युक्रेनचा गनिमी कावा आणि त्याने केलेल्या चुका !

प्रातिनिधिक छायाचित्र

१. युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या सैन्यावर गनिमी काव्याने आक्रमण केल्यामुळे त्यांना आगेकूच करण्यास वेळ लागणे

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

‘छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘गनिमी कावा’ ही युद्धनीती अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यांचे सैनिक शत्रूच्या सैन्यावर विविध ठिकाणांहून येऊन अचानक आक्रमण करायचे. आज युक्रेनचे सैन्य तेच करत आहे. रशियाचे रणगाडे १००-२०० किलोमीटर परिसरात पसरले आहेत. शत्रूची वाहने शहराच्या आत आलेली आहेत. त्यांच्यावर युक्रेनचे सैनिक रॉकेट लाँचरच्या साहाय्याने आक्रमणे करून त्यांचा घात करत आहेत आणि याविषयीच्या अनेक चित्रफिती प्रसारित झाल्या आहेत. अनेक रणगाडे आणि विविध शस्त्रास्त्रे यांचे रक्षण करण्यास रशियाचे सैन्य असमर्थ आहे. युक्रेनचे सैन्य त्यांच्यावर रात्रीची वेळ साधून किंवा सकाळच्या वेळी अचानकपणे आक्रमण करत आहेत. त्यामुळे रशियाच्या सैन्याचा पुढे जाण्याचा वेग अतिशय मंदावला आहे. रशियाच्या सैन्याला लढण्यासाठी जे अन्नधान्य, पेट्रोल आणि युद्धसामुग्री लागते, ते मिळण्यासही वेळ लागत आहे. त्यामुळे १७ दिवसांनीही रशियाचे सैन्य युक्रेनच्या कीव राजधानीला कह्यात घेऊ शकलेले नाही. त्यामुळे येणार्‍या काळात अशा प्रकारची गनिमी काव्याची आक्रमणे वाढण्याची शक्यता आहे.

२. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्या ३ चुका

अनेकांच्या मते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी ३ मोठ्या चुका केल्या आहेत आणि आज या चुका युक्रेनला लक्षात येत आहेत.

अ. सर्वांत पहिली चूक म्हणजे त्यांना वाटले की, ‘नाटो’चे (उत्तर अटलांटिक करार संघटना) देश त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करतील; पण ‘नाटो’ देशांनी सैन्य न पाठवता, केवळ शस्त्रे पाठवली.

आ. दुसरी चूक म्हणजे युक्रेनला वाटले की, तो ‘नाटो’मध्ये सहभागी होणारच आहे. त्यामुळे रशियाशी लढाई झाली, तरी ‘नाटो’ देश त्यांना साहाय्य करणारच आहेत; मात्र तसे काहीही झाले नाही.

इ. तिसरे त्यांना वाटले की, रशिया केवळ दमदाटी करत आहे. तो काही युद्ध करणार नाही. अर्थात् युक्रेनचा अंदाज खोटा ठरला आणि रशियाने खरोखरचे युद्ध चालू केले.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.