्य एकटे पाडण्याचा प्रयत्न करणे : त्यामुळे रात्रीच्या वेळी सैन्य घुसवायचे आणि ज्या भागामध्ये भारताचे सैन्य नव्हते, त्या भागाच्या शिखरांवरती जाऊन त्यांनी त्यांचे तळ ठोकणे चालू केले. ते त्यांनी ३ मासांत केले आणि त्यांचे सर्व सैन्य या भागामध्ये आणून लपवले. त्यांनी या भागामध्ये सैन्य आणायचे कारण होते की, येथील रस्ता नियंत्रण रेषेच्या अगदी जवळून जातो. त्यामुळे कारगिलच्या डोंगरावरून गोळीबार करून आपण हा रस्ता थांबवू शकतो. हा रस्ता केवळ ६ मासच चालू असतो. त्यामुळे सैन्याला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी या ६ मासांतच आणू शकतो. पाकिस्तानने हा रस्ता बंद केला, तर कारगिलमध्ये असलेले भारताचे सैन्य एकटे पडेल. लडाखला दोन राष्ट्रांच्या सीमा आहेत आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये आपले सियाचीन नावाचे क्षेत्र आहे. सियाचीन ही जगातील सर्वांत उंच ठिकाणी असलेली रणभूमी आहे. हा रस्ता बंद केल्याने सियाचीनचा रस्ताही बंद झाला असता. असे अनेक लाभ होतील असे पाकिस्तानला वाटत होते. यासाठी पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी त्यांनी ११ बटालियन सैन्य आणले होते. एका बटालियनमध्ये ८०० ते १ सहस्र सैनिक असतात. एवढे सैनिक तिथे आणून वेगवेगळ्या डोंगरावरती वसवण्यात आले.

४ इ. कारगिलमध्ये पुष्कळ बर्फ पडत असल्यामुळे तेथे सैन्य तैनात करणे कठीण असणे : मे मासानंतर या भागामध्ये पुष्कळ बर्फ पडतो. त्यामुळे उच्च शिखरावरील आपल्या सैनिकांना मागे आणले जाते. त्यामुळे या भागावर लक्ष ठेवायला कुणी नव्हते. हवामान वाईट असेल, तर येथे हेलिकॉप्टरही जाऊ शकत नाहीत. या भागामध्ये तापमान ० ते (उणे) -४० डिग्री असते. येथे प्रचंड प्रमाणात वारे वहाते आणि त्यांचा वेग १२० ते १३० किलोमीटर ताशी असतो. द्रास हा भाग जगामधील दुसऱ्या क्रमांकाचा थंड प्रदेश समजला जातो. या भागामध्ये ‘इसीसी’ कपडे (एक्सट्रा कोल्ड क्लायमेट क्लॉथिंग – अतीथंड वातावरणात वापरावयाचे विशेष प्रकारचे गरम कपडे) नसतील, तर राहू शकत नाही. या भागामध्ये प्राणवायू हा पुष्कळ अल्प असतो. या भागात चालणे, वरती चढणे कठीण जाते. त्यामुळे या भागामध्ये सैन्य तैनात करणे कठीण असते.

५. पाकिस्तानी सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे पुष्कळ विलंबाने कळणे

पाकिस्तानी सैन्य तिथे आले आणि मे मासानंतर आपल्याला समजले की, या भागामध्ये कुणीतरी आलेले आहे. त्यांचा पहिला प्रसंग लेफ्टनंट कालिया यांच्याशी घडला. तेव्हा लेफ्टनंट कालिया गंभीररित्या घायाळ झाले. त्या वेळेला खात्री पटली की, कुणीतरी आहे. प्रथम वाटले होते की, आतंकवादी असावेत; कारण तेथे असलेली संख्या ८ ते १० एवढीच ठाऊक होती. जेव्हा त्यांच्याशी चकमकी व्हायला लागल्या, तेव्हा कळले की, हे तर अनुमाने ५००-६०० किलोमीटरमध्ये पसरलेले आहेत. एवढे आतंकवादी असणे शक्य नव्हते, म्हणजे हे सैन्यच असावे, हे त्या वेळी समजले. त्यांना येथून बाहेर काढण्यासाठी या भागामध्ये आक्रमक सैन्य नव्हते. त्यामुळे आपल्याला हे सैन्य काश्मीर खोरे आणि बरेली (उत्तरप्रदेश) येथून आणावे लागले. जेव्हा सैन्य खालून वर येते, तेव्हा त्यांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सिद्ध करावे लागते.

