सातारा आगारातून ९० टक्के बसगाड्या चालू !

६५८ कर्मचारी कामावर रुजू

सातारा, २० एप्रिल (वार्ता.) – सर्वाेच्च न्यायालयाने एस्.टी. कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर सातारा आगारातून ९० टक्के बसगाड्या चालू झाल्या आहेत. आगारातील ६५८ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली आहे.

या वेळी रेश्मा गाडेकर म्हणाल्या की, एस्.टी. कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी २८ ऑक्टोबर २०२१ या दिवशी राज्यभर संप पुकारला होता. या संपाचा मोठा फटका जिल्ह्यातील ग्रामीण भागाला बसला. विशेषत: शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. आता सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशामुळे  ते कामावर रुजू होत आहेत. संप काळात सातारा आगारातील १४७ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे सध्या ४८० कर्मचारी प्रत्यक्ष कामकाजात सहभागी आहेत. निलंबित कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर उर्वरित १० टक्के एस्.टी.ची सेवा पूर्ववत् होईल.