मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांचे संघटन करा !

मंदिरे ही उपासनेची केंद्रे झाली, तर त्या माध्यमातूनच समाजाचे आध्यात्मिक बळ वाढून त्यातून राष्ट्रातील धर्म टिकण्यास साहाय्य होईल !


मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत. धर्मरक्षणाच्या दृष्टीकोनातूनही मंदिरांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. आतापर्यंतच्या ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारांनी मंदिरांमध्ये भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या अर्पणनिधीवर डोळा ठेवून शेकडो मंदिरांचे सरकारीकरण केले आहे. सध्या सरकारच्या नियंत्रणात नसलेल्या सार्वजनिक किंवा खासगी मंदिरांवर हा सरकारीकरणाचा वरवंटा कधीही फिरू शकतो. सरकारी नियंत्रणात नसलेल्या अनेक मंदिरांसमोर आज मंदिरांचे संरक्षण करणे, नित्याची पूजा करणे, जीर्णाेद्धार करणे यांसारख्या अनेक समस्या आहेत. मंदिरे म्हणजे केवळ दगडी किंवा संगमरवरी वास्तू नसून त्यामध्ये साक्षात् परमात्म्याचा वास असतो. त्यामुळे या मंदिरांच्या रक्षणासाठी, मंदिरांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी, तसेच भविष्यात मंदिरांवर कुठलेही संकट येऊ नये, यासाठी अखंड सावध रहाण्याची आवश्यकता आहे. ‘कलियुगात संघटित रहाण्यात शक्ती आहे’, असे म्हटले आहे. आज व्यापारी, पत्रकार, आधुनिक वैद्य, अधिवक्ते, शिक्षक, कामगार आदी घटकांचे संघटन आहे; पण मंदिरांचे विश्वस्त, तसेच पुजारी यांचे नाही. त्याच दृष्टीकोनातून मंदिर आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी वर्ष २०१९ मध्ये गोवा येथे झालेल्या ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये ‘राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृती रक्षण अभियाना’स आरंभ करण्यात आला. सरकार नियंत्रित नसलेल्या मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांचे संघटन करण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या या अभियानाला भगवंताच्या कृपेने भरभरून प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सांगण्यात आला. त्याविषयीची माहिती वाचकांसाठी येथे देत आहोत.

१. मंदिरे हा भाविकांना धर्माशी जोडणारा दुवा

श्री. सुनील घनवट

समाजात असा एक गट आहे, जो हिंदुत्वाच्या कार्यात प्रत्यक्ष सक्रीय नाही; पण तो भाविक आहे. हा घटक कुठल्या हिंदुत्वनिष्ठ किंवा आध्यात्मिक संघटनेशीही जोडलेला नाही; पण तो नियमितपणे मंदिरांत जातो. अशांना धर्मकार्याशी जोडून घ्यायचे असेल, तर मंदिरे हा दुवा आहे. पूर्वीच्या काळी मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले जात असे. त्यामुळे साहजिक मंदिरांच्या माध्यमातून सर्वसामान्य भाविकाची धर्माशी असलेली नाळ घट्ट होत असे. आजच्या काळातही ते साध्य करायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला संघटितपणे प्रयत्न करावे लागतील.

२. ‘राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृती रक्षण अभियाना’च्या अंतर्गत करण्यात आलेले प्रयत्न

‘राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृती रक्षण अभियाना’च्या अंतर्गत मंदिरांचे विश्वस्त, पदाधिकारी, पुजारी, मठाधिपती यांच्या संघटनासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले.

