समाजासाठी देवदूत ठरलेले तेलंगाणा येथील उद्योजक आणि ‘निजामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष पुरुषोत्तम सोमानी !

औषधविक्रेत्यांकडून ग्राहकांची होणारी लूट रोखण्यासाठी सोमानी यांनी केलेले प्रयत्न !

श्री. पुरुषोत्तम सोमानी

१. श्री. सोमानी यांनी उभारलेल्या चळवळीमुळे कर्करोगाच्या औषधांवरील मूल्य ९० टक्के न्यून होणे

जेव्हा एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला गंभीर आजार होतो, तेव्हा कुटुंबियांसमोर आजारी व्यक्तीवर उपचार करणे, ही मोठी समस्या असते. महागड्या औषधांचा खर्च उचलणे सर्वसाधारण मनुष्याच्या आवाक्यातील गोष्ट नसते. आपल्या जवळच्या व्यक्तीचा तीळतीळ जीव जातांना कुणालाही पहावत नाही. अशाच रुग्णांसाठी निजामाबाद येथील उद्योजक आणि समाजसेवक श्री. पुरुषोत्तम सोमानी हे एक देवदूत म्हणून समोर आले आहेत. त्यांनी औषधांचे मूल्य न्यून करण्यासाठी मोठा संघर्ष केला. विशेष म्हणजे कर्करोगावरील औषधांवरील मूल्य जवळपास ९० टक्के न्यून करण्यात त्यांना यश आले. याचा २६ लाख गरजू लोकांना लाभ होत आहे, असा श्री. सोमानी यांचा दावा आहे. त्यांनी केवळ तेलंगाणा राज्यापुरताच नाही, तर देशभरातील आजारांशी लढणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक यांच्यासाठी संघर्ष केला. त्यामुळे श्री. सोमानी हे देवदूताहून अल्प नाहीत; कारण जे सरकारने करणे अपेक्षित होते, ते त्यांनी करून दाखवले आहे. त्यांनी रुग्णांच्या होणाऱ्या लुटीच्या विरोधात चळवळ राबवली. त्यामुळे सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि उत्पादन मूल्याहून कितीतरी अधिक किमतीत मिळणाऱ्या औषधांचे मूल्य ९० टक्क्यांपर्यंत न्यून झाले.

या यशानंतर श्री. सोमानी अन्य औषधांचे मूल्य न्यून करण्यासाठी प्रयत्नरत आहेत, तसेच सरकार ‘मूल्य नियंत्रक कायदा’ करण्याच्या सिद्धतेत आहे. कर्करोगावरील औषधे ८ मार्च २०१९ पासून ८७ टक्क्यांपर्यंत ‘ट्रेंड मार्जिन कॅप’ (म्हणजे १०० रुपयांचे औषध हे अधिकतम १३० रुपयांना विकू शकतो.) लावल्याने स्वस्त झाली आहेत. आता अन्य औषधांवरही ‘ट्रेड मार्जिन कॅप’ लावण्यासाठी श्री. सोमानी प्रयत्नशील आहेत. त्यांनी ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचवली. यापुढे अन्य महत्त्वाच्या औषधांचे मूल्य नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करणे, हे त्यांचे लक्ष्य आहे. सध्या रेशनपेक्षा औषधांचा व्यय अधिक होत असल्याने सर्वसामान्य लोकांना जीवन जगणे कठीण झाले आहे.

२. औषध विक्रेत्यांकडून होणारी रुग्ण ग्राहकांची लूट !

औषधोपचारांच्या अवाढव्य व्ययामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. औषधे वास्तवात जेवढी महागडी नसतात, त्याहून कितीतरी अधिक किमतीत ती आम्हाला दिली जातात. उपचार क्षेत्रात माजलेल्या लुटीच्या विरोधात श्री. सोमानी यांनी जोरदारपणे आवाज उठवला. स्वत: सोमानी या परिस्थितीतून गेले आहेत. तेव्हा त्यांनी याच्या मुळापर्यंत जाण्याचे ठरवले आणि या चुकीच्या गोष्टीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी अनेक औषधविक्री दुकानदारांकडून खरेदी करण्यात आलेल्या औषधांची देयके (बिले) पडताळली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, बहुतांश औषधे ही मूळ किमतीच्या ३० पट अधिक किमतीत विक्री करण्यात येत आहेत.

यात औषधाचे घाऊक (होलसेलर) आणि किरकोळ मूल्य यांत आकाश-पातळाचे अंतर आहे, उदाहरणार्थ औषध निर्मात्यांकडून घाऊक विक्रेत्यांना जे औषध ९५ रुपयांना दिले जाते, तेच औषध घाऊक विक्रेते किरकोळ दुकानदारांना १०० रुपयांमध्ये विकतात. त्यानंतर किरकोळ दुकानदार तेच औषध २ सहस्र रुपयांचे अधिकतम मूल्य (एम्.आर्.पी.) लावून सर्वसामान्य लोकांना विकतात; कारण औषध निर्माते या औषधांच्या लेबलवर २ सहस्र रुपये ‘एम्.आर्.पी.’ छापतात.

३. औषधांमध्ये दलाली दिली जाणे, हा मोठा व्यवसाय होणे

औषधनिर्मिती आस्थापनांना अधिकाधिक औषधे विकायची असतात. यासाठी ते किरकोळ व्यापारी आणि आधुनिक वैद्य (डॉक्टर) यांच्या दबावात येतात, ज्यांचे आपसात संगनमत असते. त्यांना त्यांच्या लाभासाठी औषधांच्या लेबलवर अधिक ‘एम्.आर्.पी.’ छापली जावी, असे वाटते. या भरपूर ‘एम्.आर्.पी.’मुळे १३० कोटी भारतीय लोकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.

यात विशेषत: गरिबांची पिळवणूक होत आहे. गगनाला गवसणी घालणाऱ्या किमतीत औषधे खरेदी करू न शकल्यामुळे गरीब जीवनभर आर्थिक अडचणी भोगत असतात. आधुनिक वैद्य त्यांच्या लाभासाठी रुग्णांना महागडी (अधिक एम्.आर्.पी. असणारी) औषधे लिहून देतात, ज्यांचा रुग्णांच्या वास्तविक आजाराशी कोणताही संबंध नसतो. ते अधिकाधिक रुग्णांना अशी औषधे लिहून देतात. परिणामी रुग्णांची प्रकृती दिवसेंदिवस वाईट होत जाते आणि ते पैशानेही हवालदिल होतात.

४. देहली येथे ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ मध्ये पत्रकार परिषद घेऊन औषधी घोटाळा उघडकीस आणणे

श्री. पुरुषोत्तम सोमानी यांनी माध्यमांसमोर औषधांविषयीचा सर्वांत मोठा घोटाळा उघडकीस आणला. त्यांनी औषधांच्या लेबलवर औषध निर्मात्यांकडून वाढवून छापण्यात आलेल्या वारेमाप ‘एम्.आर्.पी.’विषयी नवी देहलीच्या ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ मध्ये २ फेब्रुवारी २०१९ या दिवशी पत्रकार परिषद आयोजित करून माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘आज औषधांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ‘ड्रग पॉलिसी’ नाही. त्यामुळे औषध निर्मिती आस्थापनांकडून औषधांच्या लेबलवर वारेमाप आणि मनमानी पद्धतीने मोठ्या प्रमाणात ‘एम्.आर्.पी.’ छापली  जाते. ज्यात जेनेरिक आणि जीवनरक्षक औषधे यांचाही समावेश आहे. एवढेच नाही, तर सर्जिकल (शस्त्रक्रियेच्या) उपकरणांच्या लेबलवरही किमती वाढवून छापल्या जातात.’’

५. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कर्करोगाच्या औषधांवरील किमती ९० टक्के न्यून होणे

श्री. सोमानी यांनी २६ डिसेंबर २०१८ या दिवशी उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांना भेटून पुरावे सादर केले. त्यांच्यासह तत्कालीन केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री मनमुख मांडविया यांच्या खेरीज ‘फॉर्मास्युटिकल विभागा’चे सचिव जे.पी. प्रकाश आणि संयुक्त सचिव नवदीप रिणवा यांच्याही औषधांच्या किमतीविषयीचे सूत्र लक्षात आणून दिले. श्री. सोमानी यांच्या ६ मासांच्या कठोर परिश्रमानंतर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हे सूत्र पोचवण्यात आले. माध्यमे आणि पंतप्रधान कार्यालय यांच्या दबावामुळे फार्मा विभागाला ठोस निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे कर्करोगाच्या औषधांवरील किमती ९० टक्क्यांपर्यंत स्वस्त झाल्या. त्याचा लाभ कर्करोगाच्या २० लाख रुग्णांना होईल.

(साभार : ‘दि माहेश्वरी टाइम्स’)

श्री. पुरुषोत्तम सोमानी यांनी पुढाकार घेऊन केलेले अन्य कार्य

१. कोरोना महामारीच्या संकटकाळात गरिबांना विनामूल्य अन्नधान्याचे वाटप करणे

कोरोना महामारीच्या संकटामध्ये दळणवळण बंदीच्या काळात कुणीही उपाशीपोटी झोपू नये, यासाठी श्री. पुरुषोत्तम सोमानी यांनी पुढाकार घेतला. ‘मानव सेवा हीच माधव सेवा’, हे ब्रीद घेऊन श्री. सोमानी यांनी ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही आणि ज्यांना कोणतेही साहाय्य मिळाले नाही, अशा स्थानिक अन् प्रवासी कामगार यांना प्रत्येकी ५ किलो तांदळाचे वितरण केले. याखेरीज शहरातील विविध राजकीय पक्षांचे नगरसेवक आणि महापौर नीतू किरण यांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या विभागांमध्येही ५ किलो तांदळाचे वितरण करवून घेतले. श्री. सोमानी म्हणाले की, अशा कठीण काळात आपल्या जवळपास रहाणाऱ्या सर्व गरजवंतांची भूक शमेल, याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे.

२. नांदेड मधील मुदखेड रेल्वेस्थानकापासून बलरामपर्यंत मीटर गेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी आंदोलन करणे

श्री. पुरुषोत्तम सोमानी यांनी जनहिताचे अनेक कार्य केले, तसेच आवश्यकतेनुसार त्यांनी आंदोलनही केले आहे. वर्ष १९९९ मध्ये ‘निजामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स’च्या संस्थापक-अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये नांदेडमधील मुदखेड रेल्वेस्थानकापासून बलरामपर्यंत मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ‘बंद’ आणि ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्यात आले, तसेच ८ दिवस आमरण उपोषण करण्यात आले. ते आंदोलन यशस्वी झाले. परिणामी सरकारने मीटर गेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता दिली.

(संदर्भ : दि माहेश्वरी टाइम्स)


अनेक समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा करणारे श्री. पुरुषोत्तम सोमानी !

पुरुषोत्तम सोमानी यांचा जन्म ४ ऑगस्ट १९५४ या दिवशी नांदेड येथे त्यांचे वडील श्री. रामगोपाला सोमानी यांच्या घरी झाला. वर्ष १९७७ मध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनीयरींग केले. त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय चालू केला. सध्या ते निजामाबाद (तेलंगाणा) मध्ये ‘श्याम एजन्सीज’ नावाने व्यवसाय करत आहेत. त्यांनी वर्ष १९७७ मध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ‘सोलर इंजिन’ विकसित केले, जे विजेविना चालते. अशा प्रकारे त्यांनी वर्ष १९७९ मध्ये ट्रॅक्टरयुक्त ‘टू-इन वन हार्वेस्टर’ विकसित केले. वर्ष १९९७ मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सोलर इंजिनचा शोध आणि समाजसेवा यांसाठी ‘इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी ‘डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम’च्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासकामांसाठी वर्ष १९९९ मध्ये आंदोलन केले आणि ९५ टक्के मागण्या मान्य करवून घेतल्या.

वर्ष २००३ पासून ते ‘मोफत जल टँकर सेवा’ याचे संचालन करत आहेत. याखेरीज ते विविध समाजसेवी आणि औद्योगिक संस्था यांचे अध्यक्ष, तसेच संचालक म्हणून काम पहात आहेत. समाज संघटनाच्या अंतर्गत श्री. सोमानी ‘अखिल भारतीय माहेश्वरी महासभे’चे कार्यकारी मंडळ सदस्य तथा एपी माहेश्वरी महासभा ट्रस्टचे सदस्य आहेत. भाजप तेलंगाणा राज्य स्वच्छ भारत अभियान समितीचे संयुक्त संयोजक, पंतप्रधान जनकल्याणकारी योजना प्रचार-प्रसार अभियानाचे उपाध्यक्ष, ‘निजामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक अध्यक्ष, ‘इंदूर कोल्ड स्टोरेज असोसिएशन निजामाबाद’चे अध्यक्ष तथा ‘निजामाबाद द ऑफिसर्स क्लब’चे आजीवन सदस्य आहेत.

संपादकीय भूमिका

तेलंगाणा येथील उद्योजक पुरुषोत्तम सोमानी यांच्यासारखे समाजकार्य एकतरी लोकप्रतिनिधी करतो का ?