जगातील बहुतांश व्यक्तींकडे चांगल्या प्रतीचा ‘अँड्रॉईड’ भ्रमणभाष उपलब्ध आहे. त्यातही नवनवीन पुढचे प्रकार येत असल्यामुळे तरुण पिढी भ्रमणभाषच्या वेडापायी महागडे भ्रमणभाष विकत घेत आहे. सध्या भ्रमणभाष ही खेळण्यातील वस्तू झाली आहे. भ्रमणभाषच्या अतीउपयोगामुळे शारीरिक अन् मानसिक आजार होऊन युवा पिढी देशोधडीला लागत आहे. ऑनलाईनच्या युगामुळे तरुण पिढीचा भूमीशी संपर्क तुटत आहे.
नेटफ्लिक्स, ओटीटी आदींवरील वेब सिरीजने युवकांना वेड लावले आहे. त्यात कमी म्हणून की काय आता ‘Winzo’, ‘A23’, यांसारखे कुणालाही, कोणत्याही वयात खेळता येणारे अधिकृत जुगार भ्रमणभाषवर चालू झाले आहेत. भरघोस आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी जनतेच्या जिवाशी हा खेळ राजरोसपणे चालू आहे.
विशेष म्हणजे मोठमोठे नायक, खेळाडू वगैरे भ्रमणभाषवर याचे विज्ञापन करत आहेत. या विज्ञापनामध्ये ते ‘रमी’ म्हणजेच ‘जुगार’ खेळण्याचे आवाहन करत आहेत. हे अत्यंत संतापजनक आहे, तसेच याविषयी समाजातील कुणीही ‘ब्र’ काढत नाहीत, हे त्याहून चिंताजनक आहे. मद्य, गुटखा, सिगारेट, विविध प्रकारचे अमली पदार्थ यांच्या आहारी गेलेली तरुण पिढी आता ‘ऑनलाईन जुगारा’मुळे चंगळवादाकडे खेचली जात आहे. आतापर्यंत केवळ प्रौढ व्यक्तींपर्यंत असलेला हा विस्तार युवा पिढी, महाविद्यालयीन युवक-युवतींपर्यंत पोचला आहे. युवा पिढी कष्ट करून पैसे कमावण्याऐवजी जुगार खेळून पैसे कमावण्याचे दिवास्वप्न पहात आहे.
यामुळे घराघरात कलह निर्माण होत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. आता राष्ट्राला संपवण्यासाठी बाहेरील शत्रूची आवश्यकता नाही; कारण भरघोस उत्पन्नासाठी सर्व सरकारी मान्यता प्राप्त करून हा ऑनलाईन जुगार चालू आहे. पूर्वीच्या काळी चित्रपट सृष्टीतील नायक-नायिका चित्रपटांच्या माध्यमातून, तर खेळाडू सुदृढ आणि सशक्त पिढी निर्माण करण्याचे आदर्श जनतेपुढे ठेवत असत; मात्र ‘भरघोस आर्थिक उत्पन्नासाठी राष्ट्र रसातळाला गेले तरी चालेल’, ही वृत्ती सध्या जोर धरत आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन जुगार थांबवण्याविषयी योग्य ती कठोर पावले उचलायला हवीत, अन्यथा जुगारामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम भयावह असून त्यामुळे राष्ट्राची सर्व प्रकारे हानी होऊ शकते. असे झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ?
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा