शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, मग श्रीमद्भगवद्गीता का नाही ? – रामेश्वर भूकन, हिंदु जनजागृती समिती

दरेवाडी (जिल्हा नगर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

दीपप्रज्वलन करतांना प्रतीक्षा कोरगावकर आणि श्री. रामेश्वर भूकन

दरेवाडी (जिल्हा नगर), २७ एप्रिल (वार्ता.) – आपल्या देशात शासकीय अनुदानातून चालणार्‍या शिक्षण संस्थांमधून हिंदु धर्माचे शिक्षण देण्यास प्रतिबंध आहे. बहुसंख्य हिंदूंच्या देशातील शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, तर  भगवद्गीता आणि हिंदु धर्म ग्रंथ शिकवले जाऊ शकत नाही ?, ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन यांनी केले. ते दरेवाडी येथे श्रीरामनवमीच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेला १२० हून अधिक महिला आणि पुरुष उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर याही उपस्थित होत्या.

श्री. रामेश्वर भुकन पुढे म्हणाले की, भारतामध्ये रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊड स्पीकर लावू नये, असा ध्वनीप्रदूषणाचा कायदा अस्तित्वात असतांनाही देशातील मशिदीतून प्रतिदिन पहाटे बांग देण्यासाठी हा कायदा मोडला जातो; मात्र एकाही मशिदीवर कारवाई होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांनी सर्वप्रथम धर्मशिक्षण दिले. छत्रपती शिवरायांप्रमाणे व्यापकत्व आणि धर्मनिष्ठा आपल्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी धर्माचरण करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा.

हिंदू महिलांनी अभिमानाने धर्माचरणाच्या कृती कराव्यात ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, रणरागिणी शाखा

जगभरातील सर्वात जुनी आणि आदर्श अशी हिंदु संस्कृती आहे. हिंदु धर्म महिलांना तुच्छ लेखणारा, महिलांवर अन्याय करणारा आहे, असा अपप्रचार केला जातो. प्रत्यक्षात् हिंदु संस्कृतीत महिलांना सर्वकाळ आदराचे आणि सन्मानाचे स्थान आहे. भारताला विद्वान, वीरांगना, तसेच कुशल महिलांची गौरवशाली दीर्घ परंपरा लाभली आहे; मात्र स्वातंत्र्यानंतर भारतातील महिलावर्गाचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार गावोगावी चालू आहे. महिलांनी कोणतीही लाज न बाळगता अभिमानाने धर्माचरणाच्या कृती कराव्यात, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम होणे ही काळाची आवश्यकता आहे.

क्षणचित्रे

१. दरेवाडी येथील ८ ते ९ धर्मप्रेमींनी २ दिवस २०० हिंदूंच्या घरी जाऊन सभेचे निमंत्रण दिले.

२. धर्मप्रेमींनी सभेचा प्रसार अधिकाधिक व्हावा, यासाठी ३ गावांच्या सीमेवर सभेचे मोठे १० x १० चे ‘होर्डिंग्ज’ लावले होते.

३. सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीमध्ये २१ धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींसाठी पाक्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.