गडचिरोली येथे २ जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसर्मपण !

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांवर १२ लाखांचे पारितोषिक !

रामसिंग उपाख्य सीताराम आत्राम आणि माधुरी उपाख्य भुरी उपाख्य सुमन मट्टामी

गडचिरोली – शासनाची आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकींत माओवाद्यांचा झालेला खात्मा, तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. अशातच २५ मे या दिवशी १२ लाखांचे पारितोषिक असलेल्या २ जहाल नक्षलवाद्यांनी येथील पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले आहे. रामसिंग उपाख्य सीताराम आत्राम आणि माधुरी उपाख्य भुरी उपाख्य सुमन मट्टामी अशी नक्षलवाद्यांची नावे आहेत.

रामसिंग आत्राम यांच्यावर १ हत्या आणि १ चकमकीसह एकूण ३ गुन्हे नोंद आहेत, तर माधुरी हिच्यावर ४ हत्या, २१ चकमकी, ७ जाळपोळ आणि इतर ५, असे एकूण ३७ गुन्हे नोंद आहेत. या दोघांवर प्रत्येकी ६ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले होते.

‘लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीसदल सर्वतोपरी साहाय्य करेल, तसेच नक्षलवाद्यांनी हिंसेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारावा’, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी केले आहे.