२०० कोटी वसुलीच्या आरोपाचे ‘व्हायरल’ पत्र खोटे ! – कृष्णप्रकाश

अपकीर्ती केल्याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून पत्राविरोधात तक्रार प्रविष्ट

पुणे – पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी २०० कोटींची वसुली केल्याचा आरोप असलेले पत्र सामाजिक माध्यमांतून ‘व्हायरल’ होत आहे. या संदर्भात कृष्णप्रकाश यांनी ‘हे पत्र खोटे आहे, तसेच माझ्या विरोधकांनी मला अपकीर्त करण्यासाठी माझ्या विरोधात षड्यंत्र केले आहे’ अशी माहिती दिली आहे.

‘व्हायरल’ पत्रात डॉ. अशोक डोंगरे (साहाय्यक पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे) यांच्या नावाने मुख्यमंत्र्यांना ‘कृष्णप्रकाश यांनी त्यांच्या कार्यकाळात २०० कोटींची वसुली केल्याचे, तसेच त्याचे सर्व आरोप डॉ. अशोक डोंगरे यांच्यावर येण्याची शक्यता आहे’, अशा प्रकारची माहिती लिहिली आहे. यांसह अनेक ठिकाणच्या मोठ्या रकमांच्या वसुलीची माहिती या पत्रात देण्यात आली आहे. या संदर्भात स्वत: साहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी पत्र खोटे असल्याचे सांगितले असून त्यांची आणि कृष्णप्रकाश यांची अपकीर्ती करण्यात आल्याविषयी रीतसर तक्रार केली आहे.