सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणाऱ्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

५.७.२०२२ या दिवशीच्या भागात (https://sanatanprabhat.org/marathi/594033.html) पू. रत्नमाला दळवी यांना साधनेमुळे स्वतःमध्ये झालेले पालट आणि ‘देवाने विविध प्रसंगांतून श्रद्धा कशी वाढवली ?’, ते पाहिले. आजच्या भागात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अगाध कृपा’ पहाणार आहोत.

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी

१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अगाध कृपा !

१० अ. एका प्रसंगात ‘प.पू. डॉक्टर’, असा नामजप एकाग्रतेने होऊन प्रसंगाला न घाबरता सामोरे जाता येणे : वर्ष २००८ मध्ये माझे रामनाथी आश्रमात सेवेसाठी जाण्याचे नियोजन झाले. भगवंताच्या कृपेने तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझ्या साधनेला आरंभ झाला. त्यानंतर एका प्रसंगात माझा ‘प.पू. डॉक्टर’, असा नामजप अगदी एकाग्रतेने होत होता. त्यामुळे मला या प्रसंगाला न घाबरता सामोरे जाता आले. यापूर्वी मी कधीही ‘प.पू. डॉक्टर’, असा नामजप केला नव्हता आणि इतक्या एकाग्रतेने माझा नामजप कधीही झाला नव्हता. ‘हे कसे घडले  ?’, हे त्या सनातन संस्थेच्या निर्मात्यांनाच ठाऊक ! पूर्वी मला केवळ एकदाच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला होता; मात्र या प्रसंगानंतर माझी श्री गुरूंवरील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील) श्रद्धा वाढत गेली.

१० आ. सेवेविषयी पूर्ण अनभिज्ञ असतांना इतरांच्या चुकांमधून गुरुकृपेने सेवा शिकणे : ‘माझ्याकडे एका सेवेचे दायित्व असले, तरी उत्तरदायी साधक सांगतील, ते प्रामाणिकपणे करणे’, एवढ्यापुरतेच ते मर्यादित होते. माझे शिक्षण कला शाखेतून झाले असल्याने या सेवेतील अनेक बारकाव्यांचे मला थोडेसेही ज्ञान नव्हते किंबहुना ‘ती सेवा म्हणजे
काय ?’, हेही मला ठाऊक नव्हते. अनेक साधक काही वर्षांपासून ही सेवा करत होते आणि त्या सर्वांमध्ये मी नवीन होते. काही दिवसांनी या सेवेतील चुका उत्तरदायी साधकांनी नियमितपणे लक्षात आणून देण्यास आरंभ केला. माझ्यासाठी हे सर्व नवीन असल्याने एक चूक म्हणजे या सेवेतील एक नवीन विषय मला समजत होता. अशा प्रकारे मला या सेवेतील अनेक विषय समजू लागले. जवळपास वर्षभर हे सर्व चालू होते. एका प्रकारे ही शुद्धीकरण प्रक्रियाच चालू होती. ‘यातून योग्य काय असायला
हवे ?’, हे मला समजत होते. एका प्रकारे ही ‘श्री गुरूंची माझ्यावर पुष्कळ मोठी कृपाच होत होती’, हे आता माझ्या लक्षात येते.

११. आश्रमातील फलकावर सेवेच्या चुकांविषयी चौकट लिहिलेली वाचून सेवा चांगली करण्याचा मनाचा निश्चय होणे

आमच्या सेवेतील चुकांविषयी आश्रमातील फलकावर अनेक चुकांच्या चौकटी लागत असत. यामध्ये एकदा ‘ईश्वरी राज्यात अशा चुका करणारे साधक नसतील’, अशा आशयाची चौकट लागली होती. त्यातील चुका आणि त्याचे परिणाम मला फारसे कळले नव्हते; मात्र चौकटीचा मथळा माझ्या अंतर्मनावर पुष्कळ परिणाम करून गेला. ‘ईश्वरी राज्यात ‘असे साधक’ असतील, अशी चौकट लागायला हवी’, असा विचार मनात येऊन गेला. त्यासाठी माझ्याकडून ‘प्रामाणिकपणे आणि उत्तरदायी साधक सांगतील, तसे प्रयत्न करायचे’, असा निश्चय आपोआप झाला. ‘हा विचार देणारे गुरुदेवच होते’, हे आता अनुभवता येत आहे. याविषयी मी कधी कुणाला काही बोलले नव्हते. पुढे काही दिवस अधून-मधून मला वरील विचाराची आठवण यायची. त्यानंतर मी तो विचार पूर्णपणे विसरून गेले. १०.३.२०२२ या दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याशी बोलतांना मला वरील विचाराची आठवण झाली. त्यांनीच ‘हे सूत्र लिहून द्यायला हवे’, हे माझ्या लक्षात आणून दिले.’

