केंद्राने ध्वजसंहितेत केलेल्या पालटानुसार आता दिवसा आणि रात्रीही तिरंगा फडकवता येणार !

पुणे – देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २४ जुलै या दिवशी देशाच्या वर्ष २००२ च्या ‘ध्वज संहिते’मध्ये पालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दिवसा आणि रात्रीही तिरंगा फडकवता येणार आहे. पॉलिस्टरपासून सिद्ध केलेल्या, तसेच यंत्रावर सिद्ध करण्यात आलेल्या या राष्ट्रध्वजाला कोणत्याही वेळी वंदन करता येईल. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभाग यांना याविषयीचे पत्र पाठवले आहे.

राष्ट्रध्वज वंदनाविषयीचे नियम हे ‘भारतीय ध्वज संहिता २०२२’ आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा १९७१’ अंतर्गत निश्चित करण्यात आले आहेत. याआधी केवळ सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वज फडकवता येत असे. यंत्रावर सिद्ध करण्यात आलेले, तसेच पॉलिस्टरच्या राष्ट्रध्वजाला अनुमती दिली जात नसे.