५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिंचवड, पुणे येथील चि. वेद संभाजी माने (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. वेद संभाजी माने हा या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

चैत्र शुद्ध पक्ष चतुर्थी (५.४.२०२२) या दिवशी चिंचवड, पुणे येथील चि. वेद संभाजी माने याचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. वेद माने

चि. वेद संभाजी माने याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. गर्भारपण

१ अ. गरोदर असतांना सात्त्विक अन्न ग्रहण करण्याचे डोहाळे लागणे : ‘मला गरोदरपणी चमचमीत पदार्थ किंवा बाहेरचे काही खावे’, असे वाटत नव्हते. ‘आश्रमातील अन्न किंवा सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद ग्रहण करावा’, असे डोहाळे मला लागले होते.

१ आ. ‘इतरांशी जुळवून घेऊन त्यांना साहाय्य करावे’, असे वाटणे : माझा स्वभाव इतरांशी पटकन जुळवून घेणारा नाही किंवा नवीन व्यक्तींशी मी पटकन बोलत नाही; परंतु गरोदर असतांना मला ‘इतरांमध्ये मिसळावे, त्यांच्याशी बोलावे किंवा त्यांना साहाय्य करावे’, असे सतत वाटायचे आणि तसे केल्याविना माझे मन शांत व्हायचे नाही.

१ इ. श्रीरामाचा नामजप सतत होणे : माझा सतत श्रीरामाचा नामजप होत होता. माझ्या सेवेशी संबंधित असलेल्या एका ताईच्या मनात माझ्या बाळाचा विचार आल्यावर तिला श्रीरामाचे स्मरण होत असे.

१ ई. नववा मास – साधिकेला राग आल्यावर गर्भाची हालचाल पुष्कळ वाढणे : माझ्यात ‘राग येणे’ हा अहंचा पैलू तीव्र स्वरूपात आहे. जेव्हा मला पुष्कळ राग यायचा, तेव्हा गर्भाची हालचाल पुष्कळ वाढायची. त्या वेळी ‘गर्भ मला शांत होण्यास सांगून ‘माझी चूक लक्षात आणून देत आहे’, असे मला जाणवायचे.

२. प्रसुतीच्या वेळी श्वास घेतांना साधिकेला त्रास होणे आणि त्या वेळी तिचा ‘परम पूज्य’ असा नामजप आपोआप चालू होणे

सौ. मीरा माने

१६.४.२०२१ या दिवशी बाळाचा जन्म झाला. प्रसुतीच्या वेळी मला श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे ‘बाळाला दुखापत होऊ शकते’, असे प्रसुतीतज्ञ सांगत होते. त्या वेळी माझा ‘परम पूज्य’ असा नामजप आपोआप होत होता. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘सुखरूप प्रसुती होईल’, असे सांगितले होते आणि तसेच झाले.

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते २ मास

१. जन्म झाल्यापासून आतापर्यंत बाळ फारसे कधी रडले नाही. समाजातील लोकही म्हणतात, ‘‘हा पुष्कळ शांत आहे. रडका नाही.’’

२. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला कावीळ झाली होती. त्यामुळे ‘त्याला रुग्णालयात २४ घंटे ठेवावे लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते; पण सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपामुळे बाळ १० – १२ घंट्यांतच घरी आले.

३ आ. वय – ३ ते ६ मास

३ आ १. सात्त्विकतेची ओढ : वेदला खेळण्यांचे फारसे आकर्षण नाही; पण सात्त्विक वस्तू, उदा. सनातनची टोपी, सनातन-निर्मित शुभेच्छापत्र यांच्याशी तो पुष्कळ वेळ खेळत असे आणि ‘त्यांच्याशी काहीतरी बोलत आहे’, असा आवाज करत असे.

३ आ २. ‘सनातन पंचांग’ आवडणे : ‘सनातन पंचांग’ दाखवल्यावर वेदला आनंद होऊन तो मोठ्याने हसायचा. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राशी तो त्याच्या शब्दांत बोलत असे.

३ इ. वय – ७ ते ११ मास

३ इ १. जयघोष किंवा श्लोक ऐकल्यावर नमस्कार करणे : दिवसभर माझ्या आईचे सेवेनिमित्त वेगवेगळे सत्संग चालू असतात. सत्संगांतील जयघोष किंवा श्लोक ऐकल्यावर वेद कुठेही खेळत असला, तरी आईच्या जवळ जाऊन डोके टेकून नमस्कार करतो.

३ इ २. आनंदी स्वभावाच्या वेदकडे समाजातील व्यक्ती आकर्षित होणे

अ. एकदा वेदला पुष्कळ कफ झाल्यामुळे ३ – ४ दिवस रुग्णालयात भरती केले होते. तेव्हा तेथील आधुनिक वैद्य आणि परिचारिका त्याच्याकडे आकर्षित होत.

आ. एकदा मी वेदला चिकित्सालयात घेऊन गेले होते. तिथे एक लहान मुलगी रडत होती. वेद तिच्याकडे पाहून हसू लागला. तेव्हा ती तिचे रडणे विसरून वेदकडे पाहून आनंदी झाली आणि हसू लागली.

३ इ ३. वेद बाहेर गेल्यावर पुष्कळ शांत रहातो. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी वेदला जणू आपत्काळाला तोंड देण्यासाठी सिद्ध करूनच पाठवले आहे’, असे मला वाटते.

४. चि. वेदमधील स्वभावदोष

हट्टीपणा

कृतज्ञता आणि प्रार्थना

‘परात्पर गुरु डॉक्टर, माझी पात्रता नसतांनाही हे दैवी बालक मला दिले, यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टर, आमच्या साधनेतील अडथळे दूर करून आम्हाला आपल्या चरणांशी घ्या’, हीच तुमच्या कोमल चरणी संपूर्ण शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– सौ. मीरा संभाजी माने (चि. वेदची आई), चिंचवड, पुणे. (१९.३.२०२२)


उपजतच सात्त्विकतेची ओढ असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा चिंचवड, पुणे येथील चि. वेद संभाजी माने (वय १ वर्ष) याची त्याच्या आजीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. ‘चि. वेद २ मासांचा असतांना एकदा भावसत्संगाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ प्रार्थना सांगत होत्या. त्या वेळी पाळण्यात झोपलेल्या वेदचे दोन्ही हात जोडलेले होते.

२. वेदला खाण्या-पिण्याची आवड-नावड नाही. तो ६ मासांचा झाल्यावर त्याला मऊ भात, शिरा असे पदार्थ खाऊ घालू लागलो. एखादा पदार्थ ‘नको’, असे त्याने कधी म्हटले नाही.

३. वेद बर्‍याच वेळा कृष्णाशी काहीतरी बोलत असतो. त्याच्या खोड्या आणि हसणे पाहून बालरूपातील कृष्णाची आठवण होते.

४. तो ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ हातात घेऊन न्याहाळतो.’

– सौ. शांता राजकुमार दराडे (चि. वेदची आजी, आईची आई), चिंचवड, पुणे. (१९.३.२०२२)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.