संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चालय कार्यालयाकडून तिस्ता सेटलवाड यांच्या सुटकेची मागणी  

भारताने कठोर शब्दांत सुनावले !

नवी देहली – संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेच्या उच्चायुक्त कार्यालयाकडून तिस्ता सेटलवाड यांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर भारताने ‘अशा प्रकारची मागणी करणे पूर्णपणे अयोग्य आहे’, अशा शब्दांत या कार्यालयाला सुनावले आहे. तिस्ता सेटलवाड यांना गुजरात दंगलीतील माहितीमध्ये फेरफार करणे आणि कायद्याचा आधार घेऊन चुकीचा प्रचार करणे यांप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

१. मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाने ट्वीट करून म्हटले होते की, तिस्ता सेटलवाड आणि दोन माजी पोलीस अधिकारी यांच्या अटकेविषयी आम्ही चिंतित असून त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करत आहोत. वर्ष २००२ मधील दंगलीच्या प्रकरणी त्यांचा आता छळ केला जाऊ नये.

२. या ट्वीटवर भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम् बागची यांनी म्हटले की,
हा प्रयत्न म्हणजे देशाच्या स्वतंत्र न्यायप्रणालीमध्ये हस्तपेक्ष करणे आहे. अन्वेषण यंत्रणांनी कायद्याच्या आधारे कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी मानवाधिकार कार्यालयाने विधान करणे अयोग्य आहे. या कारवाईला ‘छळ’ म्हणणे हे दिशाभूल करणारे आहे आणि ते स्वीकारता येणार नाही.