१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याची आलेली प्रचीती !

१२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा माझ्या सेवेसाठी झालेला संकल्प ! : काही दिवसांनी उत्तरदायी साधकांनी सांगितले, ‘‘रत्नमालासह अन्य दोन साधिका काही सेवांचे दायित्व पहातील.’ त्या वेळी ‘मी उत्तरदायी सेवक म्हणून सेवा पहायची आहे’, हे माझ्या लक्षात आले नाही. असे असले, तरी ‘सेवा कधी आणि कशी चालू झाली ?’, ते माझ्या लक्षातही आले नाही. पूर्वी एकदा आम्ही काही साधक परात्पर गुरुदेवांकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) काही कारणानिमित्त गेलो होतो. तेव्हा परात्पर गुरुदेव आजारी असल्याने झोपून होते. त्यांच्याशी माझी ओळख करून दिल्यावर ते म्हणाले, ‘‘आता सर्व हीच पहाणार ना !’’ त्यांच्या या वाक्याचा अर्थ मला तेव्हाही कळला नव्हता किंवा ‘त्यामध्ये काहीतरी वेगळे आहे’, हे तेव्हाही माझ्या लक्षात आले नव्हते; मात्र ‘आजही माझ्याकडून ज्या सेवा ते सूक्ष्मातून करवून घेत आहेत, त्या सेवा मी करत नसून त्यांचा संकल्पच करत आहे’, हे मी क्षणोक्षणी अनुभवत आहे. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. त्यामुळे साधक जेव्हा मला विचारतात, ‘‘तुला हे सर्व कसे जमते ?’’, तेव्हा माझ्या मनात पहिला विचार येतो आणि तो म्हणजे ‘श्री गुरूंचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) संकल्प !’

कुठलीही सेवा असली, तरी माझा ‘ती प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातील आनंद घ्यायचा’, एवढाच विचार असतो.

१२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘कुठलीही सेवा त्या त्या दिवशी पूर्ण व्हायला हवी’, असे सांगितल्यावर त्या दिशेने प्रयत्न करण्याचा निश्चय होणे : एकदा परात्पर गुरुदेव म्हणाले होते, ‘‘कुठलीही सेवा त्याच दिवशी पूर्ण व्हायला हवी.’’ इथेच गुरुदेवांचा संकल्प झाला. गुरुदेवांचे हे वाक्य माझ्या मनात पुष्कळ खोलवर रुजले आणि मी त्या दिशेने प्रयत्न करायचा निश्चय केला. प्रत्यक्षात ही गोष्ट पुष्कळ कठीण होती; परंतु तरीही तेव्हा माझ्या मनात कोणताही नकारात्मक विचार आला नाही किंवा मला ताणही आला नाही. गुरुदेवांनी दिलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले. ‘आजही काही कारणाने सेवा प्रलंबित रहात आहे’, असे माझ्या लक्षात आले, तर परात्पर गुरु डॉक्टरांच्या वरील वाक्याची आठवण येऊन ‘अजून काय प्रयत्न करायला हवेत ?’, असा विचार येतो आणि ‘काय करायला
हवे ?’ हेही तेच मला आतून सुचवतात.

१३. सेवेची व्याप्ती वाढणे आणि देवानेच त्या सेवा करून घेण्याचे बळ दिल्याची प्रचीती येणे

१३ अ. सेवांची वाढलेली व्याप्ती आणि अपुरी साधकसंख्या यांमुळे सेवांचा ताण येणे : वर्ष २०१४ मध्ये सेवेच्या अंतर्गत कार्यपद्धतीमध्ये पालट झाले. त्यामुळे माझ्या सेवेची व्याप्ती पुष्कळ वाढली. त्याच काळात सेवा करणारे दोन साधक त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे घरी गेले. ‘सेवेची वाढलेली व्याप्ती आणि अपुरी साधकसंख्या’ यांमुळे ‘सेवा वेळेत कशी पूर्ण
होणार ?’, हा विचार आणि माझ्यातील कर्तेपणा यांमुळे मला पुष्कळ ताण आला. माझ्या मनात ‘पूर्वीप्रमाणे चुका व्हायला नकोत’, ही भीतीही होती.

१३ आ. एका संतांच्या कृपेने त्यांच्याशी बोलल्यावर ताण न्यून होणे अन् सेवांची घडीही बसणे : याच सुमारास एका संतांनी या सेवेचा आढावा घ्यायला आरंभ केला. मला सेवेचा ताण आल्यावर मी लगेचच त्या संतांना लघुसंदेश पाठवत असे. संत माझ्याशी बोलल्यावर माझा ताण न्यून होत असे. ‘असे करतांना वर्षभरात त्या नवीन कार्यपद्धतीची घडी कशी
बसली ?’, हे मला कळलेही नाही. ही केवळ त्या संतांचीच कृपा होती.

१३ इ. वर्ष २०१६ मध्ये उत्तरदायी साधकांनी अजून एक सेवा करायला सांगणे आणि ‘ती कशी करायची ?’, तेही सांगितल्यामुळे सेवेचा ताण न येता सेवा होऊ लागणे : वर्ष २०१६ च्या शेवटी उत्तरदायी साधकांनी मला अजून एक सेवा करायला सांगितली. ही सेवाही माझ्यासाठी नवीन होती. एका संतांनी मला या सेवेची कार्यपद्धत घालून दिली आणि ‘ती सेवा कशी करायची ? त्या सेवेचा आढावा कसा द्यायचा ?’, हेही त्यांनीच मला शिकवले. त्यामुळे मला त्या सेवेचा किंचित्ही ताण आला नाही किंवा माझ्या मनात ‘मला जमेल का ?’, असा विचारही आला नाही.

१४. ‘रामनाथी येथे येऊन संतांना या सेवेचा आढावा द्यायचा आहे’, असे एका संतांनी सांगितल्यावर ‘संतांना भेटता येणार’, याचाच मला अधिक आनंद होणे

त्या संतांनी मला सांगितले, ‘‘प्रत्येक २ – ३ मासांनी रामनाथी (गोवा) येथे येऊन या सेवेचा आढावा द्यायचा. श्री गुरूंच्या कृपेने मिळालेल्या सेवेचा लाभ करून घे.’’ या सेवेपेक्षा ‘मला संतांकडे जायला मिळणार’, याचाच मला फार आनंद झाला होता.

१५. सर्वसामान्य जिवांकडूनही योग्य सेवा करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आरंभी मी सेवेच्या अंतर्गत ‘साधकांच्या सेवांचे समन्वय आणि सेवांचे नियोजन करणे’ या सेवा करत होते. वर्ष २०२१ पासून माझ्यावरील सेवेचे दायित्व वाढल्यावर खऱ्या अर्थाने मला श्री गुरूंची कृपा अनुभवता येऊ लागली. या सेवेसंबंधी मला कसलाही अनुभव नसतांना ‘ही सेवा करणे’ ही माझ्यासाठी अशक्यच गोष्ट होती; मात्र ‘गुरुदेवांच्या कृपाछत्राखाली काहीच अशक्य नाही’, हे माझ्या प्रकर्षाने लक्षात आले. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य जिवाकडूनही गुरुदेव ही कठीण सेवा करवून घेत आहेत.

यातून ‘गुरुदेवांचा शब्द किंवा संकल्प यांमध्ये किती सामर्थ्य आहे ?’, हे मला अनुभवता येत आहे.

(‘संस्थेतील अनेक साधक ही अनुभूती घेत आहेत. साधकांचे शिक्षण, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता नसतांना परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांमध्ये असामान्य क्षमता निर्माण करून अशक्यप्राय वाटणारी सेवाही त्यांच्याकडून लीलया करवून घेतात.’ – संकलक)

१६. कुटुंबियांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

मी पूर्णवेळ साधनेला आरंभ केल्यापासून आतापर्यंत देवाच्या कृपेने मला घरातून कधीच विरोध झाला नाही. ‘मी घरी यावे’, यासाठीही कुटुंबियांनी कधी आग्रह केला नाही. काही अवघड प्रसंगांच्या वेळी मी आश्रमात होते, तेव्हाही कुटुंबियांनी कोणतेही गाऱ्हाणे केले नाही किंवा मला घरी बोलावले नाही. माझ्या कुटुंबियांनी मला केलेल्या साहाय्यामुळेच आज मी साधनारत आहे. यासाठी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता !’       (समाप्त)

– (पू.) कु. रत्नमाला दळवी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.४.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक