कमान आणि मंडप यांवर दीड कोटीहून अधिक, तर रांगोळीवर १ लाखांहून अधिक रुपये उधळले !
|
नाशिक – येथील ‘भुजबळ नॉलेज सिटी’च्या मैदानात ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील मंडप आणि कमानी यांवर १ कोटी ६१ लाख ७० सहस्र ९७० रुपये, तर रांगोळीवर १ लाख २२ सहस्र रुपये व्यय झाल्याचे संमेलनाच्या ताळेबंदातून निदर्शनास आले. त्यामुळे संमेलनाच्या स्वागत समितीच्या सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
संमेलनाच्या स्वागत समितीच्या सदस्यांनी तगादा लावल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी संमेलनाचा ताळेबंद मांडला. (पदाधिकाऱ्यांनी संमेलनाचा हिशेब स्वतःहून का सादर केला नाही ? हे जनतेला कळले पाहिजे ! – संपादक) संमेलनासाठी एकूण ३ कोटी ५७ लाख ४५ सहस्र ५९४ रुपये जमा झाले होते. त्यांपैकी ३ कोटी ४४ लाख २८ सहस्र ९३८ रुपये व्यय झाले. शेष असलेले १३ लाख १६ सहस्र ६३५ रुपये लोकहितवादी मंडळाला मिळणार आहेत.
१. संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी देणगीच्या स्वरूपात केवळ ६० लाख ६२ सहस्र रुपये मिळवले आहेत. संमेलनाच्या हिशोबात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केवळ ३ लाख २ सहस्र ९७९ रुपये व्यय झाल्याचे दाखवण्यात आले आहे; मात्र नाशिक येथील कलाकारांनी सादर केलेल्या ‘आनंदयात्रा’ या कार्यक्रमाचे अंदाजपत्रकच ३ लाख रुपयांचे होते. मग ‘संमेलनात संदीप-सलील, अवधूत गुप्ते आदी कलाकारांचे कार्यक्रम विनामूल्य झाले का ?’, अशी चर्चा स्वागत समितीच्या सदस्यांमध्ये चालू आहे. एवढेच नव्हे, तर एका निवेदिकेला एका कार्यक्रमाचे तब्बल ७५ सहस्र रुपये देण्यात आले आहेत.
२. ताळेबंदामध्ये केवळ ‘आनंदयात्रा’ कार्यक्रमाचाच व्यय का धरण्यात आला ? ‘माझे जिवाची आवडी’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमांच्या व्ययाचे काय ? तो का दाखवण्यात आला नाही ?, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.