महाराष्ट्रासाठी एक आनंदाचे वृत्त म्हणजे देशाच्या सैन्यप्रमुखपदी मराठी व्यक्ती असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती झाली आहे. १ मे २०२२ या दिवशी ते सध्याचे सैन्यप्रमुख असलेले जनरल मनोज नरवणे यांच्याकडून नवीन पदभार स्वीकारतील. जनरल मनोज पांडे हे नागपूरचे आहेत. योगायोगाने यापूर्वीचे सैन्यप्रमुख जनरल मनोज नरवणे हेही पुण्याचे, म्हणजे महाराष्ट्राचे आणि आता जनरल पांडे हेही महाराष्ट्राचे आहेत. ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी आतापर्यंत सांभाळलेला कार्यभार आणि त्यांच्यासमोर असणारी विविध आव्हाने यांविषयीची माहिती या लेखाद्वारे जाणून घेऊया.
१. देशाचे सैन्यप्रमुख होणार असलेले जनरल मनोज पांडे यांची शैक्षणिक आणि सैन्यदलातील आतापर्यंतची कारकीर्द !
अ. जनरल पांडे यांनी ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’मध्ये ‘कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स’मध्ये प्रवेश केला होता. त्यांनी नागपूर येथील ‘एअरफोर्स स्कूल’ येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी डेहराडून येथील ‘इंडियन मिलिटरी अकॅडमी’मध्ये १ वर्षाचे प्रशिक्षण घेतले. वर्ष १९८२ मध्ये त्यांना ‘कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स कमिशन’ मिळाले.
आ. ते अतिशय बुद्धीवान अधिकारी आहेत. त्यांनी प्रथम क्रमांकाने सुवर्ण पदक मिळवून सैन्याच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
इ. त्यांनी प्रारंभीची कारकीर्द ही ‘कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स’च्या कंपनी कमांड करणे, बटालियन कमांड करणे, ‘इंजिनियर ब्रिगेड कमांड’ करणे यात घालवली. नंतर ते ‘जनरल’ या कॅडरमध्ये आले. त्यानंतर त्यांनी ‘इन्फंट्री डिव्हिजन’चे नेतृत्व केले. त्यांनी तेझपूर (आसाम) येथे असलेल्या चौथ्या कोरचे नेतृत्व केले. त्यानंतर अंदमान-निकोबार येथे ‘ट्राय सर्व्हिस कमांड’चे नेतृत्व केले.
ई. भारताचे जुने सैन्यप्रमुख निवृत्त झाले, तेव्हा मनोज पांडे यांना देहलीला उपसैन्यप्रमुख म्हणून आणण्यात आले. त्यांची कारकीर्द अतिशय यशस्वी राहिलेली आहे.
उ. ‘स्टॉफ कॉलेज’ ही सैन्याची अतिशय महत्त्वाची परीक्षा असते. त्यातही ते प्रथम आले होते. या परीक्षेत प्रथम आणि द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिका अन् ब्रिटन येथे पाठवले जाते. त्याप्रमाणे त्यांना इंग्लंडच्या कॅम्बर्ली येथील स्टॉफ कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. हा मोठा सन्मान समजला जातो. तो जनरल मनोज पांडे यांना मिळालेला होता.
ऊ. त्यानंतर त्यांनी ‘आर्मी वॉर कॉलेज’मध्ये ‘हायर कमांड’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमासाठी अतिशय बुद्धीवान असलेले कर्नलच्या हुद्याचे अन् तिन्ही दलांचे ८० अधिकारी सहभागी होतात. या आर्मी महाविद्यालयात मीही शिकवण्याचे काम केले आहे. त्यानंतर जनरल पांडे यांनी एका ब्रिगेडचे, मग डिव्हिजनचे नेतृत्व केले. नंतर त्यांना देहली येथील ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’मध्ये नियुक्त करण्यात आले. तेथेही त्यांनी यशस्वीपणे काम केले. त्यांनी ‘कोर कमांडर’ आणि इतर नियुक्त्या पूर्ण केल्या.
