‘१८.१.२०२२ ते २६.१.२०२२ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला कुडाळ सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली. सेवाकेंद्रात रहाण्याविषयी कळल्यावर मला आनंद झाला. तिथे गेल्यावर ‘मी इथे कोणाला ओळखत नाही’, असे मला वाटलेच नाही. सर्व जण मला माझेच वाटले, तसेच तिथे मिळालेल्या प्रेमामुळे माझ्या मनात ‘इथून जाऊच नये’, असा विचार आला. त्या काळात मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या आढावा सत्संगात बसल्यावर ‘ते त्यांच्या प्रेमळ दृष्टीने मोकळेपणाने आढावा देण्यासाठी सांगत आहेत’, असे जाणवणे
कुडाळ सेवाकेंद्रात असतांना मला सद्गुरु सत्यवानदादांचा आढावा सत्संग लाभला. त्या आढावा सत्संगात बसण्यापूर्वी ‘मी इथे काही दिवसांसाठीच आले आहे, तर मग मी कसा आढावा सांगणार ?’, असा विचार माझ्या मनात येत होता. २ – ३ साधकांचा आढावा झाल्यावर सद्गुरु दादा माझ्याकडे पहात होते. तेव्हा मला वाटले, ‘ते मला आश्वस्त करत आहेत, ‘काही काळजी करू नकोस. सर्वकाही छान होणार आहे. तू मोकळेपणाने बोल. मी तुझ्या समवेत आहे.’
२. ‘सद्गुरु सत्यवान कदम यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होत आहे’, असे जाणवणे
आढाव्यात मी माझ्या चुका सांगितल्यावर सद्गुरु दादांनी ‘मी कसे प्रयत्न करायला हवेत ?’ याविषयी मला सांगितले. तेव्हा ‘त्यांच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत आणि तेच मला सांगत आहेत. सद्गुरु दादांच्या माध्यमातून मी प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टरांनाच भेटत आहे’, असे जाणवून ‘आता इथून कुठे जायला नको’, असे मला वाटायचे.
३. सद्गुरु सत्यवान कदम यांनी प्रसाद देऊन आश्वस्त केल्याचे जाणवून एकटीने प्रवास करण्याची भीती न्यून होणे
काही दिवसांनी मी रामनाथी आश्रमात जायला निघाले. मला कुडाळ सेवाकेंद्रातून रामनाथी आश्रमात येतांना एकटीने रेल्वेचा प्रवास करायचा होता. या आधी मी एकटीने कधी प्रवास न केल्याने मला भीती वाटत होती. मी सेवाकेंद्रातून निघतांना सद्गुरु दादांनी मला खाऊ दिला. त्यांनी मला खाऊ देताच माझ्या मनातील भीतीचे विचार न्यून झाले. ते त्यांच्या दृष्टीतून मला आश्वस्त करत होते, ‘मी तुझ्या समवेत आहे. काही काळजी करू नकोस.’
४. ‘सद्गुरु सत्यवान कदम यांच्या संकल्पानेच सेवेतील अडचणी दूर झाल्या’, असे जाणवणे
सद्गुरु दादांनी आढाव्यात मला जे प्रयत्न सांगितले होते, ते प्रयत्न मी रामनाथी आश्रमात आल्यावर केले. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळाला. ‘ज्या सेवेसंदर्भात माझा संघर्ष होत होता, त्या सेवेतील सर्व अडचणी त्यांच्याच संकल्पाने दूर झाल्या’, असे मला वाटले.
यातून ‘भगवंत संतांच्या माध्यमातून अडचणी कशा दूर करतो ?’, हे मला शिकायला मिळाले. श्रीकृष्णाच्या कृपेमुळे मला हे अनुभवता आले, त्याबद्दल श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’
– कु. वैदेही गजानन खडसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२६.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |