संपादकीय
मुसलमानबहुल भागांतून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर होणारी आक्रमणे कायमची रोखा !
गेली २ वर्षे कोरोनाच्या काळात लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे हिंदूंना त्यांचे धार्मिक सण सार्वजनिकरित्या साजरे करता आले नव्हते. यावर्षी कोरोनाचा प्रभाव अल्प झाल्यानंतर देशभरातील निर्बंध काढून टाकण्यात आले. हिंदूंना त्यांचे सण साजरे करण्याची अनुमती मिळाल्यानंतर श्रीरामनवमी हा मोठा सण आला आणि हिंदूंनीही गेल्या २ वर्षांची कसर भरून काढून उत्साहात अन् जोशात श्रीरामनवमी साजरी केली. अयोध्येत लाखोंच्या संख्येने हिंदूंनी रामललाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. असे असतांना नेहमीप्रमाणेच मुसलमानबहुल भागांत श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे करण्यात आली. देशातील झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत या वेळी ही आक्रमणे झाली. गुजरातच्या आणंद येथे एका हिंदूचा यात मृत्यूही झाला. तत्पूर्वी राजस्थानच्या करौली येथे नववर्षानिमित्त हिंदूंनी काढलेल्या दुचाकी फेरीवर आक्रमण करण्यात आले. मुसलमानबहुल भागात गेली अनेक दशके जे होत होते, तेच आजही चालू आहे, हेच या आक्रमणांतून पुन्हा दिसून आले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी आतापर्यंत काहीच ठोस कृती करण्यात न आल्याचाच हा परिणाम आहे. काँग्रेसच्या काळात ते शक्य नव्हते; मात्र आताच्या घटना भाजपच्या राज्यांतही घडल्या आहेत. ‘तेथे तरी त्या यापुढे होणार नाहीत, असा वचक सरकारने निर्माण केला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते. बंगालमध्ये आक्रमणे झाली. ‘तेथील स्थिती पालटण्याची अपेक्षाच करता येणार नाही’, असेच हिंदूंना वाटते. ‘भविष्यात बंगालमध्ये धर्मांधांनी हिंदूंवर शक्तीनिशी आक्रमणे केली, तर फाळणीच्या वेळेला ज्याप्रमाणात तेव्हाच्या बंगालमधील नोआखाली येथे हिंदूंची स्थिती झाली, तशीच स्थिती होईल’, असे म्हटल्यास आश्चर्य वाटू नये. नोखालीमध्ये हिंदूंचे संपूर्ण शिरकाण करण्यात आले होते, हे लक्षात घ्यायला हवे. आता नोआखाली बांगलादेशात आहे.
हिंदूंच्या वाद्यांचा त्रास का होतो ?
हिंदूंच्या मिरवणुका मशिदीसमोरून किंवा मुसलमानबहुल भागातून गेल्यावर धर्मांधांना त्याचा त्रास का होतो ? याच्यावर आता देशपातळीवर चर्चा होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी मिरवणुकीवरील ‘डिजे’ (मोठी संगीत यंत्रणा) किंवा मिरवणुकीतील वाद्ये बंद करण्यावरून आक्रमणाच्या घटना घडत असतात. मुळात हिंदूंनी ही वाद्ये बंदच का करावीत ? थोडा वेळ मशिदीसमोरून जातांना वाद्ये वाजवली, तर कोणते आभाळ कोसळते ? गेली अनेक दशके हिंदू प्रतिदिन ५ वेळा मशिदीवरून भोंग्यांद्वारे ऐकवली जाणारी अजान ऐकतच आले आहेत ना ? त्यांनी कधी यामुळे एखाद्या मशिदीवर आक्रमण केल्याची घटना घडली आहे का ? किंवा मुसलमानांच्या मोहरमच्या वेळी मिरवणुका काढल्या जातात, त्या बहुतेक हिंदूबहुल भागांतून जात असतात. त्यावरही भोंगे असतात; पण हिंदूंनी कधी त्याला विरोध केल्याचे ऐकले आहे का ? उलट या मिरवणुकीतील लोकांनीच हिंदूंवर आक्रमण केल्याच्या घटना घडल्या आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. हिंदूंना सर्वधर्मसमभाव शिकवणारे या गोष्टीचा विचार का करत नाहीत ?
उत्तरप्रदेश सरकारकडून शिका !
आता हिंदू जागृतही झाले आहेत आणि ते वैध मार्गाने मशिदींवरील भोंग्यांवर बंदी घालण्याची मागणीही करू लागले आहेत, हे समाजातील शांततेसाठी चांगलेच आहे. तरीही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे दायित्व आहे. त्याने ते पार पाडतांना ज्या ठिकाणी हिंदूंवर आक्रमण करण्याच्या घटना घडतात, त्या पुन्हा कधीच घडू नयेत, यासाठी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा प्रयत्न चालू केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून यावर्षी उत्तरप्रदेशमध्ये रामनवमीच्या कोणत्याही मिरवणुकीवर आक्रमण झाल्याचे वृत्त नाही. त्यामुळे उर्वरित राज्यांनी उत्तरप्रदेश राज्याकडून हे शिकायला हवे. आता भाजपेतर पक्षांकडून, उदा. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा यांच्याकडून असे होणे अशक्य आहे. तेथे हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे आणि या घटना कायमच्या रोखल्या पाहिजेत. जेथे सध्या भाजपशासित राज्ये आहेत, त्यांनी या आसुरी वृत्तीला कायद्याद्वारे लगाम घातला पाहिजे आणि कायदा अन् सुव्यवस्था कायम राखून लोकांचे आणि संपत्तीचे रक्षण केले पाहिजे.
कठोर कायद्यांचे राज्य हवे !
हिंदूबहुल देशात अल्पसंख्य असणारे हिंदूंवरच धाक ठेवतात, त्यांच्यावर आक्रमणे करतात, असे जगात केवळ भारतातच होत असणार, यात शंका नाही. त्यामुळे आता वरवरची उपाययोजना काढण्यापेक्षा मुळावर घाला घालून ही वृत्तीच मोडून काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. केवळ श्रीरामनवमीला धर्मांधांकडून झालेले आक्रमण आणि ते पुन्हा होऊ नये; म्हणून कठोर उपाययोजना काढणे एवढे पुरेसे नसून त्याच्यापुढे जाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी देशात समान नागरी कायदा प्राधान्याने केला पाहिजे. गोव्यात पोर्तुगिजांच्या काळापासून समान नागरी कायदा आहे. गोव्यात धर्मांधांची जनसंख्याही वाढत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे संपूर्ण देशात हा कायदा होणे आवश्यक आहे. त्याचसमवेत लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतरविरोधी कायदा हेही तत्परतेने संमत केले पाहिजेत. काही राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदे केले आहेत; मात्र ते आता राज्यांपुरते मर्यादित न रहाता संपूर्ण देशासाठी म्हणून केंद्र सरकारने करणे आवश्यक आहे. कर्नाटकमध्ये सध्या हिजाब, हलाल, मशिदींवरील भोंगे आदी विषयांवरून वैचारिक घुसळण चालू आहे. हेही संपूर्ण देशात होण्याची आवश्यकता आहे. जर असे झाले, तरच हिंदूंवर आक्रमण करणाऱ्यांना वठणीवर आणले जाईल आणि हिंदू शांततेत अन् सुरक्षित जीवन जगू शकतील. तेच कायद्यांचे राज्य असेल. यातूनच पुढे हिंदु राष्ट्रासाठीचे राज्यघटनेच्या स्तरावर वातावरण निर्माण होईल.