२. जनरल मनोज पांडे भारतासमोरील सुरक्षेच्या आव्हानांना तोंड देऊन भारतीय सैन्याला अतिशय उच्च दर्जाचे नेतृत्व प्रदान करतील !
२ अ. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने असणारी विविध आव्हाने : भारतासमोर सध्या सुरक्षेची विविध आव्हाने आहेत. यामध्ये विशेषत: भारत-चीन सीमेवर होणार्या अडचणींवर मार्ग काढणे, भारत-पाकिस्तान सीमेचे रक्षण करणे, काश्मीर खोर्यात आतंकवादविरोधी अभियानांमध्ये कार्य करणे, ईशान्य भारतात बंडखोरांच्या विरोधात मोहिमा राबवणे आदींचा समावेश आहे. भारतीय सैन्याला असलेले काम हे विविध प्रकारचे आहे. भारतीय सैन्य डोंगराळ भागात, तसेच विविध राज्यांमध्ये तैनात आहे. या सर्व ठिकाणी त्यांना सैन्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. पाकिस्तान सीमेवर प्रतिदिन गोळीबार होत असतो. तेथे सतत घुसखोरीविरोधी आणि आतंकवादविरोधी मोहिमा चालतात. त्यांच्यावरही लक्ष ठेवावे लागेल.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
२ आ. सैन्याचे आधुनिकीकरण आणि सक्षमीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जनरल मनोज पांडे पार पाडतील ! : सध्या भारतीय सैन्यात ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ असे दोन कार्यक्रम चालू आहेत. यापूर्वी भारत ७० टक्के शस्त्रे विदेशातून आयात करायचा. ते प्रमाण आता ४० टक्क्यांवर आलेले आहे. ‘येत्या काही काळात भारत महत्त्वाची ९० टक्के शस्त्रे भारतातच निर्माण करील’, असे वाटते. तेही महत्त्वाचे काम आहे. तंत्रज्ञान आणि सैन्य यांचा प्रचंड घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे सैन्याचे आधुनिकीकरण करणे, युक्रेन युद्धातून भारताला जे शिकायला मिळाले, त्याचा योग्य वापर करून सैन्याला अधिक सक्षम करणे हीसुद्धा जनरल पांडे यांच्यासमोरील आव्हाने आहेत. जनरल मनोज पांडे हे अतिशय सक्षम आणि व्यावसायिक अधिकारी आहेत. त्यामुळे मला निश्चिती आहे की, येत्या काळात ते भारतीय सैन्याला अतिशय उच्च दर्जाचे नेतृत्व प्रदान करतील. त्यामुळे देशाला सुरक्षित ठेवण्याचे सैन्याचे काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू. येणार्या काळात भारतीय सैन्याचे सामर्थ्य वाढेल. सुरक्षेची नवनवीन आव्हाने आपण स्वीकारू आणि चीन किंवा पाकिस्तान यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ.
अशी वृत्ते येत आहेत की, सध्याचे सैन्यप्रमुख मनोज नरवणे यांची नियुक्ती पुढील ‘संरक्षणदलप्रमुख’ म्हणून होईल; परंतु त्यासाठी आपल्याला काही दिवस वाट पहावी लागेल. तोपर्यंत जनरल मनोज पांडे यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा !’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
‘लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारताचे सैन्यप्रमुख होणे’, या वृत्ताचे गांभीर्य न वाटल्याने त्याविषयीच्या वृत्ताला विशेष महत्त्व न देणारी मराठी माध्यमे !लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारताचे सैन्यप्रमुख होत आहेत, या वृत्ताला विशेषत: मराठी माध्यमांनी विशेष महत्त्व दिले नाही. महाराष्ट्राचा एक सुपुत्र देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांत मोठे पद असलेल्या ‘सैन्यप्रमुख’ या पदावर काम करणार आहे. ‘याचे त्यांना गांभीर्य वाटले नाही’; परंतु ही महत्त्वाची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला त्वरित कळावी, असे मला वाटले. त्यामुळे मी यासंदर्भात तातडीने एक ‘व्हिडिओ’ बनवला आहे. – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे |