अशांत पाकिस्तान आणि भारताला विविध अंगांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. पाकिस्तानची अर्थव्यवस्था अतिशय खालावणे आणि तो केवळ कर्जावर जिवंत असणे

पाकिस्तानमधील हिंसाचाराचा संबंध हा पाकिस्तानी सरकार, तेथील जनता आणि त्यांचे सैन्य यांच्याशी आहे. ही परिस्थितीही अतिशय गंभीर आहे. पूर्वी पाकिस्तानचे ८५ टक्के सैन्य हे भारत-पाक सीमेवर तैनात असायचे आणि १५ टक्के सैन्य हे उत्तर-पश्चिम प्रांत, म्हणजे अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तैनात असायचे. आता मात्र पाकिस्तानचे ५० टक्के सैन्य हे त्यांच्या विविध प्रांतांमध्ये किंवा अफगाणिस्तानच्या सीमेवर सुरक्षेसाठी गुंतलेले आहे आणि फारच थोडे सैन्य हे भारत-पाक सीमेवर तैनात आहे. पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुरक्षेचे विशेषत: आतंकवादाचे प्रचंड मोठे आव्हान आहे. इम्रान खान सध्या पाकिस्तान सैन्याचे आवडते राहिलेले नाहीत. निवडणूक झाली, तेव्हा पाकिस्तानी सैन्याला वाटले होते की, अन्य राजकीय पक्षांपेक्षा इम्रान खान हाताळायला अधिक सोपे असतील. त्यामुळे त्यांनी इम्रान खान यांना पाठिंबा दिला होता.

इम्रान खान यांच्याकडे बहुमत नव्हते, तरीही त्यांनी लहान लहान पक्षांचा पाठिंबा घेऊन राज्यकारभार चालू केला. त्यानंतर पाकिस्तानची आर्थिक स्थिती चांगली होण्याऐवजी ती अधिकच खालावत गेली. सध्या पाकिस्तानमध्ये सामान्य माणसांचे जीवन अतिशय कष्टप्रद झाले आहे. तेथे महागाई प्रचंड वाढली आहे. पाकिस्तान केवळ कर्ज काढूनच जिवंत रहात आहे.

अशांत पाकिस्तान !

२. पाकिस्तानच्या डबघाईच्या स्थितीवर तेथील अर्थमंत्र्यांनी मजेशीर उत्तर देणे

आज पाकिस्तानला प्रतिवर्षी फेडाव्या लागणार्‍या कर्जाच्या मुद्दलावरील व्याज आणि त्यांच्या सैन्यावरील खर्चाचे अंदाजपत्रक यांची एकत्रित रक्कम ही त्याच्या अर्थसंकल्पाहून ५ ते १० टक्के अधिक आहे. याचा अर्थ पाकिस्तान त्यांचे सैन्य कर्ज घेऊन वाढवत आहे. यावरून त्यांची परिस्थिती किती वाईट आहे, हे लक्षात येते. या संदर्भात एका प्रतिनिधीने पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांना प्रश्न केला, ‘‘अशा परिस्थितीत तुम्हाला भीती वाटत नाही का ?’’ यावर मजेशीर उत्तर देतांना ते म्हणाले, ‘‘पाकिस्तानची आर्थिक स्थिती वाईट आहे, यात काही संशय नाही; पण त्याची भीती आम्हाला वाटत नाही, तर संपूर्ण जगाला वाटते आणि जग हे पाकिस्तानला एक देश म्हणून उद्ध्वस्त होऊ देणार नाही.’’

 (सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)

३. पारंपरिक युद्ध करण्याचे धाडस नसल्याने पाकिस्तान अन्य मार्गाने भारताच्या कुरापती काढण्याची शक्यता असणे

सध्याच्या घडीला भारताच्या खोड्या काढण्याची पाकिस्तानकडे शक्ती नाही. पाकिस्तानने भारताच्या विरोधात शेवटचे युद्ध वर्ष १९९९ मध्ये कारगीलमध्ये लढले होते. सध्या पाकिस्तानी सैन्य हे अतिशय नरम झाले आहे. पाकिस्तानच्या प्रशासनामध्ये पाकिस्तानी सैन्याचा पुष्कळ सहभाग आहे. त्यांचे कर्नल स्तरावरचे अधिकारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक या पदावर रुजू होतात. पाकिस्तानी सैन्याला पाकिस्तानने आर्थिक जीवनामध्ये एवढे महत्त्वाचे बनवले आहे की, पाकिस्तानमध्ये सर्वाधिक भूमी पाक सैन्याची आहे. पाकिस्तानी सैन्य हे व्यावसायिक आहे. त्यांचे नेतृत्वही बर्‍यापैकी आहे; परंतु त्यांच्यात भारताशी पारंपरिक युद्ध करण्याचे धाडस नसल्यामुळे त्यांच्यात त्या युद्धाची शक्यता जवळपास शून्य आहे, असे असले तरी पाकिस्तान काश्मीरमध्ये तालिबान किंवा इतर जिहादी आतंकवादी यांची घुसखोरी करून हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न करील. तसेच सीमावर्ती राज्यांमध्ये अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे यांच्या तस्करीमध्ये अधिक वाढ करण्याचा प्रयत्न करत राहील.

४. भारतीय सीमा सुरक्षा दलाला सर्व भूमी आणि समुद्री सीमा यांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल !

काश्मीर खोर्‍यातील आतंकवाद जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला प्रतिवर्षी २०० ते २५० आतंकवादी पाठवावे लागतात. अर्थातच भारतीय सैन्य त्यांचा कठोरपणे बीमोड करते. असे म्हटले जाते की, आज भारतातील पंजाबचे ५० टक्के युवक हे व्यसनाच्या आहारी गेले असावेत, इतकी पंजाबची स्थिती वाईट आहे. तेथे पुष्कळ मोठ्या प्रमाणात आतंकवाद वाढलेला आहे. त्याला बाहेरूनही मोठ्या प्रमाणात साहाय्य मिळत आहे. पूर्वी पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी केली जायची. आता ते ड्रोनच्या माध्यमातून पाठवले जातात. गुजरातजवळ असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासूनही अमली पदार्थांची तस्करी केली जाते. त्यामुळे भारताला प्रथम काश्मीर खोरे, दुसरे पंजाबसारखे सीमावर्ती राज्य आणि तिसरे समुद्राचा भाग या ठिकाणी सतर्क रहाणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय सीमा सुरक्षा दलाला सर्व जमिनी आणि समुद्री सीमा यांकडे लक्ष ठेवावे लागेल.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.