शाळेमध्ये शिक्षकांच्या भ्रमणभाष वापरावर निर्बंध !

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी सोलापूर येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कृती आराखडा सिद्ध

सोलापूर – जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील मुलांची गुणवत्ता वाढावी, कोरोना संसर्गाच्या काळातील मुलांची शैक्षणिक हानी भरून काढावी यांसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्याचा कृती आराखडा सिद्ध केला आहे. शाळेच्या वेळेत शिक्षकांना भ्रमणभाष वापरण्यावर निर्बंध लागू केले जाणार आहेत. शाळेच्या सुटीतच शिक्षकांना भ्रमणभाष वापरता येणार आहे. ‘मुलांना शिकवत असतांना शिक्षक भ्रमणभाष वापरू शकत नाहीत’, अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून त्याची प्रभावी कार्यवाही केली जाणार आहे. हा आदेश नवीन शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे.

मुलांची गुणवत्ता वाढावी, त्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती नेमली जाते; मात्र अलीकडे या समित्यांच्या निवडीत मोठ्या प्रमाणावर राजकारण होऊ लागले आहे. त्यामुळे आता ज्या पालकांच्या मुलांना मागील शैक्षणिक वर्षात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्याच पालकांचा शाळा व्यवस्थापन समितीत समावेश असणार आहे.

उपक्रमांची प्रभावी कार्यवाही बंधनकारक ! – दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

शाळांना सुटी लागण्यापूर्वी काही शाळांना भेटी दिल्या. त्या वेळी मुलांना देशाचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिनही ठाऊक नसल्याची वस्तूस्थिती पहायला मिळाली. कोरोना संसर्गाच्या काळातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी भरून काढण्यासाठी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार असून, त्याची प्रभावी कार्यवाही बंधनकारक असेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.