माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

उजवीकडे शपथ घेताना माणिक साहा

आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुरातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांनी त्यागपत्र दिल्यानंतर त्रिपुरातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. त्यांनी १५ मे या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. माणिक हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. ६ वर्षांपूर्वी माणिक साहा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्रिपुरा विधानसभेची निवडणूक वर्ष २०२३ मध्ये होणार असून माणिक साहा हेच या निवडणुकीत पक्षाचा चेहरा असतील, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.

माणिक साहा भाजपचे असे चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत, जे मूळचे काँग्रेसचे होते. आसामचे हिमंत बिस्व सरमा, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेम खांडू, मणिपूरचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह हे ईशान्येतील ३ राज्यांचे मुख्यमंत्री पूर्वीचे काँग्रेसचे नेते आहेत. या तिघांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.