‘दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।।
अशा पंक्ती श्री दत्तगुरूंच्या आरतीत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या श्री दत्तात्रेय रूपातील पाद्यपूजन सोहळ्यातही सर्वांना अशा प्रकारच्याच अनुभूती अनुभवता आल्या. सोहळ्यात श्री दत्ततत्त्वाचे प्रत्यक्ष अवतरण झाले होते. त्यामुळेच संत एकनाथ महाराजांनी श्री दत्तात्रेयांच्या दर्शनानंतरच्या स्थितीचे ज्या प्रकारे वर्णन त्यांच्या आरतीत केले आहे, तशाच अनुभूती संत आणि साधक यांना अनुभवता आल्या.
‘सनातनचे तीनही गुरु ध्यानावस्थेत आहेत’, असे जाणवणे
या सोहळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे पूर्णवेळ ध्यानावस्थेत होते. एरव्ही ते साधकांना हसून प्रतिसाद देतात, तसे काहीच या सोहळ्यात आढळून आले नाही. ‘पूजन चालू असतांनाही ते ध्यानावस्थेत आहेत’, असे जाणवत होते. पूजन झाल्यानंतर मात्र ते पुन्हा जागृतावस्थेत आले. त्यानंतर ते चित्रीकरण करणार्या साधकांशी नेहमीप्रमाणे बोलले. त्यांना हसून प्रतिसाद दिला. ‘पूजन चालू असतांना त्यांच्यात वैराग्यमूर्ती श्री दत्ततत्त्वाची जागृती होत असल्यामुळे ते ध्यानावस्थेत होते आणि नंतर पूजनानंतर ते पुन्हा सहजस्थितीत आले’, असे या वेळी जाणवले.
एरव्ही अशा सोहळ्यांमध्ये श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा पुष्कळ प्रमाणात व्यक्त स्वरूपात भाव जागृत झाल्याचे दिसून येते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याही मुखावर त्यांची भावस्थिती दिसून येते. ‘या सोहळ्यात मात्र सद्गुरुद्वयी ध्यानावस्थेतच आहेत’, असे जाणवत होते. दत्तगुरूंच्या आरतीतील ‘नेति नेति शब्द न ये अनुमाना । सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।।’ या पंक्तीप्रमाणेच ही स्थिती होती.
अलौकिक अनुभूती देणार्या गुरुदेवांप्रती कृतज्ञता !
हा सोहळा भावाच्याही पुष्कळ पुढच्या टप्प्यावर म्हणजे निर्गुण स्तरावर झाल्याचे जाणवले. पाद्यपूजन सोहळा पहातांना अनेक साधकांनाही ‘मन निर्विचार होणे’, ‘शांती अनुभवणे’, ‘ध्यान लागणे’ अशा प्रकारच्या अनुभूती आल्या. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उच्च आध्यात्मिक स्थितीमुळे ते विविध देवतांचे तत्त्व धारण आणि प्रक्षेपित करू शकतात. या कलियुगातही अशा प्रकारे उच्च लोकांतील दैवी वातावरण अनुभवण्याच्या अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१५.७.२०२२)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून पांढरी वलये प्रक्षेपित होत असल्याचे जाणवून ध्यान लागणे‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पूजन चालू असतांना त्यांच्याकडून पांढर्या रंगाची वलये वातावरणात प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवत होते. माझी पूजनस्थळी समन्वयाची सेवा चालू असल्यामुळे मी कानात ‘टॉकबॅक’ (चित्रीकरणाच्या वेळी चित्रीकरण करणार्या साधकांना एकमेकांशी समन्वय करता यावा, यासाठी वापरण्याचे हेडफोनसारखे उपकरण) घातला होता. त्यामुळे पूजन चालू असले, तरी साधक एकमेकांशी करत असलेल्या समन्वयाचा आवाज सतत माझ्या कानावर पडत होता. असे असूनही पूजन चालू असतांना माझे ध्यान लागत होते, इतके निर्गुण स्तरावरील वातावरण पूजनस्थळी निर्माण झाले होते.’ – सुश्री (कु.) तेजल अशोक पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (१५.७.२०२२) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |