संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाच्या वतीने केले पालखीचे स्वागत

टाळ हातात घेऊन ‘हरिनामा’च्या गजरात पालखी सोहळ्यात सहभागी झालेले विविध पदाधिकारी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ४ जुलै (वार्ता.) – पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदी येथून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ४ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. या वेळी माजी आमदार रामहरि रूपनवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी जिल्हा प्रशासनातील सर्व मान्यवर अधिकाऱ्यांनी टाळ हातात घेऊन ‘हरिनामा’चा गजर करत पालखी सोहळ्यासमवेत विसाव्यापर्यंत पायी चालले.