साधकांच्या श्रद्धेची परीक्षा असलेला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याचा सर्वाेकृष्ट अंतिम टप्पा !

गेल्या काही मासांमध्ये सनातनच्या सर्वत्रच्या साधकांना साधनेत अनेक अडचणी येत आहेत, उदा. अनेक साधकांना कौटुंबिक अडचणी निर्माण होणे, साधकांचा मायेकडे कल वाढणे, साधकांचा विवाहानंतर कौटुंबिक गोष्टींकडे कल वाढून साधनेचा उत्साह न्यून होणे, शारीरिक व्याधी वाढणे, सुरळीत चाललेल्या जीवनात अनपेक्षित प्रसंग घडणे, परिवारात कलह होणे, नकारात्मकता आणि वासना यांचे विचार वाढणे. हे सर्व पाहिल्यावर श्री गुरूंच्या कृपेने सुचलेले काही विचार येथे सर्व साधकांच्या समोर ठेवत आहे.


१. वर्ष २०२२ हे सर्व साधकांच्या श्रद्धेचा कस लागणारे वर्ष असून साधकांना श्री गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) घेत असलेली परीक्षा द्यावी लागणार असणे

वर्ष २०२२ आरंभ होऊन ५ मास झाले आहेत. काळाची गती कोणीही थांबवू शकत नाही. वर्ष २०२२ हे सर्व साधकांच्या श्रद्धेचा कस लावणारे वर्ष आहे. ‘माया’ आणि ‘वाईट शक्ती’ साधकांना साधनेपासून दूर नेत आहेत का ?’, असा प्रश्न निर्माण होण्यासारखे प्रसंग घडतील. गुरु आपल्या शिष्याला ‘माया आणि वाईट शक्ती यांच्यापासून कसे सतर्क रहायचे ? आणि त्यांच्याशी कसे लढायचे ?’, हे आयुष्यभर शिकवतात; मात्र शिष्याला एकदा तरी त्याची परीक्षा द्यावी लागते. आताचा काळ तो या परीक्षेचा आहे.

श्री. विनायक शानभाग

२. ‘अवतारी गुरूंनी घेतलेल्या परीक्षेत उत्तम शिष्य कसा विजयी होतो ?’, याविषयीचे दोन प्रसंग पुढे दिले आहेत.

२ अ. प्रसंग १ : सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ यांच्या कानाचे शस्त्रकर्म ठरल्यानंतर शस्त्रकर्म होण्याच्या दोन दिवस आधीच सप्तर्षींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दैवी दौऱ्यावर निघण्यास सांगणे : २३.१.२०२२ या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ रामनाथी आश्रमातून सांगलीला गेले होते. सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ यांना गेल्या अनेक वर्षांपासून एका कानाने ऐकू येत नाही. दुसऱ्या कानाने थोडेसे ऐकायला येते. त्यांच्या कानांची पडताळणी केल्यावर सांगलीतील एक प्रसिद्ध आधुनिक कर्णतज्ञ म्हणाले, ‘‘शस्त्रकर्म केल्यास सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना ऐकू येईल.’’ त्याप्रमाणे त्यांचे शस्त्रकर्म करण्याचे ठरले.

२ अ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे शस्त्रकर्माच्या आधी सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ शांत मनाने दैवी दौऱ्यासाठी जाणे : शस्त्रकर्म ठरलेल्या दिनांकाच्या दोन दिवस आधी सप्तर्षींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दैवी दौऱ्यावर निघायला सांगितले. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यासाठी ते महत्त्वाचे शस्त्रकर्म होते; मात्र दोघांच्याही मनात कसलाही विचार आला नाही. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘आतापर्यंत गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांभाळले आहे आणि पुढेही तेच सांभाळणार आहेत.’’ गुरुदेवांवर अशी दृढ श्रद्धा असल्यामुळे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ शस्त्रकर्म होण्याच्या दोन दिवस आधी महर्षींच्या आज्ञेनुसार दैवी दौऱ्यावर गेल्या. नंतर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे शस्त्रकर्म झाले. ते यशस्वी होऊन त्यांना ऐकूही येऊ लागले.

२ आ. प्रसंग २ : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या कुटुंबियांच्या शारीरिक त्रासात पुष्कळ वाढ होणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे पती पू. नीलेश सिंगबाळ हे मागील १७ वर्षांपासून धर्मप्रसाराच्या सेवेसाठी गोव्यापासून दूर वाराणासी येथे सेवारत आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावरील वाईट शक्तींची आक्रमणे वाढल्यामुळे त्यांना अनेक शारीरिक त्रास होत आहेत आणि त्याचे निदानही होत नाही. त्यांचा मुलगा कु. सोहम् सिंगबाळ यालाही गेल्या काही वर्षांपासून अनेक शारीरिक त्रास होत आहेत. तसेच त्यांच्या सासूबाई पू. (श्रीमती) सिंगबाळआजी यांनाही वयानुसार शारीरिक व्याधी आहेत.

२ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेमुळे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ शांत आणि स्थिर चित्ताने रामनाथी आश्रमात अखंड सेवारत असणे : दिवसभरात अनेक साधक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे त्यांच्या साधनेतील अडचणी सोडवून घेण्यासाठी येतात. त्या प्रत्येक साधकाच्या समस्येला महत्त्व आणि प्राधान्य देऊन त्याची समस्या सोडवतात; मात्र त्यांच्या तोंडवळ्यावर कधीही स्वतःच्या कुटुंबियांविषयी चिंता दिसत नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले कुटुंबियांची काळजी घेणारच आहेत’, या दृढ श्रद्धेने त्या कुटुंबियांची काळजी करत नाहीत. केवढी ही श्री गुरूंवरील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील) श्रद्धा !

३. साधकांनी ‘श्रद्धा आणि सबुरी’ या नावेत बसून मायेचा समुद्र ओलांडून गुरुचरणरूपी पैलतीर गाठायचा असणे

हा संवत्सर ‘शुभकृत्’ नावाचा संवत्सर असून हा संवत्सर साधकांसाठी परीक्षेचा काळ आहे. सर्वच साधकांना अशा कठीण प्रसंगांना सामोरे जावेच लागेल. या समस्यांपासून सुटण्यासाठी पळवाट नाही आणि या समस्यांच्या निराकरणासाठी चोरवाट नाही ! मग साधकांसाठी मार्ग तरी कोणता आहे ? जो ईश्वर समस्या निर्माण करतो, तो त्याचे निराकरणही करतो. साधकांपुढे असलेल्या सर्व समस्यांसाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे ‘श्रद्धा अन् सबुरी’ ! साधकांना ‘श्रद्धा आणि सबुरी’रूपी नावेत बसून मायारूपी समुद्र पार करून गुरुचरणरूपी पैलतीर गाठायचा आहे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याचा चालू झालेला अंतिम टप्पा !

४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य आता अंतिम टप्प्यात प्रवेश करत असून हा त्यांच्या अवतारी कार्याचा सर्वाेत्कृष्ट काळ असणे : आपण एखादे नाटक किंवा चित्रपट पहातो. त्यातील शेवटची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. त्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्या पूर्ण कथेचा एक अर्थपूर्ण शेवट होतो. त्यामुळे पूर्ण कथेचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडतात. अवतारी कार्याचेही तसेच आहे. श्रीरामावताराचे कार्य श्रीरामाच्या जन्मापासून चालू झाले. श्रीराम-रावण यांच्यातील युद्धानंतर प्रजेने रामराज्य अनुभवले. कृष्णावताराचे कार्य श्रीकृष्णाच्या जन्मापासून चालू झाले. महाभारतीय युद्धानंतर अन्याय संपून चांगल्या पर्वाला आरंभ झाला. त्याचप्रमाणे श्रीमन्नारायणाचे अंशावतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याचा अंतिम टप्पा चालू झाला असून तिसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जगात ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होणार आहे; कारण ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हेच त्यांचे सर्वाेकृष्ट अवतारी कार्य आहे.

४ आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या या अवतारी कार्यात झोकून देऊन सेवा करणे’, हे साधकांचे दायित्व आणि कर्तव्य असणे : आपण सर्व साधकांनी गुरुदेवांच्या अवतारी कार्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेश केला आहे. ही शेवटची काही वर्षे गुरुदेवांच्या अवतारी कार्याचा सर्वाेत्कृष्ट काळ असणार आहे. अशा वेळी आपण सर्व साधकांनी ‘मायेचा त्याग करून गुरुदेवांच्या कार्याला हातभार लावला पाहिजे. त्यासाठी ‘खारूताईप्रमाणे जमेल, ती सेवा करणे’, हे सर्व साधकांचे दायित्व आणि कर्तव्य आहे.

५. सनातनच्या साधकांचा जन्म मायेतील गोष्टींसाठी झाला नसून तो केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सेवेसाठीच झाला असणे

या अवतारानेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) आम्हा साधकांना अमुक प्रदेशात, अमुक परिवारात आणि अमुक गुण देऊन जन्माला घातले आहे. हेच शाश्वत सत्य आहे. मग, अवतारी गुरूंच्या कृपेने जन्माला आलेल्या साधकांचा जन्म मायेतील गोष्टींसाठी झाला आहे का ? नाही ना ! तो केवळ अवतारी गुरुदेवांच्या सेवेसाठीच झाला आहे. याचा अर्थ ‘ज्या साधकांचे मन मायेकडे ओढले जात आहे, त्यांनी पुन्हा गुरुचरणांकडे वळायचे आहे आणि ज्या साधकांना ‘मायेत राहिल्यामुळे गुरुचरणांपासून दूर गेलो आहोत’, असा विचार येतो, त्यांनी सर्व विसरून पुन्हा नव्या जोमाने साधनेला आरंभ करायचा आहे.’ या काळात आपल्याला गुरुदेवांचे चरण घट्ट धरून रहायचे आहेत. ते श्रीमन्नारायणाचे ‘विष्णुपाद’ असून ते मोक्षदायी आहेत. गुरुदेवांनी त्यांच्या अवतारी कार्यात आपल्या सर्वांसाठी दिलेल्या खारूताईच्या वाटणीच्या अमूल्य सेवेच्या क्षणांचा आपण लाभ करून घेऊया !

६. निर्विकार आणि अविनाशी अशा अवताराच्या चरणी समर्पित होऊया !

अवतार हा अविनाशी आहे. माया अशाश्वत आणि नाशवंत आहे. अवतार शुद्ध, सत्य आणि सदाविजयी आहे. अवतार सदानंदी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान आहे. अवताराला ‘आपली’ आवश्यकता नाही; पण आपल्याला ‘अवतारा’ची आवश्यकता आहे. पांडव आणि वानर यांनी कठीण प्रसंगातही अवताराची साथ सोडली नाही. त्यांना अवताराने भरभरून दिले. आता आपल्या सर्व साधकांनाही असेच भरभरून मिळणार आहे. जिथे विकार आहेत, तिथे माया आहे आणि जो निर्विकार आहे, तोच अवतार आहे; म्हणून विकाराला बळी न पडता निर्विकार अशा अवतारी श्री गुरूंच्या चरणी समर्पित होऊया !’

श्रीमन्नारायण चरणार्पणमस्तु ।

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), देहली (१२.३.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक