अमेरिका भारताशी वाढत्या मैत्रीसाठी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता यांची आभारी आहे ! – अमेरिका

अमेरिकेचे वरिष्ठ खासदार ख्रिस मर्फी

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताशी असलेले संबंध खरोखरच कधीही भक्कम राहिले नव्हते. अमेरिका भारताशी वाढत असलेल्या मैत्रीसाठी तेथील लोक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आभारी आहे, असे विधान अमेरिकेचे वरिष्ठ खासदार ख्रिस मर्फी यांनी म्हटले आहे. भारताने रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात तटस्थ भूमिका घेतल्यानंतरही अशा प्रकारचे विधान अमेरिकेच्या खासदाराकडून करणे महत्त्वाचे मानले जात आहे.

मर्फी म्हणाले, ‘‘चांगल्या कारणाने द्विपक्षीय संबंध वाढत आहेत. आजपासून ५ वर्षांनी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. भारत ही जगातील सहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या वर्षी ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी महत्त्वाची अर्थव्यवस्था होती. भारताकडे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. जागतिक महामारीच्या काळात भारताचा बायोफार्मास्युटिकल (जैव औषध) उद्योग वाढला आहे. अमेरिकेसह उर्वरित जगाला भारताने पीपीई किट (कोरोनाच्या काळात विषाणूच्या संपर्कात येण्यापासून वाचण्यासाठी बनवलेले उपकरण) पुरवल्या आणि लसींचा प्रमुख उत्पादक म्हणूनही भारत उदयास आला आहे. हा देश निश्‍चितपणे अमेरिकेसाठी अत्यंत लाभदायक ठरेल.’’