पाकिस्तानकडून होणारी सायबर आक्रमणे आणि भारताची सुरक्षा !

१. पाकिस्तानने सामाजिक माध्यमांद्वारे भारतविरोधी कारवाया करणे आणि त्यात महत्त्वाच्या माहितीची चोरी केली जाणे

‘पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याशी भिडण्याचे धाडस नाही. त्यामुळे तो ‘सायबर वॉर’च्या (एखाद्या देशाच्या धोरणात्मक किंवा लष्करी हेतूंसाठी संगणकीय प्रणालीवर जाणीवपूर्वक आक्रमण करणे) माध्यमातून भारताला त्रास देण्याचा सतत प्रयत्न करतो. भारतात ५० टक्क्यांहून अधिक लोकांकडे ‘ॲँड्रॉईड’ भ्रमणभाष संच आहेत. त्यामुळे सायबर आक्रमण हा पाकिस्तानच्या छुप्या युद्धाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. अशा प्रकारचे सायबर आक्रमण पाकिस्तान स्वत: करत नाही. पाकिस्तान आणि काश्मीर यांच्यामध्ये असलेल्या ‘फ्रंट ऑर्गनाझेशन’च्या माध्यमातून हे युद्ध केले जाते. अमेरिकेच्या अन्वेषण यंत्रणेने म्हटल्याप्रमाणे ३ पाकिस्तानी आस्थापने आहेत. त्यांना ‘ॲडव्हान्स परर्सिस्टंट थ्रेट’ या नावाने संबोधण्यात आले आहे. हे पाकिस्तान समर्थित ‘हॅकर्स’ आणि गट भारतीय संस्थांचे ‘इमेल’, संदेश आणि संगणकातील धारिका वाचून त्यातील महत्त्वाच्या माहितीची चोरी करतात.

अलीकडच्या १० ते १२ वर्षांच्या काळात काश्मीरमध्ये सामाजिक माध्यम (सोशल मिडिया) नावाचा प्रकार अतिशय लोकप्रिय झाला आहे. सर्व सुशिक्षित लोक फेसबूक, यू ट्यूब आणि ट्विटर यांचा वापर करतात. काही लोक भारतविरोधी कारवाया करण्यासाठीही या माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या सामाजिक माध्यमांना कोणत्याही राष्ट्रीय सीमा नसतात. त्यामुळे मध्य पूर्वेत किंवा अन्य देशांत घडणाऱ्या गोष्टी काश्मीरमध्ये सहजपणे पोचतात.

२. पाकिस्तानी आतंकवाद्यांनी संदेशांच्या देवाणघेवाणीसाठी नवनवीन ‘ॲप’चा वापर करणे आणि भारतीय तंत्रज्ञांनी त्यावर मात करण्याचा सतत प्रयत्न करणे

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

२ अ. रेडिओ, सॅटेलाईट आणि भ्रमणभाष अशा विविध माध्यमांचा आतंकवाद्यांनी वापर करून घेणे : काश्मीरमधील ‘फेसबूक वॉरिअर्स’ (फेसबूक योद्धा) अधिक कट्टर आहेत. काश्मीरमध्ये पसरलेल्या ‘इंटरनेट’ जाळ्याचा पाकिस्तान खुबीने वापर करत आहे. पूर्वी आतंकवादी समन्वय साधण्यासाठी रेडिओ संचाचा वापर करत असत. त्यानंतर ही गोष्ट भ्रमणभाष संचाच्या माध्यमातून होऊ लागली. आता ‘सॅटेलाईट’ दूरभाषच्या माध्यमाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे त्यांचे संदेश पकडणे अतिशय कठीण असते; परंतु काळानुसार भारतीय सुरक्षा यंत्रणा ‘सॅटेलाईट’ दूरभाषवरील चर्चा ऐकण्यात पारंगत झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानी आतंकवाद्यांनी ‘व्हॉट्सॲप’, ‘टेलिग्राम’, तसेच ‘सिग्नल’ या संपर्क ‘ॲप’चा वापर चालू केला. ‘व्हॉट्सॲप’चे संदेश ‘एन्ड टू एन्ड’ ‘इन्क्रिप्टेड’ (संदेशांचे वाचता न येणाऱ्या भाषेत किंवा सांकेतिक भाषेत रूपांतर करणे) असतात. त्यामुळे ‘इन्क्रिप्शन कोड’ असल्याविना हे संदेश पकडता येणे अवघड असते. ‘इन्क्रिप्शन कोड’ तोडणे, हे भारतीय सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे.

