मशिदीचे बांधकाम चालू केल्यास सामूहिक आत्मदहन करू !

नवी मुंबई येथील सानपाडावासियांचा निर्णय !

सिडकोकडून हिंदूबहुल भागात मशीद बांधण्याला स्थानिकांचा विरोध !

  • हिंदूंनी आत्मदहन करण्यापेक्षा परिणामकारक हिंदूसंघटन करून न्याय्य मागण्या पूर्ण होण्यासाठी वैध मार्गांनी सरकारवर दबाव बनवणे आवश्यक ! – संपादक
  • मुसलमानबहुल भागांत कधी सिडको मंदिर बांधण्याचा विचारतरी करील का ? हिंदूंनी सिडकोच्या या निर्णयाला वैध मार्गाने संघटित रूपाने विरोध करणे आवश्यक ! – संपादक

नवी मुंबई – सानपाडा येथे हिंदूबहुल भागात मशीद बांधण्यास स्थानिकांचा विरोध आहे; मात्र या विरोधाला डावलून मशिदीचे बांधकाम चालू केल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय सानपाडावासियांनी घेतला आहे, अशी चेतावणी ‘अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान’चे अध्यक्ष कैलास ताजणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सानपाडा येथे मशिदीच्या बांधकामाच्या विरोधात आंदोलनाची पुढची दिशा काय ठेवायची, याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 (सौजन्य : Tv1 India Live)

ताजणे म्हणाले की, सिडकोने सानपाडा विभाग वसवतांना मशिदीसाठी आरक्षण ठेवले नव्हते. त्यामुळे येथे बहुसंख्य हिंदूंनी घरे घेतली. आता सिडकोने या ठिकाणी मशिदीसाठी भूखंड दिल्याने येथील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नसून त्या धर्मियांची जेथे संख्या अधिक आहे, तेथे त्यांना भूखंड द्यावा. हे वर्ष १९९८ पासून आमचे म्हणणे आहे. तरीही आता सिडकोने न्यायालयाच्या आदेशाकडे बोट दाखवून मशिदीसाठी भूखंड दिला आहे. या पार्श्‍वभूमीवरच आम्हालाही तांत्रिक म्हणणे मांडायचे असेल, तर उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात जाण्यास आम्हाला मुभाही दिली आहेच ! त्यानुसार आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करत आहोत.

सानपाडा येथील सर्व राजकीय पक्षांनी मशिदीला विरोध करण्यासाठी आम्हाला पाठिंबा पत्र दिले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी यात लक्ष घालून दोन्ही समाजात तेढ न होता मार्ग काढावा.

मधल्या काळात जर कोणत्याही राजकीय दबावाखाली पोलीस संरक्षण घेऊन मशिदीचे बांधकाम चालू करण्यात आले, तर आम्ही लोकशाही मार्गाने सदर बांधकामाच्या ठिकाणी सामूहिक आत्मदहन करू, असे त्यांनी या वेळी घोषित केले. या वेळी व्यासपिठावर प्रतिष्ठानचे सचिव घनश्याम पाटे, अजय पवार, सतीश निकम, संतोष पाचलग, मिलिंद सूर्यराव आदी उपस्थित होते.