(म्हणे) ‘पाकिस्तानचे भारतात पकडले जाणारे सर्व हस्तक हिंदू असतात आणि त्यांचा संघाशी संबंध असतो !’

बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचा जावईशोध !

राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह

पाटलीपुत्र (बिहार) – जेव्हा सुरक्षादलांकडून पाकिस्तानी हस्तकांना पकडले जाते, तेव्हा ते हिंदू असतात आणि रा.स्व. संघाशी संबंधित असतात, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी केला. सध्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जिहादी कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. तसेच त्यांनी अटक करण्यात आलेला ‘अल्ट न्यूज’चा हिंदुद्वेषी सहसंस्थापक महंमद जुबैर याला ‘जुबैर साहेब’ अस संबोधित केले. ‘त्याला भाजप कारागृहातून बाहेर पडू देत नाही’, असा आरोप केला.

१. पी.एफ्.आय.च्या प्रकरणाविषयी पोलीस अधीक्षक मानवजीत सिंह ढिल्लो यांनी म्हटले होते की, रा.स्व. संघ आणि पी.एफ्.आय. दोघेही शारीरिक शिक्षणाच्या नावाखाली लोकांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत आहेत. (कुणाची तुलना कुणाशी करायची, हेही ठाऊक नसलेले असे पोलीस अधिकारी भाजप सत्तेत असलेल्या राज्यात आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक)

२. जगदानंद सिंह यांच्या विधानावर भाजपच्या प्रवक्त्या नाजिया इलाही यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले की, भ्रष्टाचाराची स्वतःची प्रकरणे लपवण्यासाठी जगदानंद सिंह अशा प्रकारची विधाने करत आहेत.

संपादकीय भूमिका

‘जगदानंद सिंह यांचा पाकशी काय संबंध आहे, याचीच चौकशी करण्याची आवश्यकता आहे’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !