सोलापूर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ बापूसाहेब ढगे यांच्या मनात सनातन संस्थेविषयी असलेला भाव आणि त्यांना साधनेविषयी समाजाकडून आलेले चांगले अनुभव !

५.३.२०२० या दिवशी सोलापूर (महाराष्ट्र) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. बापूसाहेब ढगे यांच्याशी सनातनचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. दत्तात्रेय पिसे यांनी वार्तालाप केला. त्या वेळी श्री. ढगे यांनी पुढील अनुभव सांगितले.

१. विवाहासाठी उपस्थित नातलगांना उच्चशिक्षित मुलगा साधनेसाठी पूर्णवेळ झाल्याचे अभिमानाने सांगणे

श्री. बापूसाहेब ढगे

‘काही दिवसांपूर्वी मी सहकुटुंब मुंबई येथे नातेवाइकांकडे विवाहासाठी गेलो होतो. त्या वेळी मी तेथे उपस्थित नातलगांना सांगितले, ‘‘माझा उच्चशिक्षित मुलगा श्री. संदीप याला आम्ही पूर्णवेळ साधना करण्यासाठी अनुमती दिली आहे. ‘देव, देश आणि धर्म यांसाठी त्याने आपले आयुष्य समर्पित करावे’, ही आमच्या कुटुंबासाठी भाग्याची घटना आहे.’’ त्या वेळी सर्व नातलगांनी आश्चर्य व्यक्त केले आणि सर्वजण भारावून गेले.

२. ‘मुलगा पूर्णवेळ साधना करणार’, हे ऐकून नातलगांच्या मनात कुटुंबियांविषयी आदरभाव जाणवणे आणि मुलीची इच्छा असल्यास तिलाही साधना करण्याची अनुमती देण्याचे ठरवणे

त्या वेळी नातलग म्हणत होते, ‘तुमच्याप्रमाणे तुमचा मुलगा राजकारणात आला असता, तर नगरसेवक किंवा आमदारही होऊ शकला असता; परंतु व्यावहारिक उच्च शिक्षण घेतल्यानंतरही त्याने साधना, राष्ट्र आणि धर्म यांसाठी आयुष्य समर्पित केले, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.’ त्या सर्व नातलगांच्या मनात श्री. संदीप आणि आमचे कुटुंब यांविषयी पुष्कळ आदरभाव जाणवत होता. ‘राजकारणात पुढे गेल्यावर त्याला मान मिळालाही असता; पण त्याहीपेक्षा पूर्णवेळ साधक झाला, हे तुलनात्मक अधिक चांगलेच आहे’, असाच सर्वांचा सूर होता. त्या वेळी आम्ही ठरवले, ‘माझी मुलगी सध्या उच्च शिक्षण घेत आहे. तिनेही तिचे शिक्षण पूर्ण करून याच मार्गाने जायचे ठरवले, तर तिलाही अशीच अनुमती द्यायची.’

३. हिंदुत्वासाठी कार्य करत असल्याने लोक मान देत असणे

माझ्या समवेतच्या अनेक राजकीय नेत्यांना सध्या अडचणी येत आहेत. त्यांच्या शब्दाला समाजामध्ये असणारा मान अल्प होत आहे; परंतु मी केवळ धर्माचे कार्य करत असल्याने सर्वजण मला ‘हिंदु धर्मप्रेमी’ म्हणून ओळखतात आणि माझ्या शब्दाला मान देतात. आम्ही इतरांना अन्य कुणाची कामे करण्यास सांगितले, तर ती कामेसुद्धा केवळ ‘मी हिंदुत्वनिष्ठ आहे’, म्हणून केली जातात, असा मला नित्य अनुभव येत आहे.

४. ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे आणि साधनेनेच जीवनाचे सार्थक होणार आहे’, याची निश्चिती पटणे

काही वर्षांपूर्वी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक मला भेटायला यायचे अन् ‘हिंदु राष्ट्र येणार असून आपण या धर्माच्या कार्यात सहभागी व्हा’, असे सांगायचे. तेव्हा मला ते खरे वाटत नव्हते. ‘केवळ चांगले कार्य आहे आणि साधक निरपेक्ष भावाने कार्य करतात’, हे पाहून मी शक्य तेवढा सहभागी होत असे; परंतु आता मला ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे आणि साधनेनेच जीवनाचे सार्थक होणार आहे’, याची निश्चिती पटली आहे.

५. सनातनचा आश्रम आणि तेथील साधकांविषयी काढलेले उद्गार !

५ अ. सनातनच्या आश्रमातील साधक अत्यंत आनंदी असणे, त्यांना ‘आपण निवडलेल्या मार्गामुळे जीवन धन्य होणार’, याची निश्चिती असणे आणि साधकांचा त्याग पाहून मन भारावून जाणे : मी रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिला. मला तेथे भेटलेले अनेक साधक सर्व प्रकारच्या स्तरांतून आलेले आहेत. सर्वजण अत्यंत आनंदी आहेत. ‘आपण स्वीकारलेल्या मार्गामुळे जीवन धन्य होणार’, याविषयी त्यांना निश्चिती वाटते. अनेक जण चालू असलेली चाकरी किंवा व्यवसाय बंद करून पूर्णवेळ साधक झाले, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. काही साधक उत्तम व्यावहारिक जीवन चालू असतांनाही त्याचा धर्मासाठी त्याग करून आश्रमात आले, हे पाहून मी पुष्कळ भारावून गेलो. आज या कार्याचा जो विस्तार वाढला आहे, तो केवळ भगवंत आणि परात्पर गुरुदेवांमुळेच ! आज सनातन संस्थेने आम्हाला किती मौल्यवान जीवन दिले आहे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांशी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे, असे वाटते.’

–  श्री. बापूसाहेब ढगे, सोलापूर (५.३.२०२०)

श्री. बापूसाहेब ढगे यांची पू. (कु.) दीपाली मतकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. (कु.) दीपाली मतकर

१. मुलाने पूर्णवेळ साधना आणि धर्मसेवा करावी, याची तळमळ असणे अन् ‘साधनेसाठी नोकरी केली नाही, तरी चालेल’, असे त्याला सांगणे

‘श्री. ढगेकाकांच्या मनात परात्पर गुरुदेवांप्रती, तसेच साधकांविषयी पुष्कळ भाव आहे. त्यांचा मुलगा श्री. संदीप याने गेल्या वर्षी पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवले. त्या वेळी श्री. ढगेकाकांना पुष्कळ आनंद झाला. त्यांच्या मुलाने पूर्णवेळ साधना आणि धर्मसेवा करावी, यासाठी त्यांचीच तळमळ अधिक आहे. ते संदीपदादाला सांगतात, ‘‘तू नोकरी केली नाहीस, तरी चालेल. ‘नोकरी कर’, असे मी तुला कधीच सांगणार नाही.’’

२. मुलाच्या भविष्याची काळजी करणाऱ्या नातेवाइकांना ‘तुम्हालाही पुढे साधना करावी लागेल’, हे ठामपणे सांगणे

दिवाळीच्या काळात संदीपदादा घरी गेला होता. तेव्हा घरात उपस्थित असलेले काही नातेवाइक त्याला उद्देशून म्हणाले, ‘‘तुझ्याकडे काय आहे स्वतःचे ? भविष्यात तुला काही अडचण आली, तर आमच्याकडे येऊ नकोस.’’ हे ऐकून काका त्यांना म्हणाले, ‘‘तो तुमच्याकडे येणार नाही; पण तुम्हा सगळ्यांनाच त्यांच्याकडे (आश्रमात साधना करण्यासाठी) जावे लागेल.’’

३. सेवाकेंद्रात आल्यावर अनौपचारिक वागणे

काका सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रात आल्यावर स्वतःचा चहा आणि न्याहारी स्वतःच घेतात, तसेच अल्पाहार झाल्यावर ‘तुम्ही काही करू नका, मी ताटली ठेवतो’, असेही ते सांगतात.

४. शिकण्याची वृत्ती

संदीपदादाने घरात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी सांगितल्यावर त्यांनी ‘मलाही ही प्रक्रिया शिकायची आहे’, असे सांगितले.’

– (पू.) दीपाली मतकर, सोलापूर (५.३.२०२०)