आदर्श समाजासाठी धर्मशिक्षणच हवे !

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांची चारित्र्य पडताळणी करावी लागणे, हे नीतीमत्ता खालावल्याचे निदर्शक !

पुणे येथील एका शाळेत एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दर ५ वर्षांनी चारित्र्य पडताळणी करण्याविषयी सूचना देण्यात याव्यात’ अशी सूचना राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार ‘पडताळणी केल्यावर अहवाल प्रतिकूल असल्यास अशा कर्मचाऱ्यास वेळीच योग्य समज द्यावी, तसेच शाळेतील सर्व प्रांगण, प्रयोगशाळा, व्यायामशाळा, स्वच्छतागृह सर्व ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवावेत. त्याखेरीज जागोजागी विद्यार्थ्यांचे हात पोचतील, अशा उंचीवर ‘सिक्युरिटी अलार्म्स’ (सुरक्षिततेसाठी घंटा) बसवावे’, असे सूचित केले आहे. या सूचना ऐकून शाळा आणि शिक्षक यांची वाटचाल किती अधोगतीच्या दिशेने होत चालली आहे, हे प्रकर्षाने लक्षात येते.

वैदिक संस्कृतीने शिक्षकाला अत्युच्च स्थान दिले आहे. एक शिक्षक अनेक विद्यार्थी घडवत असतात. हेच विद्यार्थी पुढे समाज आणि राष्ट्र निर्मितीत मोलाचे योगदान देत असतात. राष्ट्राच्या उभारणीचा मुख्य पायाच शिक्षक आहे. शिक्षक मुलांच्या जीवनात गुरु असतात आणि ते विद्यार्थ्याला योग्य दिशा देण्यासह मार्गदर्शन करतात. या जगात गुरु-शिष्य हे नाते सर्वांत पवित्र मानलेले आहे; पण दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेतील शिक्षकांची चारित्र्य पडताळणी करावी लागत आहे. याहून समाजाचे दुसरे अधःपतन काय असू शकते ? अशी वेळ का आली ? याचाही विचार होणे आवश्यक आहे. चारित्र्यवान पिढी घडवून एक सक्षम समाज निर्माण करण्याचे दायित्व शिक्षकांचे असते. असा विद्यार्थी घडवण्याचे दायित्व पार पाडण्यासाठी शिक्षकांनी प्रथम स्वतःच स्वतःला घडवावे (चारित्र्यवान करावे), तरच ते चारित्र्यवान विद्यार्थी घडवू शकतील.

रामायण, महाभारत काळी ‘गुरुकुल शिक्षणपद्धत’ होती. महर्षि वाल्मीकि, व्यासमुनी, द्रोणाचार्य यांनी आपल्या शिष्यांना सर्वाेत्तम करण्यात धन्यता मानली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलींपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी आदी संतांनी धर्मशिक्षण हा पाया ठेवून लोकशिक्षण आणि लोकोद्धाराचे महान कार्य हाती घेऊन समाजोद्धार घडवून आणला. आताही शाळेतून धर्मशिक्षण दिल्यासच नीतीवान समाज निर्माण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक आदर्श होण्यासाठी धर्मशिक्षणच आवश्यक आहे !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे