साधारण २० वर्षांपासून मी वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील यांना ओळखतो. पूर्वी मुंबई येथील सेवाकेंद्रात साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा करत होत्या. मागील १० वर्षांपासून मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असल्याने त्यांच्याशी माझा सतत संपर्क येत असतो. चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा (२.४.२०२२) या दिवशी त्यांचा ५१ वा वाढदिवस झाला त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. प्रेमभाव : मायाताई वैद्या असल्यामुळे देवद आश्रमात कुणी आजारी असेल, तर त्या साधकाला तत्परतेने साहाय्य करतात. त्या साधकांची प्रेमाने विचारपूस करतात. रात्री कुणाला त्रास होत असल्यास रुग्णाईत साधकही ताईंना हक्काने उठवतात. रात्री उठावे लागले; म्हणून त्याविषयी ताईंना त्रास वाटत नाही; उलट साधकांना साहाय्य झाल्याविषयी त्यांना आनंद होतो. साधकांनी त्यांना साधना किंवा सेवा यांविषयी काही अडचणी सांगितल्यावर त्या साधकांना वेळ देऊन सर्वतोपरी साहाय्य करतात. ‘साधकांचे त्रास दूर होऊन त्यांना आनंद मिळाला पाहिजे’, असा त्यांचा विचार असतो.
२. ऐकण्याची वृत्ती : मायाताई त्यांच्या व्यष्टी साधनेचा आढावा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना देतात. २ वर्षांपूर्वी मी त्यांच्या गटामध्ये व्यष्टी साधनेचा आढावा शिकण्यासाठी होतो. त्या वेळी ताई आढाव्यात सांगितलेली सूत्रे पूर्णपणे ऐकून घेऊन त्यानुसार कृती करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या काही साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्यामध्ये ताई साधकांच्या अडचणी आणि चिंतन पूर्णपणे ऐकून घेतात.
३. चुका स्वीकारून त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे : दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना त्यातील काही चुका गुरुकृपेने माझ्या लक्षात येतात. त्या चुका मी ताईंना सांगितल्यावर ताई त्या चुका स्वीकारतात अन् त्यांचा स्वतः अभ्यास करतात. त्याविषयी सहसाधकांना सांगून ‘योग्य काय असावे ?’, हे अभ्यासून ताई मला त्वरित आढावा देतात.
४. कोणतीही परिस्थिती सकारात्मक राहून आनंदाने स्वीकारणे : ताईंनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा, भारतभर अध्यात्मप्रसार, सूक्ष्म संबंधी सेवा इत्यादी विविध सेवा केल्या आहेत. ताईंनी त्यांच्या साधनेतील चढ-उतार आणि संघर्षमय प्रवास स्थिर राहून स्वीकारला. त्या अनेक वर्षे चिकाटीने सेवा अन् साधना करत आहेत. ‘जीवनात आलेला कोणताही प्रसंग म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली साधनेची संधी आहे’, हे लक्षात ठेवून त्या सकारात्मक रहातात आणि परिस्थिती आनंदाने स्वीकारतात’, असे मला वाटते.
५. त्यागी वृत्ती : ताई त्यांच्या घरातील सर्व सोयी-सुविधांचा त्याग करून आश्रमात रहायला आल्या आहेत. अनेक वर्षांपासून ताई आश्रमातील साधकांच्या समवेत समभावाने रहातात. त्यांच्या वागण्यातून ‘त्या उच्चशिक्षित (बी.ए.एम्.एस्.(वैद्या)) आणि उच्चभ्रू कुटुंबातून आल्या आहेत’, असे जाणवतही नाही. ताईंचे शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली, तर अशी व्यक्ती शारीरिक कष्टाची किंवा स्वच्छतेची सेवा करू शकत नाही; पण ताई त्यांना मिळालेली स्वच्छतेची सेवा, स्वयंपाकघरातील सेवा, ध्यानमंदिर आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीच्या स्वच्छतेची सेवा किंवा पूजेची सेवा भावपूर्ण अन् आनंदाने करतात. ‘ईश्वरप्राप्ती’ हे जीवनाचे ध्येय बाळगून ताई गुरुकार्यासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करून अन् झोकून देऊन सेवारत आहेत’, असे मला वाटते.
६. तत्त्वनिष्ठता : ‘सहसाधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी आणि गुरुकार्याची हानी होऊ नये’, यासाठी ताई सर्वांच्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगतात. आश्रमातील काही सहसाधक वयाने मोठे असूनही त्यांच्याकडून काही चुकल्यास ताई त्यांना तत्त्वनिष्ठपणे चुका सांगतात. त्यांचा मनाचा अभ्यास चांगला आहे. वर्ष २०१० पासून मी त्यांना साधनेच्या दृष्टीने ‘एखाद्या प्रसंगात योग्य-अयोग्य काय असू शकते ?’, याविषयी विचारून घेऊन प्रयत्न करतो. ताई सर्व सेवा नियोजनानुसार आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित होण्यासाठी प्रयत्न करतात. ताई कुठलीही सवलत न घेता सेवा करतात.
७. साधकांना साधनेत साहाय्य करून प्रोत्साहन देणे : ‘वयस्कर असूनही ईश्वरप्राप्तीचे ध्येय उराशी बाळगून सतत सेवारत असणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील वयस्कर साधक !’ या मथळ्याखाली ताईंनी लिहिलेला लेख १७.२.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित झाला होता. ताईंनी आश्रमातील माझ्यासारख्या साधारण ७० ते ७५ वयस्कर साधकांतील गुणवैशिष्ट्यांचा लेख लिहून सर्वांना साधनेसाठी प्रेरणा दिली. ताईंमध्येही विविध गुण आहेत; म्हणून त्यांना माझ्यासारख्या वयस्कर साधकातील गुण दिसतात. त्याविषयी मला त्यांचे कौतुक वाटले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ताई त्यांच्या कुटुंबियांनाही साधनेत साहाय्य करतात.
८. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : एकदा त्या सांगली येथे त्यांच्या घरी गेल्या होत्या. घरी जाण्यापूर्वी त्यांनी व्यष्टी साधनेच्या दृष्टीने प्रयत्नांचे ध्येय घेतले होते. त्यानुसार त्यांनी स्वतःमध्ये चांगले पालट केले. पूर्वीच्या तुलनेत त्यांच्यातील ‘अपेक्षा करणे, इतरांना शिकवणे, कुटुंबियांना समजून न घेणे, सवलत घेणे’ इत्यादी अहंचे पैलू न्यून झाले आहेत. त्या घरी असतांनाही त्यांची व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा चालू होती.
९. सेवेची तळमळ : ‘ताई स्वतःमध्ये पालट करून परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे मला वाटते. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा करतांना समयमर्यादा, अचूकता, तत्त्वनिष्ठता, ध्येय-धोरणांशी एकरूपता यांची पथ्ये पाळावी लागतात. ताई स्वतः वैद्या असूनही नियतकालिकातील सेवा तळमळीने करतांना दिसतात. ‘त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या समवेत सेवा करणारे आणि संपर्कातील साधक चांगली सेवा करत आहेत’, असे मला वाटते. त्यांना ऐनवेळी कोणतीही सेवा दिली, तरी त्या ती सेवा आनंदाने स्वीकारून तळमळीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : ताईंकडे कोणतीही सेवा आली, तरी ‘गुरुदेव ती करवून घेणार आहेत’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे सेवा करतांना त्यांना ताण येत नाही. सेवा करतांना ‘ती गुरुदेवांच्या कृपेमुळे होत आहे’ आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर ‘ती गुरुदेवांनीच करवून घेतली’, असा त्यांचा भाव असतो. ‘गुरुदेव आध्यात्मिक प्रगती करवून घेणार आहेत’, अशी त्यांची श्रद्धा असल्यामुळे त्यांना पूर्वीसारखी स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी काळजी वाटत नाही. ‘साधनेत आल्यापासून गुरुदेवांनी कसे घडवले आहे ?’, याविषयी ताईंच्या मनात गुरुदेवांविषयी असलेला कृतज्ञताभाव जाणवतो. ‘परात्पर गुरु डॉक्टरांप्रती ताईंचा अपार भाव असल्यामुळे ते त्यांच्याकडून भावपूर्ण सेवा आणि साधना करवून घेत आहेत’, असे मला वाटते.
११. जाणवलेले पालट
११ अ. मनातील विचार प्रांजळपणे सांगणे : पूर्वी ताईंकडून मनातील विचार प्रांजळपणे सांगितले जात नव्हते; परंतु आता त्या साधनेच्या संदर्भातील कोणत्याही प्रसंगातील विचार सहजपणे सांगतात. ‘मनामध्ये चुकीचा किंवा नकारात्मक विचार आला, तर तोही त्या सांगतात आणि त्यावर कसे प्रयत्न करायला हवेत ?’, असे संबंधित साधकाला किंवा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात विचारतात.
११ आ. अलीकडे ‘त्यांची सेवा आणि साधना करण्याची तळमळ अन् त्यांच्यातील परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा भाव वाढत आहे’, असे मला जाणवते.
मायाताई जैन पंथीय आहेत. ‘त्या त्यांच्या धर्मानुसार साध्वी होण्याऐवजी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करणाऱ्या विरक्त अन् गुणवंत साधिका आहेत’, असे मला वाटते. ताईंमधील ‘गुरुकार्याची आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ, चिकाटी, प्रांजळपणा, गुरूंप्रती भाव’ इत्यादी गुण आम्हा साधकांत येऊ देत’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.३.२०२२)