चंद्रपूर येथील पाझारे नर्सिंग होमचा परवाना १ मासासाठी निलंबित !

वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन !

चंद्रपूर – अभिलेखांची देखभाल न केल्याने आणि वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून शहरातील बाबूपेठमधील डॉ. शरयू पाझारे यांच्या ‘पाझारे नर्सिंग होम’मधील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी क्रमांक १ सहस्र ७८० चे प्रमाणपत्र १ मासासाठी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे १८ मे या दिवशी करण्यात आली. केंद्राचे नोंदणीकृत सोनोग्राफी यंत्र बंद करण्यात आले आहे.

१३ मे या दिवशी झालेल्या पी.सी.पी.एन्.डी.टी. सल्लागार समिती बैठकीतील निर्णयानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने या वैद्यकीय गर्भपात केंद्राची पडताळणी करण्यात आली. यामध्ये अभिलेखांची देखभाल न केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. या कालावधीत पाझारे नर्सिंग होम येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र हे कायमस्वरूपी बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.

‘या कालावधीत वैद्यकीय गर्भपात केंद्रासंबंधी काही प्रकार घडल्यास कठोर कारवाई केली जाईल’, अशी ताकीद देण्यात आली आहे, तसेच वैद्यकीय गर्भपात केंद्रात आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करून त्यासंबंधीचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागात सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘मनपा आरोग्य विभागाकडून फेर पडताळणी करून वैद्यकीय गर्भपात केंद्र पूर्ववत् चालू करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल’, असे मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

अशांवर निलंबनाची नव्हे, तर कठोर कारवाई होणेच आवश्यक !