‘काश्मीरमध्ये १९ जानेवारी १९९० मध्ये काय झाले ? हे ज्यांना ठाऊक आहे आणि ज्यांना ठाऊक नाही, त्यांना ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना माहिती होईल. ही गोष्ट काश्मीरची आणि काश्मीरमधील हिंदु पंडितांची आहे. त्यांच्यावरील अत्याचार आजपर्यंत जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आले. ही गोष्ट पुष्करनाथ पंडित आणि त्यांच्यासारख्या लक्षावधी काश्मिरी पंडितांची आहे, ज्यांना एका रात्रीत सर्व संपत्ती सोडून काश्मीर खोर्यातून पळून जावे लागले. हा चित्रपट त्यांच्यावरील अत्याचारांचे चित्रण दाखवणारे उघड सत्य आहे. जे तुम्हाला आतून हादरवून टाकते.
काश्मिरी हिंदूंविषयी केलेले वास्तव चित्रण पाहून हिंदूंची होत असलेली स्थिती
विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचा पहिला खेळ पाहिला. माझ्या डोळ्यांतून संपूर्ण अडीच घंटे केवळ अश्रू वहात होते. मध्यंतरामध्ये ‘हा चित्रपट नक्की पहा’, हे सांगण्यासाठी मी आई-वडिलांना दूरभाष केला; पण त्यांच्याशी मी एक शब्दही बोलू शकलो नाही. असे चित्रपटगृहामध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे होत होते. हा चित्रपट पहातांना शीतपेय किंवा खाद्यपदार्थ यांची मागणी देऊ नका; कारण आपल्या समोरील एका दृश्यात खोर्यातून पळून गेलेल्या हिंदूंजवळ खाण्यासाठी काहीच नसते. तेव्हा पुष्करनाथ पंडितच्या भूमिकेत असलेले अभिनेते अनुपम खेर ‘पारले’ आस्थापनाचे एक बिस्कीट चाटून ठेवून देतात, जेणेकरून उद्यासाठी त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीतरी असावे ! त्यामुळे हे दृश्य पहातांना तुमच्या हातात ‘पॉपकॉर्न’ किंवा ‘बर्गर’ असेल, तर तुम्ही खजील व्हाल.
काश्मिरी पंडिताची भूमिका साकारणार्या अभिनेत्याने विदीर्ण करणारा अनुभव सांगणे
या चित्रपटामध्ये सर्वच अभिनेत्यांनी त्यांच्या भूमिका ताकदीने रंगवल्या आहेत; परंतु तुमच्या आत्म्याला जर कुणी विदीर्ण करत असेल, तर ते अभिनेते अनुपम खेर यांनी साकारलेली भूमिका ! त्यांनी यापूर्वीच्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते, ‘या चित्रपटाचे प्रत्येक दृश्य चित्रित केल्यानंतर मी रडलो आहे.’ त्यांनी असे का म्हटले असावे ? हे चित्रपट पाहिल्यावर माझ्या लक्षात आले.
काश्मिरी पंडितांनी कलम ३७० हद्दपार करण्यासाठी चिकाटीने लढा देणे आणि ‘जे.एन्.यू.’मध्ये ‘पंडित’ आडनावाचा अपवापर केला जाणे
आता पुष्करनाथजी यांचे संपूर्ण कुटुंब संपले आहे; परंतु ते शेवटच्या श्वासापर्यंत काश्मीरमधून कलम ३७० हद्दपार करण्यासाठी चिकाटीने लढत राहिले. (कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीर विशेष स्वायत्तता असलेले राज्य होते. हे कलम केंद्रशासनाने आता रहित केले आहे.) याविषयी त्यांनी सरकारला ६ सहस्रे पत्रे लिहिली; परंतु तेथे ऐकणारे कुणीच नव्हते. त्यांचाच नातू ‘कृष्णा’ जो त्याच्या कुटुंबावर झालेल्या अन्याय आणि अत्याचार यांपासून अनभिज्ञ आहे, तो ‘जे.एन्.यू.’च्या (जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या) विषारी वातावरणामध्ये जातो, तेव्हा त्याला कशा प्रकारे भुलवले जाते ? कशा प्रकारे त्याच्या ‘पंडित’ आडनावाचा अपवापर केला जातो ? आणि त्यालाही कसे ‘टुकडे टुकडे’ टोळीचा एक भाग बनवण्यात येते, हेही आपण चित्रपटात पाहू शकतो.
चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीमाध्यमांचे खरे स्वरूप उघड होणे
या चित्रपटामध्ये प्रसिद्धीमाध्यमांचे (मिडियाचे) खरे स्वरूप पाहून स्वतःला अतिशय दु:ख होते. प्रसिद्धीमाध्यमवाले स्वतःला वाचवण्यासाठी गप्प बसतात; कारण सरकार आणि जिहादी यांचा त्यांच्यावरील दबाव ! ज्यामुळे सत्याचा श्वास दाबला गेला.
नवीन पिढीला हिंदु संस्कृती अन् इतिहास यांच्यापासून वंचित ठेवले जाणे
हा चित्रपट येण्यापूर्वी आपल्या पिढीतील किती लोकांना ठाऊक होते की, ‘पंचतंत्र’च्या बोधकथा काश्मीरमध्ये लिहिण्यात आल्या ? भरतमुनी यांनीही ‘नाट्यशास्त्र’ काश्मीरमध्येच लिहिले होते. आपल्या मुलांना चांगली शाळा आणि उच्च कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकवण्याच्या नादात आपण नवीन पिढीला कशा प्रकारे हिंदु संस्कृती अन् इतिहास यांच्यापासून वंचित ठेवत आहोत, हे प्रकर्षाने जाणवते.
धर्मनिरपेक्षतेवर बोलणारे आणि ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, अशा सर्वांनी चित्रपट पहायला हवा !
चित्रपटाच्या शेवटी कृष्णा जे काही सांगतो, त्याला एकदा नाही, तर सहस्रो वेळा ऐका, समजून घ्या आणि विचार करा की, आजपर्यंत आम्हाला काश्मीरमध्ये झालेल्या या घृणित घटनेविषयी का ठाऊक नव्हते ? टुकडे टुकडे टोळीच्या कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ त्या वेळी उभे रहाणारे, धर्मनिरपेक्षतेवर बोलणारे आणि ज्यांना या देशात असुरक्षित वाटते, अशा सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पहावा अन् काश्मिरी पंडितांनी किती सहन केले असेल ? हे समजून घ्यावे. या चित्रपटामध्ये कुणाला काय वाटेल, याचा विचार न करता वास्तव दाखवले आहे.
काश्मिरी हिंदूंविषयीचे सत्य नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
हा केवळ एक चित्रपट नाही, तर एक सणसणीत चपराक असून तो आपल्याला सत्य दाखवतो. आजही काश्मिरी हिंदू त्यांच्या काश्मीरमध्ये परत जाण्यासाठी आतूर आहेत. आता कुठेही तुमच्या कानांवर ‘हमे चाहिए आझादी’ (आम्हाला स्वातंत्र्य हवे) असे शब्द कानी ऐकू आले, तर तुमचे रक्त खवळल्याविना रहाणार नाही. शेवटी ३२ वर्षांनी का होईना, हे सत्य लोकांच्या मेंदूपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– एक राष्ट्रप्रेमी
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)