रशियाने चीनमधील हिवाळी ऑलम्पिकच्या वेळी केलेल्या साहाय्याची चीनकडून परतफेड !

चीनमधील हिवाळी ऑलम्पिकवर देशांनी बहिष्कार घालू नये; म्हणून चीनने रशियाला  युक्रेनवर त्यानंतर आक्रमण करण्याची विनंती करणे

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

‘अमेरिकी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांप्रमाणे ‘रशिया युक्रेनवर आक्रमण करणार आहे’, याची चीनला कल्पना होती. त्यानंतर चीनने रशियाला विनंती केली की, ‘चीनमधील हिवाळी ऑलम्पिक संपल्यानंतर युक्रेनवर आक्रमण करा.’ त्याप्रमाणे चीनमधील ऑलम्पिक संपल्यावर रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. चीनची आक्रमक वृत्ती आणि त्याने सर्व जगावर चिनी (कोरोना) विषाणू पसरवल्यामुळे त्याच्या हिवाळी ऑलम्पिकवर अनेक देशांनी बहिष्कार घातला होता. त्यामुळे ‘युद्ध चालू झाले, तर पुन्हा काही देश या ऑलम्पिकवर बहिष्कार घालतील’, अशी चीनला भीती होती. त्यामुळे त्याने  रशियाला ही विनंती केली होती.

रशियावर घातलेल्या निर्बंधांवर चीन त्याला  करत असलेले विविध प्रकारचे साहाय्य

चीन हा रशियाचा एक सर्वांत महत्त्वाचा सामरिक सहकारी असून तो विविध प्रकारे रशियाला साहाय्य करत आहे. त्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या विरोधात मतदान करायचे टाळले. याउलट चीन आता रशियाशी व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या आर्थिक प्रणालीमधून जागतिक स्तरावर पैसे वळवले (ट्रान्सफर) जातात, त्या प्रणालीतून ७०-८० टक्के प्रमाणात रशियाला काढण्यात आले आहे. त्यामुळे रशियाशी व्यवहार करणे, हे अनेक देशांना कठीण झाले आहे. चीन त्याचे चलन ‘युआन’ आणि रशियाचे ‘रुबल’ चलन यांचा वापर करून व्यापार करील अन् रशियाचा जो तोटा होत आहे, तो भरून काढण्याचा प्रयत्न करील.

रशियाकडे पुष्कळ प्रमाणात वायू आहे, तोही खरेदी करण्यासाठी चीन सिद्ध आहे. रशियाच्या जहाजांना अनेक ठिकाणी अडवले जात आहे. त्यामुळे चीन रशियाच्या साहाय्याला त्याची जहाजे पाठवेल. असे वाटते की, विशेषत: आर्थिक निर्बंधांच्या वेळी  चीनने रशियाला डॉलर्सचे, व्यापाराचे आणि आर्थिक दृष्टीने साहाय्य केले, तर रशियाला या संकटावर मात करणे शक्य होईल.