येरवडा (पुणे) मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना मिळणार पंचगव्य उत्पादने आणि गोआधारित शेतीचे धडे !

गव्यशास्त्री डॉ. स्वानंद र. पंडित यांची पंचगव्यशास्त्र मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती !

पुणे – महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग, इस्कॉन अन्नामृत फाऊंडेशन आणि आयुर्वेद गोविज्ञान काऊंसिल यांच्या सहयोगाने येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी ‘बंदीजन बांधव सुधार आणि पुनर्वसन प्रकल्पा’च्या अंतर्गत नंदनवन या योजनेचा जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या योजनेच्या अंतर्गत कारागृहातील बंदीजन बांधवांसाठी देशी गोसंवर्धन, सेंद्रिय शेती, पंचगव्य उत्पादने यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर प्रत्येक कैद्यास स्वावलंबी आणि सन्मानाने जीवन जगता यावे यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘नंदनवन’ हा प्रकल्प राबवण्यात येतो. या प्रकल्पात अनेक कुटीरोद्योग आणि लघु व्यवसाय यांचा समावेश असतो. यात आता देशी गोवंशापासून विषमुक्त सेंद्रिय शेती आणि पंचगव्य उत्पादने यांचाही समावेश केला जाणार आहे़.

पंचगव्य उत्पादने

(वाचता येण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

या वेळी आयुर्वेद गोविज्ञान काऊंसिलचे संचालक गव्यशास्त्री डॉ. स्वानंद र. पंडित यांना कारागृहातील बंदीजन बांधवांसाठी पंचगव्य उत्पादने निर्माण प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक पदाचे दायित्व देण्यात आले.

गव्यशास्त्री डॉ. स्वानंद र. पंडित

या वेळी बोलतांना पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी गोविज्ञानावर देशात फार मोठे संशोधन चालू असून देहली आयआयटी मध्ये गोविज्ञान संशोधनासाठी ६५ शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. याचा नक्कीच समाजाला लाभ होईल.

राज्याचे पोलीस महासंचालक श्री. अतुलचंद्र कुलकर्णी यांनी हा प्रकल्प राज्यातील सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून बंदीजन बांधवांना स्वावलंबी बनवणारा आहे. हा प्रकल्प राज्यातील ६० कारागृहांमध्ये राबवण्याचा मानस व्यक्त केला.

या कार्यक्रमास आयुर्वेद गोविज्ञान काऊंसिलचे कार्यकारी संचालक गव्यशास्त्री डॉ. स्वानंद र. पंडित, महाराष्ट्र राज्य कारागृह प्रशासन विभागाच्या वतीने, उपअधिक्षक श्री. प्रदिप जगताप, इस्कॉन टेम्पलचे समस्त गुरुवर्य आणि कर्मचारी, तसेच इतर पंचगव्य आणि सेंद्रिय कृषि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.