साधकांचे अहं-निर्मूलनाचे सत्संग घेतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अहं-निर्मूलन प्रक्रियेतील प्रयत्न पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे सत्संग घेण्यास सांगणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांना साधनेत येऊन १ ते २ वर्षेच झाली होती. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना (पुरुष) साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे सत्संग घेण्यास सांगितले होते. या सत्संगामध्ये बहुतेक साधक श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंपेक्षा वयाने मोठे आणि अनेक वर्षांपासून साधना करणारे होते. त्यांच्या तुलनेत श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू नुकत्याच साधनेत आल्या होत्या. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंनी यापूर्वी स्वतः स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवली होती अन् त्याविषयीच्या त्यांच्या अनुभूतीही त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लिहून दिल्या होत्या. त्यामुळेच परात्पर गुरुदेवांनी त्यांना हे सत्संग घेण्यास सांगितले असावे.

२. सर्व (पुरुष) साधकांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांना आईजवळ मुलांनी सांगाव्यात, तशा आपल्या अडचणी सांगून उपाय विचारणे आणि त्याचा त्यांना लाभही होणे

सहसा पुरुष साधक परक्या स्त्रीकडे त्यांचे मन मोकळे करत नाहीत; परंतु देवाची काय कृपा पहा ! गेल्या अनेक वर्षांपासून या पुरुष साधकांना साधना करण्यात ज्या अडचणी येत होत्या, त्या हे साधक श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना मोकळेपणाने सांगत असत आणि त्यांवर उपाय विचारत असत. याचा त्या साधकांना आध्यात्मिक लाभही होत असे. स्वजनांशीही जितक्या मोकळेपणाने बोलू शकत नव्हते, असे अनेक साधक श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंशी अगदी कशाचीही आडकाठी न ठेवता आईकडे लेकरू मनातील सर्व सांगून मोकळे होते, तसे बोलायचे. यामुळे साधकांना त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींकडे साधनेच्या दृष्टीने पहाण्याचा योग्य दृष्टीकोन मिळाला.

३. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधकांना त्यांच्या प्रकृतीप्रमाणे हाताळून, आईच्या मायेने त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सहजतेने उपाय सांगणे आणि ‘साधक सकारात्मक राहून प्रयत्नशील कसे होतील ?’ याकडे लक्ष देणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंशी बोलण्याने साधकांचे मन मोकळे व्हायचे. याचे एकमेव कारण असे की, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्यामध्ये असणारा पारदर्शकपणा आणि निर्मळता ! सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू प्रत्येक साधकाला त्याच्या प्रकृतीप्रमाणे हाताळून, त्याच्या अडचणी जाणून घेऊन, त्याच्या परिस्थितीनुसार माऊलीच्या मायेने त्याला स्वीकारत आणि त्याचे अहंचे पैलू अचूकपणे जाणून घेऊन त्यांवर उपाय सांगत. हे सर्व त्या सहजपणे करत. ‘साधक सकारात्मक राहून प्रयत्नशील कसे होतील ?’, याकडे त्यांचे बारीक लक्ष असे.

४. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील दैवी चैतन्य, त्यांच्यातील निर्मळता, पारदर्शकता आणि सहजता यांमुळे साधकांनी त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलून विचारांचा भार हलके झाल्याचे अनुभवणे

निर्मळ मन हे देवाचे घर असते. आपण मंदिरामध्ये देवासमोर गेलो की, जसे देवाला काहीही सांगण्यास लाजत किंवा घाबरत नाही, तसेच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंडे आजही साधक मनमोकळेपणाने त्यांच्या मनातील विचार सांगतात. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंच्या समोर जरी गेलो, तरी त्यांच्यातील दैवी चैतन्यामुळे आणि विशेषकरून त्यांच्यातील पारदर्शकता आणि सहजता यांमुळे आपण त्यांच्याशी कधी मनमोकळेपणाने बोलण्यास आरंभ करतो, ते कळतच नाही आणि नंतर आपोआपच आपले मनही हलके झालेले असते. त्या वेळी ‘अनेक दिवसांचा अनावश्यक विचारांचा बोजा आपण डोक्यावरून उतरवला’, असे आपल्याला वाटत असते.

सत्संगातील एक-दोन साधकांनी श्रीचित्‌‌शक्ति(सौ.) गाडगीळकाकूंना असेही सांगितले होते की, ‘ताई, आम्हाला अगदी स्वतःच्या बहिणीलाही सांगता येणार नाही, तेवढे मोकळेपणाने आम्ही तुमच्याशी बोलू शकतो. आम्ही तुम्हाला सांगू शकतो की, ‘आज तुम्ही नेसलेली साडी तुम्हाला छान दिसत आहे. तुम्ही अगदी देवीप्रमाणे दिसत आहात; पण असे आम्ही इतरांशी बोलू शकत नाही.’

तात्पर्य

‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायानुसार आपण जेवढे समष्टीशी आपलेपणाने आणि पारदर्शकपणे वागू अन् बोलू, तितकी आपली समष्टीशी लवकर जवळीक होते आणि मग आपल्याला एकमेकांना आध्यात्मिक स्तरावर चांगले हाताळता येणे शक्य होते.’

– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२०)