ज्ञानवापी परिसरातील कुंडामध्ये सापडले शिवलिंग !

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण

ठळक घटना !

  • १२ फूट व्यास आणि ४ फूट उंच शिवलिंग !

  • विहीर परिसर न्यायालयाकडून सील

  • परिसराला पोलीस संरक्षण

वारासणी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण १६ मे या दिवशी शांततेत पूर्ण झाले. एकूण ३ दिवस चाललेल्या या सर्वेक्षणाचा अहवाल १७ मे या दिवशी न्यायालय आयुक्त न्यायालयात सादर करणार आहेत. अहवाल सिद्ध करण्यास वेळ लागला, तर पुढील २-३ दिवसांत तो सादर करू, असे न्यायालय आयुक्त अजय प्रताप सिंह यांनी स्पष्ट केले. तिसर्‍या दिवशीच्या सर्वेक्षणाच्या वेळी ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील लहान कुंडामध्ये १२ फूट व्यास आणि ४ फूट उंचीचे शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदु पक्षाकडून करण्यात आला, तर मुसलमान पक्षाने ‘असे काही सापडलेले नाही’, असे सांगितले. या तळ्याला ‘वजू खाना’ म्हटले जाते. येथे मुसलमान नमाजापूर्वी हात-पाय धुतात. आता न्यायालयाच्या आदेशामुळे मुसलमानांना तसे करता येणार नाही. शिवलिंगाविषयी हिंदु पक्षाकडून अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांनी न्यायालयात या शिवलिंगाविषयीची माहिती देऊन त्यास संरक्षण देण्याची, तसेच तेथे नमाजपठण करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत तळ्याचा परिसर ‘सील’ करण्यासह त्याला संरक्षण देण्याचा आदेश दिला. सर्वेक्षणापूर्वी तळ्यातील पाणी उपसण्यात आल्यानंतर शिवलिंग दिसून आले. विशेष म्हणजे श्री काशी विश्‍वनाथ मंदिराच्या येथे असलेल्या नंदीच्या समोरच हे शिवलिंग सापडले आहे.

ज्ञानवापी पूर्वी हिंदू मंदिर होते, हे कुणीही सांगेल ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

याविषयी अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले की, मशीद परिसरातील वजू खान्यामध्ये शिवलिंग सापडल्याची माहिती उघड केल्यामुळे न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाचे आम्ही उल्लंघन केलेले नाही. मी जे काही सांगितले, ते यापूर्वीच लोकांना ठाऊक होते. तथाकथित ज्ञानवापी मशिदीच्या पश्‍चिमेकडील भिंत पाहून ‘हे हिंदु मंदिर होते’, हे कुणीही सांगेल. या भिंतीवर देवतांच्या मूर्ती ठेवण्यासाठी जागा, तसेच घंटा बनवण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष १९९६ मध्ये ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. जर दोन्ही सर्वेक्षणातील भेद लक्षात घेतल्यास येथे विरोधी पक्षावर ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा लागू होऊ शकतो. हा कायदा आम्हाला न्यायालयात जाण्याचा अधिकार नाकारतो. हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही न्यायालयात जाण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करतो. ज्ञानवापीच्या प्रकरणी एकूण ७ याचिका प्रविष्ट आहेत. आता या सर्व याचिका एकत्र करून त्यावर सुनावणी करण्यात येईल.

मशीद परिसरातील ढिगार्‍याच्या सर्वेक्षणाची मागणी करणार ! – याचिकाकर्ते

याचिकाकर्ते सोहनलाल यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आलेले सर्वेक्षण पूर्ण झाले असले, तरी आम्ही या परिसरात असणार्‍या ढिगार्‍याचे सर्वेक्षण करण्याची मागणी आता करणार आहोत. मशिदीच्या पश्‍चिम दिशेला हा ढिगारा आहे. येथे आमच्या देवतांच्या मूर्ती, शिलालेख आणि अन्य प्राचीन वस्तू असण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?

ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात श्री शृंगारगौरी देवीचे स्थान आहे. येथे वर्षातून एकदाच हिंदूंना पूजा करण्याची अनुमती देण्यात आली होती. याविरोधात ५ महिलांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट करून तेथे प्रतिदिन पूजा करू देण्याची अनुमती मागितली. त्यावरील सुनावणीच्या वेळी या परिसराचे सर्वेक्षण करण्याची मागणी पुढे आली. त्यावर न्यायालयाने सर्वेक्षण आणि त्याचे चित्रीकरण करण्याचा आदेश दिला. आता नव्या सर्वेक्षणानंतर न्यायालयात अहवाल सादर केला जाईल आणि त्यानंतर ‘येथे हिंदूंना प्रतिदिन श्री शृंगारगौरीची पूजा करण्याची अनुमती मिळणार कि नाही ?’, हे स्पष्ट होईल. तथापि आताच्या सर्वेक्षणातून जे समोर आले आहे, ते पहाता ‘ज्ञानवापी मशीद हिंदूंचे पूर्वीचे श्री काशी विश्‍वनाथ मंदिर होते’, हे घोषित करण्याची मागणी हिंदु पक्षाकडून केली जाऊ शकते.

माहिती उघड केल्याने हिंदु पक्षाच्या अधिवक्त्याला प्रवेश नाकारला

१६ मे या दिवशी सकाळी सर्वेक्षणासाठी न्यायालय आयुक्त, साहाय्यक आयुक्त आणि दोन्ही पक्षाचे अधिवक्ता आदी येथे पोचले असता हिंदु पक्षाचे अधिवक्ता रामप्रसाद सिंह यांनी ज्ञानवापी परिसरात प्रवेश करण्यापासून पोलिसांनी रोखले. त्यांनी सर्वेक्षणाविषयीची गोपनीय माहिती उघड केल्याने त्यांना रोखण्यात आले.