कर्नाल (हरियाणा) येथे ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक !

देहली येथे बाँबस्फोट घडवण्याचा डाव उघड !

कर्नाल (हरियाणा) – राजधानी देहलीमध्ये बाँबस्फोट घडवण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला. येथे कर्नाल पोलीस आणि पंजाब पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर आणि भूपिंदर या ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. कर्नाल येथील बस्तारा टोलनाक्यावरून एक इनोव्हा वाहनातून हे चौघे जात असतांना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. यात आर्.डी.एक्स. असल्याचेही सांगितले जात आहे. हा दारुगोळा एवढा मोठा होता की, अनेक शहरांत याद्वारे स्फोट घडवला जाऊ शकतो. हे आतंकवादी नांदेड (महाराष्ट्र) येथे जात होते. ते देहलीत मोठा स्फोट घडवून आणणार होते, असा पोलिसांसना संशय आहे.

अटक करण्यात आलेले खलिस्तानी आतंकवादी  बंदी घालण्यात आलेल्या ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या संघटनेशी संबंधित आहेत. हे चौघेही पंजाबमधील आहेत. ते हरविंदर सिंग उपाख्य रिंडा या आतंकवाद्याशी संबंधित आहेत. रिंडा हा खलिस्तानी आतंकवादी सध्या पाकमध्ये लपला आहे. रिंडा याने ही शस्त्रे पाकिस्तानातून पंजाबमधील फिरोजपूर येथे ड्रोनद्वारे पाठवली होती.

संपादकीय भूमिका

पुन्हा मोठ्या प्रमाणात चालू झालेली खलिस्तानी आतंकवाद्यांची वळवळ ठेचून काढण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !