संभाजीनगर – ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ कधीच होऊ देणार नाही. या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयातही लढाई लढणार आहोत. लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी समिती स्थापन करण्यात येईल. कुणाच्या आजोबा आणि पणजोबा यांची इच्छा होती; म्हणून ‘औरंगाबाद’चे नाव पालटू देणार नाही, अशी चेतावणी ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांच्या पुढाकाराने ५ जुलै या दिवशी झालेल्या बैठकीत देण्यात आली. इम्तियाज जलील म्हणाले की, माझ्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रावर औरंगाबादच नाव राहील. मी नामांतराविरुद्ध लोकसभेत आवाज उठवीन. (हिंदुद्वेषी आणि धर्मद्रोही औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्या अशा लोकप्रतिनिधींना हिंदू खासदार म्हणून निवडून देतात ! – संपादक)
या वेळी इतिहासाचे अभ्यासक रमजान शेख, एम्.आय.एम्.चे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी आदी उपस्थित होते. ‘आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा आदर करतो; परंतु त्यांच्या नावाचा वापर करून द्वेषाचे राजकारण करू देणार नाही. औरंगाबादची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्राची ओळख मावळत्या महाविकास आघाडी सरकारने पुसली आहे. आम्ही त्यास विरोध करतो’, असा सूर बैठकीत होता. पक्ष-संघटना यांचे विचार बाजूला ठेवून नामांतर विरोधासाठी सगळे एकाच मंचावर येऊ, असे सर्वांनी सांगितले. (हिंदूंनीही संघटित होऊन ‘संभाजीनगर’ नामांतरासाठी एकाच मंचावर येणे, ही काळाची आवश्यकता आहे. – संपादक)
(म्हणे) ‘प्रत्येक शहरवासियाचे औरंगाबाद या नावाशी नाते जोडलेले आहे !’ – डॉ. पवन डोंगरे, काँग्रेसकाँग्रेसचे डॉ. पवन डोंगरे म्हणाले की, शहराला ३५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. प्रत्येक शहरवासियाचे औरंगाबाद या नावाशी नाते जोडलेले आहे. यासाठी संभाजीनगरविरुद्ध कायदेशीर लढाई लढावी लागेल. (गेल्या ७४ वर्षांत काँग्रेसने मुसलमानांचे लांगूलचालन केले आहे. त्यामुळे डोंगरे यांनी असे वक्तव्य करण्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. – संपादक) भारिपचे शहराध्यक्ष आणि माजी उपमहापौर किशोर थोरात म्हणाले की, लोकांच्या भावना जाणून न घेता केलेल्या नामांतराला आमचा विरोध आहे. ही औरंगाबादकरांच्या अस्मितेची लढाई आहे. (ज्या औरंगजेबाने लाखो हिंदूंची हत्या केली, अनेक हिंदु महिलांवर अत्याचार केले, हिंदूंची सहस्रो मंदिरे उद्ध्वस्त केली, त्याच्या नावासाठी ‘अस्मितेची’ लढाई लढणार्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक) |
संपादकीय भूमिका‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ नामकरण होण्यासाठी आता हिंदूंनी एकत्रित येऊन ‘संभाजीनगर’ नामकरणासाठी आग्रही रहावे ! |