२ आ. पाकिस्तानी सैन्याने सिद्ध केलेले काही ‘ॲप’ ‘गूगल प्ले स्टोअर’मध्ये उपलब्ध नसल्याने त्याद्वारे केलेली संदेशांची देवाणघेवाण समजून घेता न येणे : पाकिस्तानने त्यांच्या आतंकवाद्यांसाठी एक ‘इन्क्रिप्टेड ॲप’ चालू केले. त्यावर भारतानेही प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. भारताची ‘एन्.टी.आर्.ओ.’ (नॅशनल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन) ही तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुप्तहेर माहिती काढणारी महत्त्वाची संस्था आहे. तिच्या अंतर्गत भारताच्या ‘नॅशनल क्रिटीकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर’ आणि ‘सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ या २ संस्था सायबर आक्रमणे किंवा ‘हॅकिंग’ यांवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे आतंकवादी ‘टेलिग्राम’, ‘सिग्नल’ अशा अधिक सुरक्षित ‘ॲप्स’चा वापरत करत आहेत. पाकिस्तानी सैन्यानेही काही ‘ॲप’ सिद्ध केले आहेत; पण ते ‘गूगल प्ले स्टोअर’मध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या ‘ॲप’द्वारे केलेली संदेशांची देवाणघेवाण समजून घेणे कठीण आहे. भारत यावरही मात करण्याचा प्रयत्न करत आहे.

२ इ. अधिक परिणामकारक ठरणाऱ्या ‘इन्क्रिप्टेड कम्युनिकेशन’ ‘ॲप’चा वापर पाकिस्तानने करणे : तुर्कस्तानचे ‘इन्क्रिप्टेड कम्युनिकेशन’ ‘ॲप’ अधिक परिणामकारक असतात. त्यामुळे पाकिस्तानी आतंकवादी त्यांचा अधिक वापर करत आहेत. हे आतंकवादी जेव्हा काश्मीरमध्ये घुसखोरी करतात, तेव्हा ते या माध्यमातून स्थानिक हस्तकांशी संपर्क वाढवतात. हे ‘इन्क्रिप्शन’ तोडण्यासाठी ‘सर्व्हर’पर्यंत जात नाही, तोपर्यंत ते संदेश कुणालाही पकडता येत नाहीत. ‘सर्व्हर’ अन्य देशात असेल, तर त्यासाठी आपल्या देशाला त्याचे चांगले सहकार्य असणे आवश्यक असते.

३. आतंकवाद्यांकडून ‘व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क’चा वापर होत असल्याने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे अतिशय कठीण जाणे

काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आले, तेव्हा तेथील ‘इंटरनेट’ सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्या वेळी आतंकवाद्यांनी ‘डार्क वेब’ (इंटरनेटचा छुपा भाग) चा वापर करणे चालू केले होते. ‘डार्क वेब’ हा ‘इंटरनेट’चा असा एक भाग आहे, ज्यात प्रवेश करणे अतिशय कठीण आहे. या नेटवर्कमध्ये सर्वजण प्रवेश करू शकत नाहीत. या ‘नेटवर्क’वर ‘पासवर्ड’ (संकेतांक), तसेच ‘सिक्युरिटी फिचर्स’ असतात. त्यामुळे त्याच्या आत प्रवेश करणे अतिशय कठीण असते. अलीकडचे आतंकवादी ‘ओनिअन राऊटर’ आदींचा वापर करतात. त्यामुळे त्यांचा साधारण दूरभाष संच उपग्रहाशी ‘लिंक’ होतो. त्याचा ‘सॅटेलाईट’ दूरभाष संचाप्रमाणे वापर करता येतो. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, ही इतकी सोपी गोष्ट रहात नाही.

४. पाकिस्तानने सायबर आक्रमणासाठी सामाजिक माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांचे सैन्य निर्माण करणे

पाकिस्तानने सामाजिक माध्यमांमध्ये काम करणारे एक सैन्य निर्माण केले आहे. ते भारताच्या विरोधात सतत द्वेष निर्माण करण्याचे काम करते. काश्मीरमध्ये भारतीय सैनिक आणि आतंकवादी यांच्यात चकमक चालू असेल, तर त्यांच्याकडून लगेच संदेश पाठवले जातात. त्यामुळे या सैनिकांवर दगडफेक करणारे त्वरित कृतीशील होतात. एवढेच नाही, तर जे चांगले लोक सरकारला साहाय्य करतात, त्यांच्यावरही आक्रमण केले जाते. अलीकडे काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यात निवडून आलेल्या लोकांनाही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

काही पाकिस्तानी ‘सायबर जिहादी’ हे ‘ऑनलाईन’ स्तंभलेखन किंवा संकेतस्थळे चालवतात. त्या माध्यमातून ते आतंकवादी साहित्य प्रकाशित करतात. ‘काश्मीर फाईट’ नावाच्या ‘ऑनलाईन’ लेखन स्तंभलेखनातून काश्मिरातील आतंकवादाला विरोध करणाऱ्यांचा सूड घेतला जातो. जेव्हा सुजात बुखारी या पत्रकाराचे नाव या स्तंभावर आले, तेव्हा त्याची हत्या करण्यात आली.

५. सायबर आक्रमणाची व्यापकता

सायबर आक्रमणाची व्यापकता पुष्कळ मोठी आहे. सायबर आक्रमणाचे विविध प्रकार असतात. त्यात केवळ संकेतस्थळ बंद पाडणे किंवा ‘हॅकिंग’ करणे एवढेच सीमित नाही. यात ‘पासवर्ड हॅकिंग’ किंवा ‘सोशल इंजिनीयरिंग’ केले जाऊ शकते, तसेच सामाजिक माध्यमातील तुमचा प्रवेशही थांबवला जाऊ शकतो. विविध प्रकारच्या ‘व्हायरस’चा वापर करून ‘संकेतस्थळ’ बंद पाडले जाऊ शकते, ‘ईमेल्स’चा डेटा (माहिती), तसेच ओळख यांची चोरी केली जाऊ शकते.

६. भारताच्या यंत्रणांवर वर्षातून ५० सहस्रांहून अधिक आक्रमणे होणे आणि पाकिस्तान अन् चीनही भारताचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ कधीच तोडू न शकणे, हे सायबर सुरक्षा यंत्रणांचे यश असणे

देशाची सर्व प्रकारची माहिती आज संगणकांमध्ये एकत्रित केलेली असते. सायबर क्षेत्रात प्रतिदिन काहीतरी नवनवीन संशोधन केले जाते. यात नवनवीन तंत्रज्ञान येत असते. त्या माध्यमातून आपल्या यंत्रणांना धोका पोचवला जाऊ शकतो. अशा धोक्यांपासून रक्षण करणे मोठे आव्हान आहे. या आव्हानाला भारत चांगल्या प्रकारे सामोरे जात आहे. सायबर आक्रमणांपासून महत्त्वाच्या भारतीय संस्थांचे रक्षण करण्यासाठी भारताची स्वत:ची ‘नॅशनल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन’ ही संस्था कार्यरत आहे. त्यांची ‘नॅशनल क्रिटीकल इन्फॉर्मेशन ॲँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर’ ही संस्था आहे. ती देशातील राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांच्या ‘सायबर नेटवर्क’चे रक्षण करते. तरीही जेव्हा त्यांच्यावर सायबर आक्रमण होते, तेव्हा त्याला ‘कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ ही यंत्रणा लगेच प्रत्युत्तर देते. या संस्थेला भारताच्या ‘क्रिटिकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर’चे रक्षण करण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळाले आहे. पाकिस्तानच नाही, तर चीनही भारताचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ कधी तोडू शकला नाही. यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न करून पाहिले. भारताच्या यंत्रणांवर वर्षातून ५० सहस्रांहून अधिक आक्रमणे होत असतात.

७. भारताने सायबर क्षेत्रातही ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून पाकिस्तानला ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !

पाकिस्तान भारतावर आक्रमणे करण्यासाठी प्रतिदिन नवनवीन प्रकारांचा वापर करत असतो. भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’ करून पाकिस्तानला धडा शिकवला. त्यामुळे जिहादी आक्रमणांना अचानक आळा बसला. अशाच प्रकारे भारताने ‘सायबर डोमेन’मध्येही एक ‘स्ट्राईक’ करणे आवश्यक झाले आहे. या माध्यमातून पाकिस्तानला दाखवून द्यायला पाहिजे की, तुम्ही आमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ला धोका देऊ शकता, तर आम्ही त्याहून मोठा धोका तुमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम’ला देऊ शकतो. पाकिस्तानला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी आक्रमक ‘सर्जिकल सायबर स्ट्राईक’ हा पर्याय वेळोवेळी वापरला पाहिजे.’