सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा आज ७ जुलै २०२२ या दिवशी १०२ वा जन्मोत्सव आहे. त्या निमित्ताने…
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरुडॉ. आठवले यांचे गुरु आणि सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा ७ जुलै या दिवशी जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त प.पू. बाबांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. केवळ सहवासातून अमूल्य शिकवण देणारे प.पू. बाबा यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
१. निरगुडकरांचे कुटुंबीय कुलदेवतांना मुलीच्या विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी कुलदेवतांच्या स्थानी जाणे
‘प.पू. रामानंद महाराज यांचा मुलगा लोकेशची (राजूची) मुलगी कृतिका हिचे लग्न ठरले होते. त्या लग्नाचे आमंत्रण कुलदेव, कुलदेवी आणि खंडोबा (निरगुडकरांकडे खंडोबाचे नवरात्र हा कुलाचार आहे.) यांना देण्यासाठी राजूचे कुटुंबीय निरगुडला गेले होते. निरगुड हे गाव जुन्नर तालुक्यात शिवनेरीच्या पायथ्याशी आणि नारायणगावापासून १० – १२ किलोमीटर अंतरावर आहे. निरगुडला कुलदेव हनुमानाला आमंत्रण पत्रिका देऊन ते पुढे निमदरीला कुलदेवीच्या दर्शनाला गेले. निमदरी हे गाव निरगुडपासून ५ – ६ किलोमीटर अंतरावर आहे. कुलदेवी रेणुकामातेला आमंत्रण पत्रिका देऊन ते पुढे धामणखेलला श्री खंडोबाला आमंत्रण देण्यासाठी गेले. धामणखेल हे गाव निमदरीपासून ४ – ५ किलोमीटर अंतरावर आहे.
१ अ. श्री खंडोबासाठी तळी घेतांना ती बांधणार असलेल्या वर्तमानपत्रावर प.पू. डॉ. आठवले यांचे छायाचित्र दिसणे : धामणखेल हे केवळ २०० – ३०० लोकवस्तीचे छोटेसे खेडेगाव आहे. खंडोबाचे मंदिर गावाबाहेर आहे. मंदिराच्या बाहेर एक बाई तळीचे सामान (खंडोबाला भंडारा (हळद) आणि खोबर्याची वाटी अशी तळी दिली जाते.) घेऊन दुकानात बसली होती. सौ. शिल्पाने (राजूच्या बायकोने) तळी घेतली आणि त्याचे पैसे दिले. तळी कागदात बांधून देण्यासाठी त्या बाईने बाजूचा नियतकालिकाचा कागद घेतला. ती त्यात तळी बांधणार एवढ्यात राजूला त्या कागदावर प.पू. डॉ. आठवले यांचे छायाचित्र दिसले; म्हणून त्याने तिच्याकडून तो कागद मागून घेतला.
१ आ. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉ. आठवले यांची छायाचित्रे पाहून ‘त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे’, असा भाव निर्माण होणे : तो कागद हातात आल्यावर त्याच्या लक्षात आले, ‘हा ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा कागद आहे. तो कागद सरळ केल्यावर त्याला वरच्या बाजूला प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र दिसले. ते छायाचित्र बघून सगळे जण आश्चर्यचकित झाले आणि सगळ्यांना गहिवरून आले. त्यांच्या बरोबर आलेले प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त श्री. शशिकांत ठुसेकाका भावविभोर झाले. ‘एका छोट्याशा खेडेगावात तळी बांधण्यासाठी ठेवलेल्या कागदात सनातनचे नियतकालिक असणे आणि त्यावर प.पू. भक्तराज महाराज अन प.पू. डॉ. आठवले यांची छायाचित्रे असल्याची अनुभूती येणे, म्हणजे आपल्याला प.पू. बाबांचा (प.पू. भक्तराज महाराज यांचा) आणि प.पू. डॉ. आठवलेकाका यांचा पूर्ण आशीर्वाद असून ते आपल्या पाठीशी आहेत’, अशी निरगुडकर कुटुंबीय यांची भावना झाली.
२. त्या खेडेगावातील मंदिरात प्रसंगाला साजेसे असणारे हिंदी भजन म्हटले जात असणे
पुढे मंदिरात गेल्यावर आणखी एक चमत्कार घडला. मंदिरात काही मंडळी प्रसिद्ध हिंदी भजन म्हणत होती, ‘मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है ।’, त्या खेडेगावात हे हिंदी भजन म्हटले जाणे आणि तेही प्रसंगाला साजेसे असणे, हेही एक आश्चर्यच होते.
अशा रितीने ‘प.पू. बाबांचे आपल्याकडे पूर्ण लक्ष आहे आणि ते आपल्या पाठीशी आहेत’, याची राजूची निश्चिती झाली.’
– डॉ. (सौ.) कुंदा आठवले, मुंबई. (५.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |