अभिनेत्री करिना कपूर खान यांना बिंदीशिवाय दाखवणार्‍या विज्ञापनाचा हिंदूंकडून  निषेध !

‘मलबार गोल्ड’च्या अक्षय्य तृतीयेच्या विज्ञापनाला हिंदूंचा विरोध !

मुंबई – एम.पी. अहमद यांच्या मालकीचे ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ या सोने आणि हिरे यांच्या दागिन्यांची विक्री करणार्‍या आस्थापनेने अक्षय्य तृतीयेच्या प्रीत्यर्थ  दागिन्यांचे विज्ञापन प्रसारित केले आहे. या विज्ञापनात अभिनेत्री करिना कपूर खान यांना दागिने घालून दाखवण्यात आहे; मात्र त्यांच्या कपाळावर बिंदी नाही. हिंदूंच्या सणासाठी दागिन्यांचे विज्ञापन करतांना अभिनेत्रीने बिंदी न लावल्याने ‘मलबार गोल्ड’च्या अक्षय्य विज्ञापनाला हिंदूंनी विरोध केला आहे. (‘मुसलमानांच्या मालकीच्या आस्थापनेने ईदच्या काळात विज्ञापन प्रसारित करतांना मुसलमानांच्या पेहरावाचा नक्कीच विचार केला असता; मात्र हिंदूंच्या सणांच्या काळात विज्ञापन प्रसारित करतांना हिंदूंच्या पेहरावाचा आणि त्यांच्या संस्कृतीचा विचार का केला जात नाही ?’, याचा जाब या आस्थापनेला हिंदूंनी विचारला पाहिजे ! – संपादक)

बहुतांश हिंदु स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा बिंदी लावतात. हिंदूंच्या सणांच्या दिवशी तर त्याला विशेष महत्त्व असते; मात्र ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ या आस्थापनेने तिच्या विज्ञापनात अभिनेत्री करिना कपूर खान यांना बिंदीशिवाय दाखवून हिंदूंच्या परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. हा हिंदु धर्माचा अवमान आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांद्वारे अनेक धर्मप्रेमी हिंदूंनी ‘मलबार गोल्ड’वर टीकेची झोड उठवली आहे.

संपादकीय भूमिका

याआधीही दिवाळीला अनेक आस्थापनांनी त्यांच्या विज्ञापनांतील महिलांना बिंदीशिवाय दाखवले होते. त्यानंतर हिंदूंनी विरोध केल्यावर विज्ञापनात पालट करून महिलांना बिंदी लावून दाखवण्यात आले. विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदूंच्या परंपरांवर घाला घालण्याचा हा डाव आहे, हे लक्षात घ्या !