हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करावे ! – अभिजीत पोलके, हिंदु जनजागृती समिती

नागपूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

डावीकडून अधिवक्त्या सौ. वैशाली परांजपे आणि श्री. अभिजीत पोलके

नागपूर, २६ एप्रिल (वार्ता.) – भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र होते. केवळ बहुसंख्य हिंदू होते; म्हणून नव्हे, तर येथे प्रत्येक प्राणीमात्राच्या उन्नतीचा विचार आणि प्रयत्न केले जायचे. जगाचे कल्याण करणारे ‘हिंदु राष्ट्र’ आपल्याला स्थापन करायचे असेल, तर ते आधी आपल्याला मनात आणावे लागेल. त्यासाठी धर्माचरणाची आवश्यकता आहे, प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत पोलके यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील छत्रपतीनगरमधील जीर्णोद्धार देवस्थान समितीच्या श्री हनुमान मंदिरामध्ये नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली. या सभेला सनातन संस्थेच्या वतीने अधिवक्त्या सौ. वैशाली परांजपे यांनीही धर्माचरणाचे महत्त्व सांगून संबोधित केले. उपस्थितांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.

क्षणचित्रे

१. सभेच्या धर्मकार्यात मंदिराचे विश्वस्त अधिवक्ता सारंग देव आणि श्री. नितीन आभाळे यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.

२. हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नातून पंढरपूर देवस्थानला त्यांची भूमी परत मिळवून देण्यात यश मिळाले. हा विषय ऐकून उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.

३. ‘समितीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यालयात येऊन समविचारी मित्रांना ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी माहिती सांगावी’, अशी विनंती धर्मप्रेमी अभियंता श्री. प्रशांत कठाळे यांनी केली.

४. सभेला उपस्थित महिलांनी ‘जिहाद’ हा विषय सविस्तर सांगा’, अशी मागणी केली.

५. ‘धर्मरक्षणासाठी वीरश्री हवी, त्यादृष्टीने समितीने मार्गदर्शन करावे’, अशी विनंती श्री. सारंग परांजपे आणि काही युवा धर्मप्रेमी यांनी केली.

६. सभास्थळी प्रथमोपचार कक्ष, सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन, तसेच धर्मशिक्षण अन् क्रांतीकारक यांची माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात आले होते.