हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या संपर्क दौर्याची फलनिष्पत्ती !
अमरावती, १७ मार्च (वार्ता.) – अमरावती जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा संपर्क दौरा नुकताच पार पडला. यामध्ये विविध संप्रदायांचे संत, हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक यांच्या भेटी घेण्यात आल्या, तसेच काही ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले. या दौर्याला येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्याला माझे आशीर्वाद ! – जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार, रुक्मिणी पीठ, विदर्भ
अमरावती येथील दसरा मैदानात हिंदु राष्ट्राची सामूहिक गुढी यंदाही उभारूया. सनातनचे कार्य अमरकंटक, मध्यप्रदेश येथेही व्हायला हवे. त्यासाठी मी कार्यकर्त्यांची संपूर्ण व्यवस्था करीन. कौंडण्यपूर (जिल्हा अमरावती) येथे धर्मसंसदेचे आयोजन करायला हवे. ‘हलाल’ प्रमाणपत्र या विषयावर मी स्वतः निवेदन पाठवून त्याचा राष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा करीन. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्याला माझे आशीर्वाद आहेत ! (या भेटीच्या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती होती.)
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात मी सहभागी होईन ! – चंद्रकुमारजी जाजोदिया, प्रतिष्ठित उद्योजक आणि हिंदुत्वनिष्ठ
सनातन संस्थेचे धर्मदान अभियान, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्य यांत मी सहभागी होईन. इतर उद्योजकांकडूनही त्यात योगदान मिळण्यासाठी प्रयत्न करीन. अमरावती येथील प्रतिष्ठित उद्योजकांची बैठक आयोजित करीन.
‘व्यापारी असोसिएशन’मध्ये ‘हलाल’ प्रमाणपत्र या विषयावर बैठक आयोजित करीन ! – प्रशांत मुंदडा, मंगलम् वस्त्रालयाचे मालक आणि हिंदुत्वनिष्ठ उद्योजक
माझा साड्यांचा व्यवसाय असल्याने महिलांसमवेत अधिक संपर्क येतो. त्यामुळे मी सनातन संस्थेचे धर्माचरणविषयीचे ग्रंथ महिलांना देतो. मी ‘हलाल’ प्रमाणपत्राविषयी व्यापारी असोसिएशनमध्ये बैठक आयोजित करून हिंदु जनजागृती समितीला विषय सांगण्यासाठी बोलावीन.
पू. संतोषकुमारजी महाराज यांच्या शिवधारा आश्रमाचे सहकार्य !
शिवधाराच्या कार्यकर्त्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या विविध शिबिरांचे (प्रथमोपचार, सोशल मिडिया, वक्ता-प्रवक्ता इत्यादी) आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. शिवधारा आश्रमाकडून अमरावती येथे होणार्या हिंदु जनजागृती समितीच्या विविध शिबिरांसाठी विनामूल्य भोजन व्यवस्था केली जाते. ‘शिवधारा आश्रमाचे बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू झाले आहे. त्यामध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय सिद्ध करण्यात येत आहे. तेथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना विनामूल्य उपचार देऊ’, असे पू. संतोषकुमारजी महाराज यांनी सांगितले.
‘हलाल सर्टिफिकेट’ याविषयी जागृती करण्यासाठी बैठकांचे आयोजन !
अमरावती येथील बडनेरा, रामपुरी कँप, तसेच अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात ‘हलाल’ प्रमाणपत्राविषयी जागृती करण्यात आली. बडनेरा येथे भाजप कार्यकारिणी बैठकीमध्ये याविषयी चर्चा करण्यात आली. रामपुरी कँप येथील श्री. आत्माराम पुरसवानी यांच्या निवासस्थानी झालेल्या व्यापारी संघटनेच्या बैठकीनंतर अन्य असोसिएशनमध्ये दोन बैठका, तर मासातून एकदा अशा बैठका घेण्याचे ठरले.
श्री विठ्ठल मंदिर, तालुका मूर्तीजापूर (जिल्हा अकोला) येथील बैठकीच्या आयोजनासाठी अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रकाश सिरवानी यांनी हिंदुत्वनिष्ठ श्री. संदीप हुंदानी यांच्याशी संपर्क करून पुढाकाराने प्रयत्न केले. बजरंग दलाचे प्रखंड संयोजक आणि व्यापारी महासंघ सचिव श्री. आनंद बांगड यांनीही साहाय्य केले. या वेळी ‘हलाल’ प्रमाणपत्राच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि हिंदूसंघटन करण्याचा निर्धार करण्यात आला.
धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची बैठक उत्साहात पार पडली !
वाठोडा शुक्लेश्वर (जिल्हा अमरावती) येथील हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात येणार्या धर्मप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये धर्मप्रेमींनी प्रभावी हिंदूसंघटन कसे करावे, तसेच हिंदु राष्ट्राच्या कार्यातील साधनेचे महत्त्व समजून घेतले. त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
श्रीराम सेनेच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत अमरावती येथे हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाने हिंदूसंघटन करण्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले, तसेच मासातून एकदा अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेण्याचा निश्चय करण्यात आला. या बैठकीसाठी श्रीराम सेनेचे संयोजक श्री. विजय दुबे यांनी प्रयत्न केले.
क्षणचित्र – मूर्तीजापूर येथील बैठकीचे आयोजन करतांना तेथील धर्मप्रेमींना अडचणी असूनही त्यांनी पुढाकाराने बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीमध्ये जास्त वेळ उपस्थित राहू शकणार नाही, याविषयी त्यांनी खेद व्यक्त केला. प्रत्यक्ष भेट घेतलेली नसतांनासुद्धा त्यांनी बैठकीची व्यवस्था उत्तम केली होती.