‘अग्नीवीर’ म्हणून भरती होण्यासाठी मराठी तरुणांनी सिद्धता कशी करावी ?

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. सैन्यात भरती होण्यासाठी मराठी युवकांनी ‘अग्नीपथ’ योजनेचा लाभ घ्यावा !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच ‘अग्नीपथ’ योजनेची घोषणा केली. योजनेच्या अंतर्गत ४५ सहस्र तरुणांना भारतीय सैन्यदलात भरती करून घेतले जाणार आहे. त्यांना पहिल्या वर्षात ३० सहस्र रुपये वेतन दिले जाईल. पुढील ४ वर्षांपर्यंत हे वेतन ४० सहस्र रुपये इतके होणार आहे. ४ वर्षांच्या काळात सैनिकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. सीमा सुरक्षा दलातही त्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच त्या त्या राज्यांची सरकारेही या तरुणांना नोकरीची संधी देतील. उत्तरप्रदेश, हरियाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांची सरकारे तरुणांना साहाय्य करणार आहेत.

पूर्वीची साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा आता २३ वर्षे अशी करण्यात आली आहे. या माध्यमातून मराठी तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला ४ ते ५ सहस्र जागा येऊ शकतात. पुढील ३ मासांत भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्याविषयीची माहिती भारतीय सैन्याच्या संकेतस्थळावर असेल किंवा महाराष्ट्रात असणाऱ्या सैन्यभरतीच्या अनेक केंद्रांमध्ये उपलब्ध असेल. ही केंद्रे मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर येथे आहेत. महाराष्ट्र सरकारचे ‘सैनिक वेल्फेअर डिपार्टमेंट’ असून त्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालये आहेत. त्यांच्याकडूनही संबंधित माहिती मिळू शकते. ‘रोजगार समाचार’ नावाच्या वर्तमानपत्रातही ही माहिती मिळू शकते.

२. भरती प्रक्रियेत उत्तीर्ण होण्यासाठी सिद्धता कशी करावी ?

सैन्य भरती केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतांना युवक

अ. भरती प्रक्रिया चालू होण्यास केवळ ३ मास शेष आहेत. उमेदवारांनी सर्वप्रथम पळणे, लांब उडी आदींचा सराव करावा, तसेच अधिकाधिक ‘पुल अप्स’ करता आले पाहिजेत. त्यासाठी शरीर सबळ हवे. शारीरिक क्षमतेसाठी ४० ते ५० टक्के गुण दिले जातात. अन्य गुण हे लेखी परीक्षेसाठी असतात. शारीरिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तेथेच वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले जाईल. त्यापूर्वी तुम्ही एखाद्या सैन्याच्या निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वैद्यकीय पडताळणी करून घ्या, म्हणजे आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहोत का ? हे कळेल आणि काही समस्या असतील, तर त्या दूरही करता येतील. ज्या समस्या दूर करण्यासाठी पुष्कळ उपचार करावे लागतील, अशा समस्या असणाऱ्यांनी सैन्याच्या भरतीसाठी जाण्याचे टाळावे.

आ. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पाठवले जाते. त्यात वस्तूनिष्ठ (‘ऑब्जेक्टिव्ह’) स्वरूपाचे १०० प्रश्न सोडवावे लागतात. त्याच्या सिद्धतेसाठी बाजारात विविध पुस्तके उपलब्ध आहेत. ज्यांना या भरतीमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांना बोलावलेल्या ठिकाणी १ दिवस आधी पोचावे लागेल.

इ. महाराष्ट्रात सरकारने काही विनामूल्य सैन्य भरती केंद्रे चालू केली आहेत. तेथे आपल्याला भरतीपूर्व प्रशिक्षण मिळू शकते. हे प्रशिक्षण सातारा, कोल्हापूर आणि बुलढाणा येथे मिळते. त्यासाठी २ सहस्र ते अडीच सहस्र रुपये शुल्क आकारले जाते. तेथे ८ ते १० आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. तेथे शारीरिक आणि लेखी परीक्षांचा सराव करून घेतला जातो.

३. तरुणांनी अग्नीपथ योजनेचा लाभ घ्यावा !

या भरतीसाठी १०-१२ लाख मुले बसतील आणि त्यातून ४५ सहस्र मुले निवडली जातील. त्यामुळे तुम्ही या ‘प्री रिक्रूटमेंट ट्रेनिंग सेंटर’मध्ये (सैन्य भरतीपूर्ण प्रशिक्षण केंद्रात) जाणे योग्य ठरेल. या भरती प्रक्रियेत ज्यांची निवड होईल, त्यांना ६ मासांचे प्रशिक्षण दिले जाईल. नंतर साडेतीन वर्षे नोकरी करावी लागेल. काहींना याविषयी विकल्प आहेत; परंतु आता कायमच्या नोकऱ्या मिळणे कठीण आहे. एक म्हण आहे, ‘हातातील एक पक्ष झुडुपात लपलेल्या २ पक्षांहून चांगला असतो.’ त्याप्रमाणे जे आपल्या आवाक्यात आहे, ते घेतले पाहिजे.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे