रशिया-युक्रेन युद्धातून भारत काय शिकू शकतो ?

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

युक्रेनचे प्रत्येक शहर किल्ल्यांप्रमाणे लढाईसाठी सिद्ध होणे

रशिया-युक्रेन लढाई चालू असतांना रशियाला वाटत होते की, त्यांचे मोठ्या प्रमाणातील शस्त्रास्त्रे पाहून युक्रेन घाबरेल; पण १२ दिवस होऊन आणि एवढे मोठे सैन्य युक्रेनमध्ये आत जाऊनही त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही. ‘सैन्य आत घुसवल्याने आपला शत्रू घाबरेल’, असा विचार करणे, हे युक्रेनच्या संदर्भात चुकीचे ठरले आहे. युक्रेनच्या प्रत्येक शहराला किल्ल्यांप्रमाणे लढाईसाठी सिद्ध करण्यात आले आहे.

युक्रेनने सीमारेषेवर संरक्षणात्मक उपाययोजना न केल्याने रशियाचे सैन्य थेट आत घुसणे

युक्रेनला ठाऊक होते की, कधी ना कधी रशियाचे सैन्य त्यांच्या देशाच्या आत येईलच. तरीही त्यांनी संरक्षणात्मक (डिफेन्सेस) उपाय बनवले नाहीत. सध्या युक्रेनचे सैन्य उत्स्फूर्तपणे लढत आहे. ते रशियाच्या सैन्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. युक्रेनचे लोक ‘शोल्डर्स फायर एअर मिसाईल’चा (खांद्यावरून हवेत मारा करता येणारी क्षेपणास्त्रे) अतिशय चांगला वापर करत आहेत. त्यांनी रशियाचे विमाने, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन यांना पाडले आहे. रशियाचे सैन्य सर्व शहरांमध्ये जात होते. जवळच्या २ शहरांवर त्यांनी ताबा मिळवला; पण कीव या राजधानीला वेढा देऊन ८ दिवस झाले आहेत. रशियाचे सैन्य चोहोबाजूने आत घुसले. त्यांना युक्रेनच्या प्रत्येक इमारतीमध्ये जाऊन त्यांच्यावर आक्रमण करणार्‍या सैनिकांना मारावे लागेल किंवा त्यांना बाहेर काढावे लागेल. त्यासाठी पुष्कळ प्रमाणात तुकड्यांची आवश्यकता असते. एवढ्या तुकड्या रशियाकडे नाहीत.

रशियाच्या ‘ऑपरेशन’ची (मोहिमेची) गती पुष्कळ न्यून झाली असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या लक्षात आले.  तेव्हा त्याने सैन्याला गती वाढवण्याचा आदेश दिला. त्यामुळे रशियाच्या सैन्याचा संपूर्ण जोर हा ‘फायर पॉवर्स’ म्हणजे आर्टलरी गन्स, हेलिकॉप्टर्स, ड्रोन, वायूदल यांच्यावर आहे. ते समोरासमोरच्या युद्धासाठी सिद्ध असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे रशिया ७ दिवस होऊनही कीव राजधानीवर ताबा मिळवू शकलेला नाही. युक्रेनचे संपूर्ण सैन्य हे बंकर, ट्यूब रेल्वे आदी भूमिगत ठिकाणांमध्ये लपून बसले आहे. त्यामुळे रशियाच्या सैन्याचा गोळीबाराचा परिणाम युक्रेनच्या सैन्यावर झाला नाही. तसेच युक्रेनच्या सैन्याची संख्या जशीच्या तशी आहे.

युक्रेनच्या तुलनेत रशियाच्या सैन्याचा प्रतिकार न्यून पडणे

वास्तविकता ही आहे की, रशियाचा प्रतिकार न्यून पडला आहे. रशियाच्या सैन्याच्या विरोधात युक्रेनची ‘टँक हंटींग टिम्स’ (रणगाड्यांचा प्रतिकार करणारे सैन्य) चांगल्या प्रकारे लढत आहे. या लढाईत रशियाच्या ‘पॅराट्रूपर्स’ या विशेष सैन्यदलालाही वापरण्यात आले; पण त्यांचाही विशेष लाभ झाला नाही आहे. याचाच अर्थ रशियाच्या नेतृत्वाला अधिक जोरदार कारवाई करावी लागेल. या युद्धात युक्रेनच्या नेतृत्वाने रशियाच्या नेतृत्वाच्या तुलनेत चांगले काम केले आहे.

भारताने या युद्धातून काय शिकायला पाहिजे ?

रशिया आणि युक्रेन या दोघांकडूनही माहिती युद्ध चालू होते, त्याचा भारताने अभ्यास केला पाहिजे अन् धडा शिकला पाहिजे. यातून अपप्रचाराचे युद्ध कसे लढले ? हे शिकता येईल. चीनच्या विरोधात सामाजिक माध्यमांचा वापर कसा करायचा, यासाठी भारताचा कृती आराखडा सिद्ध असायला पाहिजे. सायबर आक्रमणांना तोंड देण्यासाठी ‘सायबर डिफेन्सेस’ला (सायबर संरक्षण करणारा गट) सबळ करायला पाहिजे. जेव्हा लढाई होईल, तेव्हा भारतीय ‘हॅकर्स’चे साहाय्य घेऊन ‘ऑल आऊट’ (सर्व शक्तीनिशी) आक्रमण केले पाहिजे.

भारताने या युद्धाचा संरक्षणयंत्रणा अधिक भक्कम होण्यासाठी वापर केला पाहिजे. युक्रेनचे सर्व राजकीय पक्ष रशियाच्या विरोधात एकत्र येऊन लढाई लढत आहेत. त्या त्या शहराचा महापौर त्या लढाईचे नेतृत्व करत आहे. युक्रेनची जनता उत्साहाने युद्ध लढत आहे. जेव्हा कठीण वेळ येतो, तेव्हा संपूर्ण देश एकत्र येतो, भारतानेही अशा प्रकारची लढाई लढण्याची आवश्यकता आहे. युक्रेन युद्धाचा एक भारतीय या नात्याने अभ्यास करू शकतो. चीनशी युद्ध झाले, तर भारतही अशीच कारवाई करू शकतो.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.