बंगालमधील उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक

  • शिक्षकांच्या भरती घोटाळ्याचे प्रकरण

  • चॅटर्जी यांच्या जवळच्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रुपये जप्त !

अर्पिता मुखर्जी व तृणमूल काँग्रेस सरकारचे उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी

कोलकाता (बंगाल) – शिक्षकांच्या भरती घोटाळ्याच्या प्रकरणी बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केली. एक दिवस आधी त्यांच्या जवळच्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर धाड टाकून ‘ईडी’ने अनुमाने २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती, तसेच २० भ्रमणभाष संचही जप्त केले आहेत. अटक करण्यापूर्वी ‘ईडी’ने चॅटर्जी यांची अनेक घंटे चौकशी केली होती. या प्रकरणीत केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) त्यांची एप्रिल आणि मे मासांमध्ये दोन वेळा चौकशी केली होती.

अर्पिता चटर्जी यांच्या व्यतिरिक्त ‘ईडी’ने शिक्षण राज्यमंत्री परेश अधिकारी आणि आमदार माणिक भट्टाचार्य, तसेच अन्य काही व्यक्तींवरही कारवाई केली आहे. भरती घोटाळ्याचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी ‘सीबीआय’च्या माध्यमातून करण्याचा आदेश दिला होता.

संपादकीय भूमिका

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता याविषयी गप्प का ? त्यांना या घोटाळ्याची माहिती नव्हती, असे त्या म्हणू शकतात का ? या प्रकरणी त्यांनी त्यागपत्रच देणे अपेक्षित आहे !