संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी पाकचे समर्थन नाही ! – पाकचे स्पष्टीकरण

पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अमेरिकेच्या दबावामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी पाकिस्तान भारताचे समर्थन करण्यास सिद्ध झाला आहे, असे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांकडून प्रसारित करण्यात येत आहे. याचे आता पाकिस्तान सरकारने अधिकृतपणे खंडण केले आहे. पाकने म्हटले की, पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी अलीकडेच अमेरिकेचा दौरा केला. त्या वेळी त्यांची अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा झाली; मात्र त्यात भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व देण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारत, ब्राझिल, जर्मनी, दक्षिण अफ्रीका आणि जपान स्थायी सदस्य बनण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. ‘लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि अर्थव्यवस्था यांच्या संसदर्भात आम्ही जगतील मोठ्या देशांमध्ये गणले जात आहोत. त्यामुळे आम्हाला स्थायी सदस्यत्व मिळण्याचा अधिकार आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे.