परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाच्या त्वचेमध्ये दैवी कण आढळण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘१८.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या हाताच्या दंडाच्या डाव्या बाजूकडील त्वचेमध्ये सोनेरी आणि चंदेरी रंगांचे दैवी कण आढळले. त्यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये काळानुसार श्रीविष्णूचे अवतारी तत्त्व प्रगट झाल्यामुळे त्यांच्या स्थूल देहात विविध प्रकारचे दैवी पालट होणे !

परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाला त्यांच्यातील अवतारी तत्त्व पूर्णपणे प्रकट होऊन कार्यरत होत असते. जेव्हा त्यांच्यातील अवतारी तत्त्व प्रकट होते, तेव्हा त्यांच्या देहामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या देहामध्ये दैवी पालट होतात.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शुद्ध चैतन्य आणि कार्यरत चैतन्य यांचे प्रक्षेपण होणे !

पृथ्वीवर ज्ञानशक्तीच्या बळावर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये अवतारी तत्त्व कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या देहातून शुद्ध चैतन्य आणि कार्यरत चैतन्य प्रक्षेपित होत आहे. शुद्ध चैतन्याच्या प्रक्षेपणामुळे पृथ्वीच्या वायुमंडलाची शुद्धी होते आणि कार्यरत चैतन्यामुळे पृथ्वीवरील जिवांना धर्माचरण अन् साधना करण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळते.

३. शुद्ध चैतन्यातून चंदेरी रंगाचे कण आणि कार्यरत चैतन्यातून सोनेरी रंगाचे दैवी कण त्यांच्या देहाच्या त्वचेमध्ये निर्माण होऊन त्यांचे वायूमंडलात प्रक्षेपण होणे !

शुद्ध चैतन्यातून चंदेरी रंगाचे कण आणि कार्यरत चैतन्य यांतून सोनेरी रंगाचे दैवी कण त्यांच्या देहातील त्वचेमध्ये निर्माण होऊन त्यांचे वायूमंडलात प्रक्षेपण होत आहे. परात्पर गुरुदेवांच्या देहातून प्रक्षेपित होणाऱ्या दैवी कणांतून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे मानवी देहातील श्रीविष्णूचे ज्ञानावतार आहेत आणि त्यांचा देह त्यांच्या कार्याप्रमाणेच दैवी आहे’, हे सूत्र सुस्पष्ट होते.

कृतज्ञता

श्रीगुरूंच्या कृपेमुळेच त्यांच्या देहामध्ये होणाऱ्या दैवी पालटांविषयी सूक्ष्मातून ज्ञान मिळून त्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव उलगडतो’, यासाठी मी श्रीगुरूंच्या पावन चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणाऱ्या या कणांचे ‘भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आयआयटी मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतेजुळते नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.