६. तंत्रज्ञानाचा वापर शक्य नसल्याने भारतीय सैनिकांनी केवळ शौर्याच्या बळावर लढणे 

नियोजनाप्रमाणे प्रथम द्रासच्या भागामध्ये युद्ध प्रारंभ करण्यात आले आणि नंतर बटालिकच्या भागामध्ये चालू झाले. या भागामध्ये कोणतेही आधुनिक शस्त्र वापरता येत नाही. सैनिकांना स्वतःकडे असलेल्या शस्त्रांनी की, जे हाताने वापरता येतात, त्याने युद्ध लढावे लागले. त्यामुळे या युद्धात तंत्रज्ञानाचा काहीही उपयोग झाला नाही. भारतीय सैन्याची क्षमता एकूण १४ लाखांची आहे. हे सगळे वेगवेगळ्या सीमांवर तैनात आहेत. या वेळी जी लढाई लढली गेली, ती पलटण (तुकडी) स्तरावर ! म्हणजे आधी ३० सैनिकांनी आक्रमण केले. नंतर १०० सैनिकांनी आक्रमण केले. जिथे पाकिस्तानचे २० ते २५ सैनिक होते, त्याच्या दुप्पट भारतीय सैनिक होते. त्यामुळे एकूण क्षमतेचा काहीच उपयोग नव्हता. तेथे अधिक सैन्याचा वापर करू शकत नाही. हे युद्ध पूर्णपणे रात्रीच्या वेळी झाले; कारण आपण खालून जायला लागलो की, पाकिस्तानी सैन्याला आपण लांबूनच दिसायचो आणि ते लगेच गोळीबार करायचे. आपण पाकिस्तानी सैन्याला दाबण्यासाठी हवाई दलाचा वापर करू शकत नव्हतो. विमान प्रचंड वेगाने जाते आणि डोंगरावर आक्रमण करणे शक्य होत नाही; म्हणून आपण त्या ठिकाणी ‘हेलिकॉप्टर गनशीप’ वापरण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी क्षेपणास्त्राने भारताचे हेलिकॉप्टर पाडले आणि भारतीय सैनिक मारले गेले. त्यामुळे पुढे हवाई दलाचा जराही वापर करता आला नाही. त्यामुळे आपले सैनिक ही लढाई पूर्णपणे शौर्यावर लढले. त्यामुळे शौर्य, धैर्य, शत्रूवरती आक्रमक कारवाया करायच्या, नेतृत्वाने पुढे रहायचे, या दृष्टीने लढाई करावी लागली. इथे तंत्रज्ञानाचा काहीही वापर झाला नाही. तेथे असलेल्या सगळ्या सैनिकांचे वय २२ वर्षांपासून ते
२७ वर्षांपर्यंत होते, म्हणजे त्यांनी नुकताच सैन्यामध्ये प्रवेश केलेला होता. या सर्व लढाया अडीच ते तीन मास चालल्या. यामध्ये ‘टोलोलिंगची लढाई’, ‘टायगर हिल’ची लढाई, ‘बॅटल ऑफ थ्री पिंपल’ वगैरे.

७. सैनिकांचा मानभंग झाल्यामुळे त्यांचे खच्चीकरण होणे

अशाच प्रकारची लढाई अजूनही चालू आहे. अनेक सैनिक त्यांच्या प्राणाचे बलीदान देत आहेत. दुर्दैवाने जेवढा मान त्यांना मिळाला पाहिजे, तेवढा तो मिळत नाही. आज आपण पहातो की, काही पाक आणि चिनी प्रेमी तज्ञांना भारतीय सैन्य हे शत्रू वाटते आणि त्यांच्याविषयी ते काही वेडेवाकडे लिहिण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा सैन्याने केलेल्या संघर्षावर चर्चासत्र बघितले, तर आपल्याला प्रश्न पडतो की, आपण चुकून चिनी वृत्तवाहिनी तर पहात नाही ना ? या सगळ्या गोष्टी सैनिकांकडे पोचतात. यामुळे सैन्याचे खच्चीकरण होते, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे.

८. भारतीय सैन्याने प्रतिकूल परिस्थितीत लढून महापराक्रम घडवला !

एका शिखरावर तिरंगा फडकवतांना भारतीय सैन्याची तुकडी

आपणही पर्यटक म्हणून कारगिल येथे जाऊ शकतो. तेव्हा आपल्याला कळेल की, कशा परिस्थितीत ही लढाई झाली होती ! ज्या वेळी युद्ध संपले, त्या वेळी आपण पाकिस्तानचे अनुमाने १ सहस्र ५०० सैनिक मारलेले होते, हे त्यानेही मान्य केले. यासाठी आपल्या ५५० सैनिकांनी बलीदान दिले. यातील ३५ सैनिकी अधिकारी आहेत. १ सहस्र २०० सैनिक गंभीररित्या घायाळ झाले. अशा प्रकारे कारगिलचे युद्ध लढले गेले आणि महापराक्रमी इतिहास घडला.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

कारगिल लढाईत पराक्रम गाजवणारे भारतीय शूर सैनिक !

कॅप्टन मनोज पांडये 

यांनी टोलोलिंगच्या आक्रमणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली; परंतु त्या आक्रमणातून ते परत आले नाहीत. त्यांना ‘परमवीर चक्रा’ने गौरवण्यात आले.

कॅप्टन विक्रम बत्रा 

यांनी स्वतःच्या तुकडी समवेत डोंगर शिखरांवर आक्रमण केले होते. त्यानंतर एका दूरचित्रवाहिनीने एका मुलाखतीत त्यांना विचारले, ‘‘तुम्ही एक यश मिळवलेले आहे. आता पुढे काय ?’’ यावर त्यांनी सांगितले, ‘‘ये दिल मांगे मोर !’’ म्हणजे ‘मला अजून दुसरे शिखरही कह्यात घ्यायचे आहे.’ त्या रात्री विक्रम बत्रा पुन्हा एका शिखरावर गेले आणि त्यांनी ते कह्यात घेतले; पण विक्रम बत्रा परत आले नाहीत. त्यांनाही ‘परमवीर चक्रा’ने गौरवण्यात आले.

लेफ्टनंट विजयंत थापर

त्या वेळी यांचे वय २४ वर्षे होते. त्यांची सैन्यामध्ये केवळ दीड वर्ष सेवा झाली होती. एके रात्री त्यांना आक्रमण करायचे होते. त्यांचे एक चित्र प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या देवीला प्रार्थना करत आहेत आणि त्यांच्या समवेत १०० सैनिक आहेत. त्यांची ती तुकडी (पलटण) घातक होती. यामध्ये विजयंत थापर यांचे काम होते की, कड्या कपाऱ्यांचा वापर करून त्या डोंगरावरती आक्रमण करायचे, म्हणजे अशा ठिकाणाहून आक्रमण करायचे की, शत्रूला वाटणार नाही की, या ठिकाणाहून आक्रमण होऊ शकते. या आक्रमणाला जाण्यापूर्वी विजयंत थापर यांनी त्यांच्या कुटुंबासाठी एक पत्र लिहून ठेवले. त्यांनी ते पत्र आपल्या तळामध्ये ठेवले आणि सांगितले, ‘जर मी या युद्धातून परत आलो नाही, तर हे पत्र माझ्या घरी पाठवावे.’

या पत्रामध्ये लिहिले होते, ‘हे पत्र मिळेपर्यंत मी या जगात नसेन. स्वर्गामधून तुमच्याकडे बघत असेन; पण अधिक वाईट वाटून घेऊ नका; कारण या देशासाठी लढतांना मी माझे प्राण दिलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला माझा अभिमान वाटू द्या. युद्ध संपल्यानंतर एवढे करा की, जिथे मी लढलो, ते ठिकाण तुम्ही नक्की येऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की, किती उंचीवर आम्ही ही लढाई लढलो. तसेच रुक्सानाला तुम्ही नियमित पैसे पाठवत जा. (रुक्साना ही एक काश्मिरी मुलगी होती, जिच्या आई-वडिलांना आतंकवाद्यांनी मारले होते. त्यामुळे तिला विजयंत यांनी दत्तक घेतले होते.) त्यांनी लिहिले होते की, माझ्या निवृत्ती वेतनामधून जे पैसे मिळतील, ते तिला आणि अनाथ आश्रमाला पाठवा. मी सर्वांना वंदन करतो. बटालियनला सांगा की, बटालियनच्या मंदिरामध्ये आमची ही शौर्यगाथा लिहिली जावी.’

विजयंत थापर यांचे वडील कर्नल थापर यांचे वय ८३ वर्षे आहे. ते १८ सहस्र फुटांवर चढले आणि विजयंत यांनी ज्या ठिकाणी त्यांचे प्राण दिले, तेथे जाऊन त्यांनी ते ठिकाण प्रत्यक्ष पाहिले. आता आपण देहलीमध्ये युद्ध स्मारक बनवलेले आहे. असेच एक स्मारक पुण्यामध्येही आहे.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

अजूनही देशात ‘छत्रपती शिवाजी महाराज शेजाऱ्यांच्या घरात जन्माला यावेत’, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे !

अनेक सैनिकांना त्यांच्या कुटुंबाची काळजी होती. कर्नल विश्वनाथन् यांनी तर ‘आता माझ्या कुटुंबाचे रक्षण कोण करील ?’, अशी काळजी व्यक्त केली होती. अर्थात् सैन्य त्यांची काळजी घेते; परंतु या कुटुंबांना त्यांच्या कर्त्या व्यक्तीविना पुढचे आयुष्य जगावे लागते. याचे दुःख पुष्कळ अधिक असते. अनेकांची कुटुंबे होती, तर अनेकांचे लग्न व्हायचे होते किंवा ते ठरलेले होते. जेव्हा ते युद्धावरून परत आले, तेव्हा त्यांची लग्ने मोडण्यात आली; कारण त्यांना वाटले की, ज्याच्याशी आपण लग्न करणार आहोत, तो कधी जाईल ? याविषयी काही सांगता येत नाही. आताही अनेक मुली किंवा त्यांचे पालक म्हणतात, ‘‘मला सैन्यामधील नवरा किंवा जावई नको.’’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन