‘काली’ नावाच्या माहितीपटात श्री कालीमातेला सिगरेट ओढतांना दाखवले !

  • माहितीपटात श्री महकालीदेवीचा अश्‍लाघ्य अवमान !

  • हिंदूंकडून सामाजिक माध्यमांद्वारे विरोध करत पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना कारवाई करण्याची विनंती

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

मुंबई – भारतीय चित्रपट निर्मात्या लिना मणीमेकल यांच्या ‘काली’ नावाच्या माहितीपटाच्या व्हिडिओमध्ये श्री महाकालीदेवीच्या वेशभूषेत दाखवण्यात आलेली अभिनेत्री सिगरेट ओढत असल्याचे दिसत आहे. याचे एक भित्तीपत्रकही प्रसारित करण्यात आले आहे. ‘राइम्स ऑफ कॅनडा’ नावाच्या कार्यक्रमाच्या वेळी हे भित्तीपत्रक प्रसारित करण्यात आले. यावरील महिलेच्या हातात समलैंगिकतेच्या संदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. या अवमानाला सामाजिक माध्यमांतून विरोध केला जात आहे. ‘लिना मणीमेकल यांना अटक करा’, अशा अर्थाचा ‘#ArrestLeenaManimekal’ हा हॅशटॅग (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) अनेकांनी वापरला आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांच्याकडे या माहितीपटावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सामाजिक माध्यमांतून व्यक्त करण्यात येत असलेल्या प्रतिक्रिया

१. हिंदूंच्या भावना दुखावण्याचा हा मुद्दाम केलेला प्रयत्न आहे. व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की, कलेच्या नावाखाली तुम्ही काहीही कराल.

२. मी लिना मणीमेकल यांना विनंती करतो की, त्यांनी हे भित्तीपत्रक काढून टाकावे. यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत.

३. हे भित्तीपत्रक पाहून मला धक्का बसला. म.फि. हुसेन यांच्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांनाच हिंदूंच्या देवतांचा सन्मान न करण्यातून आनंद मिळतो आणि हाच तुमचा उद्देश असतो. हे आक्षेपार्ह आहे. कृपया हे भित्तीपत्रक काढून टाकावे.

संपादकीय भूमिका 

भारतात पाकिस्तानमध्ये असलेल्या ईशनिंदाविरोधी कायद्यासारखा कायदा नसल्याने अशा प्रकारे देवतांचा अवमान करणारे मोकाट रहातात. केंद्र सरकारनेही आता फाशीची शिक्षा असणारा कायदा तत्परतेने करावा, असेच हिंदूंना वाटते !