२ अ. विश्वस्तांच्या बैठका, चर्चासत्रे, निवेदने, आंदोलने करणे : १९ मार्च २०२० या दिवशी भारतभरातील १ सहस्रहून अधिक मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, पुरोहित, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांचे राष्ट्रीय स्तरावरील ‘ऑनलाईन’ अधिवेशन झाले. यामध्ये ‘मंदिरांचे धर्मपूरक संचलन होण्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत ?’, ‘मंदिर संस्कृती टिकवून ठेवण्यामध्ये येणारी आव्हाने कोणती आहेत?’, ‘त्यावर उपाययोजना काय आहेत ?’, आदींविषयी चर्चा झाली. या अधिवेशनामुळे सर्वांनाच एक व्यापक दृष्टी मिळाली आणि समस्यांच्या निराकरणासाठी स्थानिक पातळीवर कृतीशीलता वाढली. या राष्ट्रीय मंदिर अधिवेशनानंतर अनेक राज्ये आणि जिल्हे यांमध्ये मंदिरांच्या विश्वस्तांच्या नियमित बैठका होऊ लागल्या. या बैठकांमधून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिराच्या एका पदाधिकाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रातील इतर मंदिरांच्या विश्वस्तांसाठी एका अधिवेशनाचे आयोजन केले. त्यामध्येही जागृती करण्यात आली. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी मंदिरांवरील आघातांच्या विरोधात प्रशासनाला निवेदने देण्यात आली. सामाजिक माध्यमांतूनही मंदिरांवर होणाऱ्या आघातांविषयी जागृती करण्यात आली.

२ आ. सरकारीकरण झालेल्या कर्नाटकच्या मुकांबिका मंदिरातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणे : कर्नाटकातील सरकारीकरण झालेल्या सुप्रसिद्ध मुकांबिका मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले. या मंदिरात सोने, मालमत्ता आणि निधी यांची प्रचंड प्रमाणात लूट झाली होती. याविषयी ‘राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृती रक्षण अभियाना’च्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघा’ने बैठका आणि पत्रकार परिषद यांच्या माध्यमांतून लोकजागृती केली, तसेच दोषींवर कारवाई करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनेही केली. याविषयी तेथील मंत्र्यांसमवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला महासंघाच्या कार्यकर्त्यांनाही बोलावण्यात आले होते. महासंघाने हाताळलेला हा विषय राज्यात एक महत्त्वपूर्ण विषय बनला.

सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये कशा प्रकारे अपप्रकार होतात ? ते आपल्याला ठाऊक आहे. सरकारीकरण झालेल्या अनेक मंदिरांमध्ये देवस्थानच्या भूमी, देवनिधी, तसेच देवांचे दागिने यांमध्ये घोटाळे करणे, गोशाळांमधील अनागोंदी कारभार, मंदिराच्या प्राचीन परंपरांमध्ये हस्तक्षेप करणे, मंदिरे अवैध ठरवून ती पाडणे, परंपरागत पुजारी हटवून त्या ठिकाणी वेतनधारी पुजारी नेमणे, न्यासामध्ये अन्य पंथियांची नियुक्ती करणे, मंदिराच्या परिसरात मांसविक्रीची दुकाने असणे आदी माध्यमांतून मंदिरांचे पावित्र्य धोक्यात येण्याचे प्रकार घडले आहेत. हे रोखण्यासाठी प्रयत्न करणे, हासुद्धा या ‘राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृती रक्षण अभियाना’चा मुख्य हेतू आहे.

३. ‘राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृती रक्षण अभियाना’ची फलनिष्पत्ती

३ अ. कोरोना महामारीनंतर दळणवळण चालू होण्याच्या (‘अनलॉक’च्या) प्रक्रियेच्या वेळी मंदिरे उघडण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणे : कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र दळणवळण बंदी लागू होती. जेव्हा निर्बंध शिथिल झाले आणि दळणवळण चालू होण्याच्या प्रक्रियेला आरंभ झाला, तेव्हा ‘राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृती रक्षण अभियाना’च्या अंतर्गत मंदिरे उघडण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने मात्र मंदिरांऐवजी मदिरालये (मद्यालये) अर्थात् दारूची दुकाने उघडायला प्राधान्य दिले ! त्यामुळे ‘राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृती रक्षण अभियाना’च्या माध्यमातून ‘मंदिरे उघडण्यात यावीत’, या मागणीसाठी आंदोलने करण्यात आली, तसेच अनेक ठिकाणी निवेदने देण्यात आली. शासन दरबारी पत्रव्यवहार करण्यात आला, तसेच लोकांमध्ये जागृती करण्यात आली. परिणामी वाढत्या जनरेट्यामुळे महाराष्ट्र सरकारला भाविकांसाठी मंदिरे उघडावी लागली.

