खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी पुणे येथील ‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या अध्यक्षांसह चौघांवर गुन्हे नोंद !

पुणे – ‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’ संचलित शाळांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची स्वाक्षरी, स्वमान्यता प्रमाणपत्रे सिद्ध केली. ती शिक्षण विभागाकडे चालू असलेल्या सुनावणीसाठी सादर केली आहेत. बनावट कागदपत्रे सादर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी ‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या अध्यक्षा सुरेखा जोग, वरिष्ठ साहाय्यक गौतम शेवडे, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी किशोर पवार आणि मनरेगा विभागाचे वरिष्ठ साहाय्यक हेमंत सावळकर यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या ११ शाळांची वर्ष २०१९ ते २०२२ या ३ वर्षांच्या कालावधीसाठी खोटी आणि बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे सिद्ध केली आहेत. त्यावर खोट्या स्वाक्षऱ्या आणि जावक क्रमांक नोंदवला, तसेच ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवत शाळांवर प्रशासक नियुक्त होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आली. शाळांच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करूनही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी आणि ‘मनरेगा’चे वरिष्ठ साहाय्यक हेमंत सावळकर यांनी स्वमान्यता प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी प्रत्येकी २५ सहस्र रुपये घेऊन ११ प्रमाणपत्रे सिद्ध केल्याचे अन्वेषणातून दिसून आले, तसेच त्यांनी जिल्हा परिषदेच्या जावक वहीतील नोंदणीचे छायाचित्र काढून शाळेला दिले आहे.

संपादकीय भूमिका

  • भ्रष्ट कारभार करणारे अधिकारी विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार करणार ?