मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिर भोंग्यांचा आवाज न्यून करणार !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आवाहनाला प्रतिसाद !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिर

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिरावर लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार श्रीकृष्ण मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या भोंग्यांवरून प्रतिदिन पहाटे साडेपाच ते साडेसहा या काळात मंगलाचरण आरती आणि विष्णु सहस्रनाम ऐकवले जाते. आता भोंग्यांचा आवाज मंदिराच्या परिसराच्या बाहेर जाणार नाही, इतका अल्प असणार आहे.

गौतमबुद्धनगर येथील ९०० धार्मिक स्थळांना पोलिसांनी नोटीस बजावून त्यांच्या भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा आदेश दिला आहे. जर त्यांनी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे या नोटिसीमध्ये म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदू कायद्याचे पालन करतात म्हणून मंदिराकडून सर्वप्रथम असा निर्णय घेण्यात आला; मात्र मशिदींवरील भोंग्यांविषयी असे दिसून आलेले नाही. यातून कोण कायद्याचे पालन करत नाही आणि अन्य धर्मियांना वेठीस धरत आहे, हे स्पष्ट होते ! आता सरकारने अशांवर कठोर कारवाई करावी !