३ आ. बेळगाव (कर्नाटक) येथील मंदिरांच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित होणे : कर्नाटकातील बेळगाव येथे स्थानिक प्रशासनाने १६ समाज मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा घाट घातला होता. याविरोधात ‘राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृती रक्षण अभियाना’च्या अंतर्गत मंदिरांचे विश्वस्त, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांनी एकत्रित बैठका घेतल्या, तसेच पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय रहित करण्याची मागणी केली. मंदिरांचे सरकारीकरण केले, तर व्यापक लढा उभारण्याची चेतावणी ‘राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृती रक्षण अभियाना’ने दिली. परिणामस्वरूप २ दिवसांत सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला.

३ इ. कर्नाटकमधील मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणे : सर्वत्रच्या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याच्या संदर्भातही ‘राष्ट्रीय मंदिर आणि संस्कृती रक्षण अभियाना’च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. कर्नाटक राज्यामध्ये प्रत्येक मंदिरात वस्त्रसंहिता लागू होण्यासाठी मंदिरांचे विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी सरकारला निवेदने दिली. परिणामस्वरूप कर्नाटकातील अनेक मंदिरांत वस्त्रसंहिता लागू झाली आहे. अर्थात् मंदिरांमध्ये तोकडे कपडे किंवा असभ्य वस्त्र घालून जाता येणार नाही. सभ्य वस्त्रांमध्ये मंदिरात
प्रवेश मिळेल.

३ ई. पुरी (ओडिशा) येथील सुप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रेवरील बंदी उठणे : पुरी (ओडिशा) येथील सुप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराची रथयात्रेची परंपरा कायम राखण्यातही हिंदुत्वनिष्ठांना यश मिळाले. कोरोना महामारीच्या काळात सरकारचे सर्व नियम पाळून रथयात्रेची शेकडो वर्षांची परंपरा खंडित होऊ न देण्याची सिद्धता श्री जगन्नाथ मंदिराने केली होती; मात्र या रथयात्रेच्या विरोधात ओडिशा उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली. त्यावर न्यायालयाने रथयात्रेवर बंदी घातली. याविषयी हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. रथयात्रेच्या परंपरेच्या रक्षणासाठी देण्यात आलेल्या कायदेशीर लढ्याला श्री जगन्नाथाच्या कृपेने यश मिळाले आणि रथयात्रेवरील बंदी उठवण्यात आली.

३ उ. नगर येथे धर्मांधांच्या हिंदुविरोधी कृतीच्या विरोधात पोलीस-प्रशासनाला निवेदन देणे : धर्मांधांकडून नगर जिल्ह्यातील (महाराष्ट्र) नांदगाव येथील श्री हनुमान मंदिरात काही वस्तू जाळण्यात आल्या होत्या. या प्रकरणी मंदिराचे विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी पोलीस-प्रशासनाला निवेदन दिले.

३ ऊ. मंदिरात घंटा वाजवण्यावर पोलिसांनी घातलेली बंदी त्यांना मागे घ्यावी लागणे : कर्नाटकातील एका मंदिरात पोलिसांनी घंटा वाजवण्यावर बंदी घातली होती. याविरोधात आवाज उठवल्यावर ही बंदी मागे घेण्यात आली. आपण मंदिर-संस्कृतीच्या रक्षणासाठी कृतीशील झालो, तर सरकारी वरदहस्त नसतांनाही भगवंतच कशा प्रकारे यश मिळवून देतो, हे यातून लक्षात येते. आज मंदिरे ही पर्यटन केंद्रे म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न होत असतांना कुणी मंदिरांचे चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर त्याच्यावर देवाची कृपा का नाही होणार ?

४. मंदिरे ही उपासनेची केंद्रे बनावीत !

मंदिरे ही चैतन्याचे स्त्रोत आहेत. आज मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना विरोध म्हणून का होईना; पण मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण होऊ लागले आहे. अनेक मंदिरांमध्ये महाआरती होत आहे. आता आपण मंदिरे ही सामूहिक उपासना केंद्रे बनण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया. मंदिरे ही उपासनेची केंद्रे झाली, तर त्या माध्यमातूनच समाजाचे आध्यात्मिक बळही वाढेल. ‘मंदिरे टिकली, तरच धर्म टिकेल !’

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.